मेळघाटात 'नरेगा'त लाखोंचा गैरव्यवहार; शाखा अभियंता निलंबित

मेळघाटात नरेगाच्या कामात लाखोंचा गैरव्यवहार
मेळघाटात नरेगाच्या कामात लाखोंचा गैरव्यवहार

अमरावती : कुशल तसेच अकुशल कामांचे चुकीचे अंदाजपत्रक काढून त्या माध्यमातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतील या भ्रष्टाचार प्रकरणी चिलखदरा पंचायत समितीचे शाखा अभियंता राठोड यांना निलंबित करण्यात आले असून इतरही काही जणांवर कारवाई प्रस्तावित आहे.  शासनाकडून तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी दुर्गम मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा पंचायत समिती अंतर्गंत रस्ते कामासाठी मंजूर झाला होता. नरेगाअंतर्गंत या कामांचे अंदाजपत्रक मंजूर करणे गरजेचे असताना स्थानिक शाखा अभियंता, तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांनी चुकीचे अंदाजपत्रक तयार करुन बोगस कामे करून देयक काढल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. धारणी व चिखलदरा पंचायत समिती अंतर्गंत खडीकरणाच्या कामांमध्ये मोठा घोळ करण्यात आला. अतिशय निकृष्ट पद्धतीने रस्ते तयार करण्यात आले, मात्र कागदोपत्री नियमानुसार रस्त्यांची कामे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले.  स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांकडून या संदर्भाने प्राप्त तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावंडे तसेच अन्य अधिकाऱ्यांनी धारणी तसेच चिखलदरा तालुक्‍यातील या रस्त्यांची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर निकृष्ट रस्ते झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले. चौकशी अहवालाच्या आधारे  चिखलदरा येथील शाखा अभियंता विवेक राठोड यांना निलंबित करण्यात आले. रोजगार हमी योजनेच्या अंदाजपत्रकात योजनेचे निकष व नियमानुसार दरसूचीप्रमाणे अंदाजपत्रके तयार केली नसताना तांत्रिक मान्यता दिल्याचा ठपका शाखा अभियंता विवेक राठोड यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणातील इतर दोषींवर देखील कारवाईचे संकेत जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com