गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन

लहान मोठे तलाव, गावतळी, नैसर्गिक पाणी साठे, कृत्रिम जलाशय, तसेच शेततळ्यामध्ये कोळंबी संवर्धन करता येते.
Freshwater prawn breeding
Freshwater prawn breeding

कोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२ हेक्टर आणि खोली १.५ ते २.० मीटर असावी. तलावामध्ये साधारणतः ८ ते १० महिने पाणी उपलब्ध असावे. लहान मोठे तलाव, गावतळी, नैसर्गिक पाणी साठे, कृत्रिम जलाशय, तसेच शेततळ्यामध्ये कोळंबी संवर्धन करता येते. गोड्या पाण्यातील कोळंबीच्या सुमारे १०० जाती आहेत. त्यांपैकी महा कोळंबी किंवा पोशा कोळंबी (मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी) ही आकाराने इतर सर्व जातीपेक्षा मोठी असल्याने जंबो कोळंबी असे म्हणतात. या कोळंबीमध्ये विविध प्रकारचे अन्न ग्रहण करणे, नैसर्गिक प्रतिकारशक्ती, गोड्या तसेच कमी क्षारतेच्या पाण्यात चांगली वाढ होणे, वातावरणात होणारे बदल सहन करणे, जलद वाढ होणे, उच्च पौष्टिकता, स्थानिक व परकीय बाजारपेठांत मोठ्या प्रमाणावर मागणी आणि चांगला बाजारभाव मिळतो. या कोळंबीचे बीजोत्पादनाचे तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळे जंबो कोळंबीची शेती फायदेशीर होत आहे. कोळंबी संवर्धनासाठी आवश्यक घटक

  • बीजाची उपलब्धता
  • तलावाची उपलब्धता
  • संगोपन तलाव
  • संवर्धन तलाव
  • खत व खाद्य योजना इ.
  • कोळंबी बीज उपलब्धता

  • जंबो कोळंबीचे बीज दोन प्रकारे उपलब्ध होऊ शकते. एक म्हणजे नैसर्गिकरीत्या तयार झालेले बीज खाडीमधून जमा करणे आणि दुसरे म्हणजे बीज निर्मिती केंद्रावरून उपलब्ध करणे.
  • नैसर्गिक अवस्थेतील बीजाची उपलब्धता ही मर्यादित असते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळातच कोळंबीची पिल्ले निमखाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्याकडे स्थलांतरित होताना नदीच्या मुखाजवळ जाळ्याव्दारे पकडले जातात. अशाप्रकारे पकडलेले बीज हे फक्त जंबो कोळंबीचे असेल याची शाश्वती नसते. सापडलेल्या बीजामध्ये एकापेक्षा अनेक प्रकारच्या कोळंबीचे बीज असते. ते फारच लहान आकाराचे असल्याकारणाने ओळखणे अवघड असते. यासोबतच अशाप्रकारचे बीज हे रोगट व वेगवेगळ्या आकाराचे असल्यामुळे वाहतुकीच्या दरम्यान या बीजांची मोठ्या प्रमाणावर मरतुक होते.
  • कोळंबीच्या नैसर्गिक बीजाची उपलब्धता राज्यामध्ये पालघर जवळील वाडा परिसरात आणि रायगड, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी होते. गुजरात राज्यामधील भडोच या ठिकाणी नैसर्गिक बीजाची बाजारपेठ आहे. वरील काही
  • नैसर्गिक बीजापेक्षा बीजनिर्मिती केंद्रावर (हॅचरी) तयार झालेल्या बीजाचा वापर कोळंबी संवर्धनासाठी करावा. हे बीज एक आकार आणि प्रकारचे असते. बीज निर्मिती दरम्यान अतिशय काटेकोरपणे काळजी घेतल्याने हे बीज रोगमुक्त असते.
  • सुदृढ व निरोगी बीज ओळखण्याची लक्षणे चपळपणा जोरात पोहणे, एकत्र न राहणे, टाकीच्या पृष्ठभागावर समप्रमाणात विभागून राहणे, टाकीवर हाताने मारले असता एकदम सावध होणे, पोहण्याची दिशा पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध असणे. रंग बीजांचा रंग काळपट तपकिरी असावा. शरीराच्या दोन्ही बाजूस समांतर वाढलेल्या काळ्या पट्टया दिसाव्यात. बीजाची थोडी वाढ झाल्यावर बीजाच्या डोक्यावरील सोंडेसारख्या भागाचे टोक गुलाबी होते. ही निरोगी बीजाची लक्षणे आहेत. जर बीजाच्या शरीरावर पांढरे डाग असल्यास ती रोगी बीजाची लक्षणे आहेत. असे बीज त्वरित नष्ट करावे. खाद्य दिलेले खाद्य लवकर खाणे ही निरोगी बीजांची लक्षणे आहेत. जर बीज दिलेले अन्न लवकर खात नसेल तर असे बीज रोगट असण्याची शक्यता जास्त असते. कोळंबी संवर्धनासाठी तलावाची निवड 

  • तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२ हेक्टर आणि खोली १.५ ते २.० मीटर असावी. यापेक्षा मोठ्या आकाराचे क्षेत्रफळ असणाऱ्या तलावाचा वापर सुध्दा कोळंबी संवर्धनासाठी होतो, परंतु अशाप्रकारच्या तलावामध्ये खाद्य योग्य रितीने सर्व तलावभर देता येत नाही. पाण्याचा दर्जासुध्दा नियंत्रण करता येत नसल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असते.
  • कोळंबी संवर्धन तलावामध्ये साधारणतः ८ ते १० महिने पाणी उपलब्ध असावे. लहान मोठे तलाव, गावतळी, नैसर्गिक पाणी साठे, कृत्रिम जलाशय, तसेच शेततळ्यामध्ये कोळंबी संवर्धन करता येते.
  • संगोपन तलाव 

  • नैसर्गिक अथवा बीज निर्मिती केंद्रावरून उपलब्ध होणारे बीज हे अतिशय लहान आकाराचे (१.० से.मी.) असते. अशा बीजास पोस्टलार्वी म्हणतात. ही लहान बीजे फारच नाजूक असतात. या बीजाचे काळजीपूर्वक संगोपन करून त्यांना २-३ सेंमी आकाराच्या शिशू झिंगा आकारापर्यंत वाढविणे आवश्यक असते. यानंतर यांना संवर्धन तलावामध्ये सोडावे.यासाठी लहान ५० ते २०० वर्गमिटर क्षेत्रफळाचे मातीचे तलाव, सिमेंटचे हौद किंवा प्लॅस्टिकच्या टाक्यांचा उपयोग करता येतो.
  • यांपैकी सुविधा उपलब्ध नसल्यास लहान घरांच्या जाळीचे चौकोनी हौद (हापे) निर्माण करून अशा प्रकारचे हापे संवर्धन तलावाच्या एका कोप-यात उभारून त्यामध्ये बीजाचे संगोपन करता येते. यासाठी संगोपन तलावामध्ये साधारणतः २००० ते ३००० बीज प्रती वर्गमिटर याप्रमाणात साठविली जाऊ शकतात.
  • या दरम्यान या बीजांना आडोसा आणि चिकटून राहण्यासाठी झाडाच्या फांद्या, कौल किंवा मडक्याचे तुकडे, सिमेंट किंवा प्लॅस्टिकच्या पाइपचे तुकडे, सायकल/स्कूटरच्या जुन्या निरुपयोगी टायर्सचे योग्य आकाराचे तुकडे अशा स्वरूपाच्या वस्तू संगोपन तलाव किंवा टाकीच्या तळाशी टाकाव्यात.
  • या बीजांना खाद्य म्हणून गांडूळ किंवा शिंपल्यातील प्राण्याचे बारीक तुकडे, भाताचे तूस, भुईमुगाची पेंड, सोयाबीनची भुकटी इ. प्रकारचे खाद्य बीजाच्या वजनाच्या १० टक्के या प्रमाणात दररोज ३ ते ४ वेळा अन्न म्हणून द्यावे.
  • संगोपन तलावाच्या व्यवस्थापनेनुसार ६० ते ९० टक्क्यांपर्यंत लहान बीज जिवंत राहू शकतात. अशाप्रकारे विकसीत झालेले बीज संगोपन तलावामध्ये सोडण्यास योग्य असते.
  • प्रति हेक्टरी ४०,००० ते ५०,००० बीजाचा संचयन एकेरी कोळंबी शेतीसाठी करावा. कोळंबी सोबत कार्प जातीचे मासे सोडावयाचे असल्यास अशा मिश्रशेतीमध्ये प्रति हेक्टरी १५,००० ते २५,००० कोळंबी बीज (२.५ ते ४.० सेंमी आकार ) संचयन करावे.
  • संवर्धन तलाव

  • संवर्धन तलावाच्या प्रकारानुसार त्याची पूर्व तयारी करणे आवश्यक असते. पूर्वतयारी करण्याच्या वेळेस बारमाही तलावातील पान वनस्पतीचे समूळ निर्मूलन करावे.
  • मासेभक्षक मासे तसेच इतर प्राण्यांचे निर्मूलन करण्यासाठी तलावात ब्लिचिंग पावडर १७५ किलो व युरिया १०० किलो यांचे मिश्रण तलावातील पाण्यात सोडावे. ३) ब्लिचिंग पावडर तलावामध्ये टाकण्यापूर्वी ६ ते ७ तास अगोदर युरिया पाण्यामध्ये सोडावा. यामुळे तलावातील मासेभक्षक मासे व प्राण्यांचा नायनाट होतो.
  • तलावाच्या पाणी आत येण्याच्या व बाहेर जाण्याच्या मार्गावर जाळी बसवून घ्यावी.
  • वेळोवेळी कवच टाकून कोळंबीची वाढ होत असते. कवच टाकल्यावर कोळंबीचे शरीर अत्यंत मऊ होत असते. अशावेळी इतर कोळंबी कवच टाकलेल्या कोळंबी खाण्याचा धोका असतो. यामुळे अशा अवस्थेच्या वेळी त्यांना सुरक्षित राहण्यासाठी तलावात लपण्यासाठी काही आडोसा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. कोळंबीला बिळासारख्या सुरक्षित जागी लपून राहण्याची सवयसुध्दा त्यांना असते. यासाठी संवर्धन तलावामध्ये कोळंबी बीजाचा संचय करण्यापूर्वी कोळंबीला लटकण्यास झाडाच्या फांद्या, नायलॉनच्या जाळ्या, सिमेंट पाइपचे तुकडे, ट्रकचे खराब टायर्स तलावात टाकाव्यात.
  • कोळंबी संवर्धनाचे प्रकार

  • स्वतंत्रपणे एकेरी कोळंबी संवर्धन आणि कार्प माशासोबत मिश्र कोळंबी संवर्धन करता येते. जर कोळंबी बीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध असेल तर स्वतंत्रपणे कोळंबीची एकेरी संवर्धन (मोनोकल्चर) करण्यासाठी प्रति हेक्टरी ४०,००० ते ५०,००० कोळंबी बीज तलावामध्ये सोडावे.
  • कोळंबीबरोबर कार्प माशांचे मिश्र संवर्धन (पॉलीकल्चर) करावयाचे असल्यास कोळंबी बीज सोडण्याचे प्रमाण प्रति हेक्टरी १५००० ते २५००० एवढे असावे. बीजाचा आकार २.५ ते ४.० सेंमी असावा.
  • मिश्र संवर्धन प्रकारामध्ये पाण्याच्या सर्व स्तरांचा वापर होतो. कोळंबी तलावाच्या तळाशी रहात असल्यामुळे पाण्याच्या मधल्या स्तरातील अन्न खाणारा रोहू आणि पाण्याच्या वरच्या थरातील अन्न खाणारा व वास्तव्य करणारा कटला या माशांची स्पर्धा होत नाही. यामुळे कोळंबीच्या मिश्र शेतीमध्ये तलावाच्या पृष्ठभागाशी राहणाऱ्या मृगल किंवा सायप्रिनस माशांना तलावामध्ये सोडू नये.
  • कटला, रोहू माशांचे बीज सोडण्याचे प्रमाण

  • कटला १५०० आणि रोहू १५०० मत्स्य बोटुकली प्रति हेक्टर या प्रमाणात असावे.
  • पहिल्या वेळेस कोळंबी संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोळंबी व मासे यांची एकत्रित शेती करावी. या अनुभवानंतरच ‘एकेरी कोळंबी’ शेतीकडे वाटचाल करावी. ३)भारतामध्ये कार्प माशांसोबत कोळंबी संवर्धनाची पद्धत लोकप्रिय झाली आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक तसेच कृत्रिम खाद्याचा उत्तम उपयोग होतो. तलावाचे जैविक चक्रसुध्दा उत्तम रितीने कार्यरत राहते.
  • संवर्धन तलावातील पाण्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म

  • पाण्याचे तापमान - २५ ते ३२ अंश सेल्सिअस
  • पाण्याची पारदर्शकता - अंदाजे ४० सें.मी.
  • पाण्याचा सामू (पी.एच.) - ७.० ते ८.५
  • पाण्यामध्ये विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण - ५ ते ८ मी.ग्रॅ.प्रति लिटर
  • पाण्याची कठोरता - १५० पी.पी.एम.पेक्षा कमी आणि ४० पी.पी.एम.पेक्षा जास्त कॅल्शिअम कार्बोनेटच्या स्वरूपात असावी.
  • पाण्याची क्षारता - ५० ते १०० पी.पी.एम.
  • संवर्धन कालावधीदरम्यान पूरक खाद्याचा पुरवठा

  • कोळंबी संवर्धन कालावधीच्या दरम्यान तलावाची नैसर्गिक उत्पादकता किंवा नैसर्गिक खाद्यावरच अवलंबून राहणे अतिशय धोकादायक असते कारण कोळंबी उपाशी पोटी राहू शकत नाही. त्यांना भरपूर प्रमाणात खाद्यान्न उपलब्ध असावे. खाद्य उपलब्ध नसेल तर कोळंबी स्वजाती भक्षण करतात. यामुळे तलावातील मोठ्या आकाराच्या कोळंबी इतर लहान कोळंबीला खातात. त्यांना इजा पोचवितात. यामुळे तलावातील कोळंबीची संख्या कमी होऊन उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येते.
  • कोळंबीच्या अन्नामध्ये जास्त प्रमाणात प्रथिनांचा वापर गरजेचा असतो. यासोबतच्या प्राणिजन्य प्रथिने वापरावीत. प्राणिजन्य प्रथिनांची पूर्तता गांडूळ, शंख, शिंपले, कोळंबी, मासळीच्या शरीराचा टाकाऊ भाग, कत्तल खाण्यातून फेकून दिलेली प्राण्यांची आतडी, निरुपयोगी भाग या सर्वांचा वापर पूरक खाद्य म्हणून होतो. यामुळे कोळंबीची वाढ झपाट्याने होते.
  • कोळंबीच्या अन्नातील इतर महत्त्वाचे घटक म्हणजे भाताचे तूस, भाताचे पॉलिश, शेंगदाणा पेंड, सोयाबीन इत्यादी वनस्पतिजन्य घटकांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून त्यांचा खाद्य म्हणून वापर करावा.
  • विविध अन्न घटकांचा वापर करून तयार केलेले खाद्य मोठ्या टोपल्या किंवा ट्रे मधून सकाळ व संध्याकाळी तलावाच्या काठालगत ठेवावे. अन्न ठेवण्याच्या जागा व वेळ ही एकच असावी. ट्रे मधील शिल्लक अन्नावरून सर्वसाधारणपणे खाद्याची मात्रा निश्चित करता येते.
  • प्रति हेक्टरी अन्नाची मात्रा २ किलो विभागून तीन समान हिश्‍यामध्ये ठेवावी. अन्न देण्याने प्रमाण प्रति हेक्टरी २ किलो पासून सुरू करून ६ ते ८ महिन्यांच्या संवर्धन कालावधी दरम्यानच्या शेवटी १० किलो प्रति दिवस प्रति हेक्टर पर्यंत वाढविता नेल्यास जवळपास १२०० किलो पूरकअन्नाची गरज असते.
  • कोळंबी सोबत मासळीचे संवर्धन केल्यास मासळी किंवा कोळंबीचे अन्न दुसऱ्यास उपयोगी पडते. अन्नाचा चांगला वापर होतो. या सोबतच द्यावयाच्या अन्नाचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी वाढवावे लागते.
  • कोळंबीचे उत्पादन

  • संवर्धन तलावामध्ये कोळंबीचे बीज एकाच आकाराचे व एकाच वेळेस सोडलेले असले तरी वाढही कधीच एकसमान नसते. त्यामुळे कोळंबीचे वजन व आकारमानात फरक जाणवतो.
  • संवर्धन तलावातील कोळंबीची वाढ व स्वास्थ्य याची पाहणी करण्यासाठी दर १५ दिवसांनी तलावामध्ये फेक जाळे टाकून परीक्षण करावे.
  • कोळंबीचे वजन ५० ग्रॅम किंवा अधिक झाल्यास कोळंबीच्या विक्रीस सुरुवात करावी. यामुळे इतर लहान आकाराच्या कोळंबीस जास्त खाद्य व जागा मिळेल. त्यांची वाढ योग्य प्रमाणात होईल.
  • सर्वसाधारणपणे ६ ते ८ महिने संगोपनानंतर कोळंबीच्या एकेरी संवर्धनामध्ये (मोनोकल्चर) १००० ते १५०० किलो प्रति हेक्टरी कोळंबीचे उत्पन्न मिळण्यास हरकत नाही. मासे व कोळंबीच्या मिश्र संवर्धन पद्धतीमध्ये (पॉलीकल्चर) प्रति हेक्टरी ५०० -६०० किलो कोळंबी आणि १०००-१२०० किलो माशांचे उत्पादन अपेक्षित आहे.
  • कोळंबीची विक्री

  • गोड्या पाण्यातील कोळंबी सर्वसाधारणपणे ५० ग्रॅम वजनाची झाल्यापासून विक्री करता येते. ६-८ महिन्यानंतर कोळंबी विक्रीयोग्य होते.
  • कोळंबी पकडण्यासाठी फेक जाळे वापरावे. जर संपूर्ण कोळंबी एकाच वेळेस विकावयाची असल्यास तलावातील पाणी पातळी कमी करून ओढ जाळ्याच्या सहायाने कोळंबी पकडावी.
  • पकडलेली कोळंबी प्लॅस्टिकच्या क्रेट मध्ये साठवून स्वच्छ पाण्याच्या धारेखाली धुऊन घ्यावी. यानंतर स्वच्छ बर्फाच्या चुऱ्यामध्ये बर्फ व कोळंबी असे थर द्यावेत. एक किलो कोळंबी साठविण्यासाठी एक किलो बर्फाचा चुरा वापरावा.
  • कोळंबी जास्त वेळ न साठविता लगेच विकावी.
  • कोळंबी व मासे यांचे एकत्रित संवर्धन केलेले असल्यास माशांना पकडण्यासाठी गिल नेटचा वापर करावा. कोळंबी पकडण्यासाठी फेक जाळे वापरावे.
  • कोळंबी उत्पादनावर परिणाम करणारे घटक संवर्धन तलावाची निवड

  • शेतामध्ये तलाव बांधून कोळंबी संवर्धन करावयाचे असल्यास ही जमीन चिबड व काळ्या चिकण मातीची असावी. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असावी म्हणजे पाण्याचा निचरा होणार नाही. यामुळे पाण्यासोबत आवश्यक घटक पाझरून जाणार नाहीत. सातत्याने पाण्याची पातळी राखण्यासाठी विद्युत किंवा डिझेल पंपाची गरज भासणार नाही.
  • निवडलेली जागा सहसा खोलगट आकाराची असावी. आजूबाजूच्या परिसरापेक्षा सखल असावी.
  • तलावामध्ये कोळंबी संवर्धन करावयाचे असल्यास तलावामध्ये बारा महिने पाणी उपलब्ध असावे. तलावाचे बांध मजबूत असावेत.
  • मासे भक्षक प्राणी आणि माशांचे निर्मूलन 

  • शिशू कोळंबी बीज संवर्धन तलावात सोडण्यापूर्वी तलावातील उपद्रवी मांसभक्षक अनावश्यक माशांचे निर्मूलन झाल्याची खात्री करून घ्यावी. यासाठी ब्लिचिंग पावडर व युरिया द्रावणाचा वापर करावा.
  • पाण्याचे तापमान जास्त असल्यास कोळंबी बीज तलावामध्ये सोडू नये.
  • कोळंबी बीजाची साठवणूक

  • बीज आणल्यावर तलावामध्ये लगेच सोडू नये. प्रथम बीजाच्या पिशव्या ५ ते १० मिनिटे तलावाच्या पाण्यामध्ये तरंगू द्याव्यात. यानंतर हळूहळू प्रत्येक पिशवीचे तोंड उघडून त्यामध्ये तलावातील थोडे-थोडे पाणी मिसळावे. सर्वसाधारणपणे या प्रक्रियेस ७-१० मिनिटे द्यावीत. यानंतर सावकाशपणे बीजास तलावामधील पाण्यात सोडावे.
  • सर्व बीज तलावामध्ये एकाच ठिकाणी न सोडता अनेक ठिकाणी समप्रमाणात सोडावे. तलावामध्ये एकाच ठिकाणी न सोडता अनेक ठिकाणी समप्रमाणात सोडावे. तलावामध्ये प्रमाणापेक्षा जास्त बीज संचय करू नये.
  • खते देण्याची पद्धत

  • तलावामध्ये खत देतेवेळेस तलावाच्या सर्व भागामध्ये खत पसरेल याची काळजी घ्यावी.
  • शेणखत तलावाच्या कडेकडेने ढिगाच्या स्वरूपात साठवावे.
  • खते टाकण्यापूर्वी तलावामध्ये पाणी पूर्ण भरलेले असावे.
  • तलावातील पाणी वाहणे बंद झाल्यावर खते द्यावीत किंवा तलावातील पाणी खत दिल्यानंतर ताबडतोब बदलू नये.
  • तलावातील पाण्यावर शेवाळ वाढू लागल्यास युरिया व इतर खते देऊ नयेत.
  • खते देताना कोळंबीच्या हालचालींचे निरीक्षण करावे.
  • पूरक खाद्य वापर

  • तलावामध्ये नैसर्गिक खाद्य पुरेशा प्रमाणात आहे याची खात्री करून द्यावी.
  • कोळंबी किंवा मासे तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर येऊ लागल्यास किंवा त्यांच्या विचित्र हालचाली दिसू लागल्यास तलावामध्ये नवीन पाणी सोडावे किंवा तलावातील पाणी विद्युत पंप किंवा डिझेल पंपाच्या सहायाने त्याच तलावात फवाऱ्याच्या स्वरूपात सोडावे.
  • तलावातील पाणी दिवसा बदलू नये.
  • नैसर्गिक खाद्य कमी आढळल्यास पूरक खाद्याची मात्रा वाढवावी.
  • जास्त खाद्य तलावामध्ये टाकल्यास तलावातील पाणी दूषित होते. यासाठी प्रमाणाबाहेर खाद्याचा वापर करू नये.
  • पूरक खाद्य सकाळ किंवा सायंकाळी सूर्यास्तानंतर द्यावे. खाद्य देण्याच्या जागा व वेळ नियमित पाळावी.
  • संपर्क- डॉ.रविंद्र काळे, ७३५०२०५७४६ (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, करडा,ता.रिसोड,जि. वाशिम)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com