गुणनियंत्रण विभाग
गुणनियंत्रण विभाग

देतो की नाही, का काढू लॅब प्रिंट..?

पुणे : खते, कीटकनाशके, बियाण्यांचे विक्री, उत्पादन, नूतणीकरणाचे परवाने देताना राज्यातील कृषी उद्योजक व कंपन्यांचा आर्थिक छळ करण्यासाठी गुणनियंत्रण विभाग आणि प्रयोगशाळाचालक हातात हात घालून काम करीत आहेत. प्रयोगशाळांमधील निविष्ठांच्या नमुन्यांची काढली जाणारी प्रिंट हे देखील लुटीचे सर्वात मोठे हत्यार भ्रष्ट अधिका-यांना मिळाले आहे. यामुळे प्रयोगशाळांमधील प्रामाणिक कर्मचा-यांची कोंडी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रेझेंटेशनचे टेन्शन.. परवान्यासाठी आर्थिक छळ ‘प्रेझेंटेशन’पासून सुरू होतो. तुम्ही काय संशोधन केले याची तांत्रिक माहिती कृषी आयुक्तालयात बोलावून विचारली जाते. ही संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. काळाबाजार करणा-या कंपन्यांची उत्पादने तात्काळ ओळखणे व त्यांना परवाना नाकारण्यास या संकल्पनेतून मदत होते. मात्र, गुणनियंत्रण विभागाचे हेतू चांगले नसतात. कोणत्याही कंपनीला एक-दोन दिवस आधी निरोप देऊन आयुक्तालयात प्रेझेंटेशनसाठी बोलावले जाते. या वेळी उलटेपालटे प्रश्न विचारून हैराण करणे आणि बिदागी दिल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही याची जाणीव करून देणे हाच असतो. प्रेझेंटेशनचे देखील कामकाज अधिकृत नसते, इतिवृत्त, त्याविषयक कामकाजाची माहिती जाहीर फलकावर लावणे असे काहीही केले जात नाही, अशी माहिती उद्योजक सूत्रांनी दिली. लॅब रिपोर्टची प्रिंट.. गुणनियंत्रण निरीक्षकांकडून आणखी वापरले जाणारे अस्त्र म्हणजे लॅब रिपोर्टची प्रिंट. कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत नमुना फेल असल्याचे नमूद केलेल्या अहवालाची प्रिंट एकदा बाहेर निघाली की थेट पोलिसांकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचना कृषी आयुक्तालयाने दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रिंट हा शब्द उच्चारला तरी उद्योजकांच्या अंगावर काटा उभा रहातो. परिणामी प्रिंट निघण्याच्या आधीच ९८ टक्के प्रकरणे मिटवली जातात. ‘देतो की नाही? का काढू प्रिंट?, अशा दोन वाक्यातच कोणताही उद्योजक घायाळ होतो आणि शेवटी शरण जातो, अशी व्यथा कंपन्यांनी सांगितली आहे. गुणनियंत्रण विभागाने कायदे, नियम राबवावेत. त्यासाठी कोणाचाही विरोध नाही. सरकारी परवाना शुल्क देखील कितीही भरण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, स्वतःचे खिसे भरण्यासाठी नियमांचा वापर करून गुणनियंत्रण विभागाने कंपन्यांना बटीक बनविले आहे. त्यासाठी बेकायदेशीर व्यवसाय करण्यास भाग पाडले आहे. ऑनलाईन परवाना पद्धत विकसित न करता संपूर्ण निविष्ठा उद्योगाला वेठीस धरले आहे. मात्र, आता चौकशा सुरू झाल्यामुळे न्याय मिळेल व पारदर्शकता वाढेल, अशी आम्हाला आशा वाटते. त्याचे कार्यवाही चौकशी अहवाल दडपले गेल्यास जाहीर न केल्यास आम्ही शासनाकडे पाठपुरावा करण्याची ठेवली आहे आता गप्प बसणार नाही, असा निर्धार एका कंपनीच्या संचालकाने बोलून दाखविला. स्टॉप सेल म्हणजे मीटर चालू गुणनियंत्रण निरीक्षकांनी स्टॉप सेलच्या नावाखाली देखील राज्यभर दहशत माजवली आहे. स्टॉप सेल हे एक मोठे अस्त्र तालुक्यापासून ते आयुक्तालयापर्यंतचे अधिकारी वापरतात. कायद्याने निरीक्षकांना स्टॉप सेलचे अधिकार देताना शेतकरी हिताचा हेतू डोळ्यासमोर ठेवला आहे. खते, कीटकनाशके, बियाणे विक्री व्यवस्थेत जर माल दर्जेदार नसल्याचा संशय असल्यास तो शेतक-यांपर्यंत पोचू नये, यासाठी स्टॉपसेलचे आदेश द्यावेत, असे कायदा सांगतो. आदेशपत्र मिळताच हा माल कुणालाही विकता येत नाही. मात्र, या आदेशपत्र बजावण्याच्या हक्काचा बहुतांश वेळा दुरपयोग केला जातो. कोणत्याही कंपनीत, दुकानात, गोदामात घुसायचे आणि स्टॉप सेलचा आदेश द्यायचा, असा फंडा निरीक्षकांनी वापरल्याचा तक्रारी कंपन्यांनी केल्या आहेत.   ...तर शेकडो घोटाळे बाहेर पडतील ! "स्टॉप सेलचा आदेश देताच निरीक्षकाचे 'मीटर' चालू होते. आदेश उठविण्यासाठी आम्हाला आर्थिक भुर्दंड बसतो. उत्पादन चांगले असले तरी ऐन विक्री हंगामात स्टॉप सेल देताच मोठे नुकसान आम्हाला सहन करावे लागते. त्यामुळे आम्हाला स्टॉप सेलचे आदेश उठविण्यासाठी निरीक्षकांचे ''मीटर डाऊन'' करावेच लागते. स्टॉपसेल कोणी, कोणाच्या परवानगीने दिला, कोणाच्या मान्यतेने उठवला याची राज्यभर माहिती कधीही जाहीर केली जात नाही. स्टॉप सेलची भानगड फक्त निरीक्षक ते गुणनियंत्रण विभाग यांच्यात मर्यादित ठेवली जाते, असे कृषी विभागातील सूत्रांनीच स्पष्ट केले. प्रिंट आणि स्टॉप सेलरुपी अजगराचा विळखा सोडविण्यासाठी गुणनियंत्रण व प्रयोगशाळांमधील सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यास तसेच फोन कॉल्स् तपासावे लागतील. त्यानंतर शेकडो घोटाळे बाहेर पडतील, असा दावा कृषी खात्याचेच कर्मचारी करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com