वायफाय मोफत हवाय? घरपट्टी, पाणीपट्टी भरा

पाच लोकांचे कुटुंब गृहीत धरले तर दळणाचे वर्षाला १२००, वायफायचे १२०० तर पाण्याचे १६०० रुपये होतात. साधारणतः चार हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. तुलनेत कराची रक्कम फारशी नाही. यामुळे योजनेचा लाभ मोठा होऊ शकतो - सागर पाटील, सरपंच अतिग्रे, जि. कोल्हापूर
wi-fi
wi-fi

कोल्हापूर : ‘‘वायफाय मोफत हवाय? घरपट्टी व पाणीपट्टी शंभर टक्के भरा, लगेच मिळेल,’’ ही घोषणा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीने. घरपट्टी व पाणीपट्टीची जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी ग्रामपंचायतीने ही अनोखी शक्कल लढविली आहे.  ग्रामस्थांनी तातडीने घरपट्टी व पाणीपट्टी आदी कर भरल्यास मोफत वायफायबरोबरच महिन्यातून तीन वेळा मोफत दळण, कांडप, आर.ओ.चे दररोज वीस लिटर शुद्ध पाणी, याशिवाय घरामध्ये कचरा साठविण्यासाठी दोन डस्टबिन मोफत देण्याचीही ऑफर ग्रामस्थांना दिली आहे. एक मेपासून या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत. सक्तीने घरपट्टी वसुली करण्याऐवजी ग्रामस्थांनाच घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने आखलेल्या या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.  कोल्हापूर सांगली महामार्गाजवळ अतिग्रे (ता. हातकणंगले) हे गाव आहे. ग्रामपंचायतीचे प्रमुख स्रोत असणारा घरपट्टी, पाणीपट्टी जास्तीत जास्त लोकांनी भरण्यासाठी कोणत्या योजना करता येतील याकडे सरपंच सागर पाटील, ग्रामसेवक ए. एस. वाघ यांनी प्रयत्न सुरू केले. अनेक ठिकाणी फिरून त्यांनी ही कल्पना राबविली. सुविधा देताना प्रत्येक घटक यात सहभागी होऊन जास्तीत जास्त कर वसूल होईल याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला.  वायफाय सुविधा दिल्यास तरुणवर्ग, दळण-कांडप मोफत दिल्यास महिलावर्ग व पाणी मोफत दिल्यास संपूर्ण कुटुंबालाच लाभ होईल या हेतूने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. सध्या घरोघरी मोबाईल आहेत. इंटरनेट ही आवश्‍यक बाब झाली आहे. यासाठी ग्रामपंचायतीने वायफाय सुविधा देण्याचा विचार केला. कुटुंबातील एका व्यक्तीला वायफाय देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वत: दळण कांडप मशिन उभारून दळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दररोज वीस लिटर या प्रमाणात ग्रामस्थांना आर.ओ. पाणी मोफत देण्यात येणार आहे.  प्रतिक्रिया कोणत्याही परिस्थितीत कर भरण्याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यावे, यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.  - ए. एस. वाघ, ग्रामसेवक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com