लष्कराच्या गोठ्यातील ‘फ्रिजवाल’ गाई आता पशुसंवर्धन विभागाकडे

लष्कराच्या गोठ्यातील ‘फ्रिजवाल’ गाई आता पशुसंवर्धन विभागाकडे
लष्कराच्या गोठ्यातील ‘फ्रिजवाल’ गाई आता पशुसंवर्धन विभागाकडे

नाशिक : भारतीय लष्कराने देशातील स्वमालकीचे गाईंचे गोठे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणच्या गाईंची खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाने सुरू केली आहे. राज्यातील देवळाली, पुणे, नगर येथील गोठे बंद करण्यात येत आहे. लष्करातील पशुतज्ज्ञांनी संकरित केलेल्या ‘फ्रिजवाल’ या अधिक दूध देणाऱ्या जातीच्या गायी राज्यात प्रथमच उपलब्ध होणार आहेत. या जातीचे संरक्षण आणि संशोधनाचे काम राज्य पशुसंवर्धन विभाग करणार आहे. भारतीय लष्करातील पशुतज्ज्ञांनी ४० वर्षांपूर्वी पंजाबमधील साहिवाल आणि होल्स्टिन फ्रिजियन या गायींच्या संकरातून ‘फ्रिजवाल’ ही नवीन जाती विकसित केली. भारतीय हवामानात तग धरणारी आणि जादा दूध उत्पादन देणारी ही जात आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांच्या समितीने अभ्यास करून सुचविल्यानंतर देशातील लष्कराच्या ताब्यातील गाईंचे गोठे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोठ्यांवरील खर्च कमी करून तो लष्करी सज्जता जपण्यासाठी वापरण्यात येणार आहे. लष्करी गोठ्यांमधील फ्रिजवाल गाई संबंधित राज्यात पशुसंवर्धन विभागाला नाममात्र दरात दिल्या जाणार आहे. या अनुषंगाने संरक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांच्यात हस्तांतर व खरेदीबाबत नुकताच करार झाला. या निर्णयानुसार नाशिक येथील देवळाली कॅम्प लष्करी गोठ्यातील फक्त निरोगी गाईंची खरेदी केली जाणार आहेत. सध्या या गोठ्यात ७१४ गायी असून, आरोग्य तपासणीअंती निरोगी गाईंचे पुणे येथे स्थलांतर केले जाणार आहे. याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. राज्यात लष्कराचे देवळाली कॅम्प (नाशिक), नगर आणि पिंपरी-चिंचवड (पुणे) या तीन ठिकाणी लष्करी गोठे आहेत. या तिन्ही ठिकाणी एकूण ३,२४१ फ्रिजवाल आणि अन्य संकरित गायी आहेत. त्यातील ७१४ गायी देवळाली कॅम्पमधील लष्करी गोठ्यात आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने नुकतीच या गाईंची आरोग्य तपासणी केली असून, यासंबंधी विविध नमुने संकलित केले. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरेदीची प्रक्रिया पार पडणार आहे.  गायी गोठ्यात आणण्याच्या हालचालींना वेग  महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे गोठे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र गाईंच्या संगोपनासाठी असणारी जागेची उपलब्धता मर्यादित आहे. यानुसार गोठ्याचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गायी टप्प्याटप्य्याने या गोठ्यांमध्ये हलविण्यात येतील. सध्या काही गायी पशुसंवर्धन विभागाच्या ताथवडे (पुणे) येथील गोठ्यात आणण्यास सुरवात झाली आहे. कुठल्याही प्रकारच्या रोगांचा संसर्ग होऊ नये, यासाठी लष्कराच्या गोठ्यामधील गाईंची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे. नंतरच या गाई राज्य पशुसंवर्धन विभागाच्या गोठ्यात आणण्यात येतील. या गोठ्यांमधील उपलब्ध गायींमध्ये काही भाकड, काही दुभत्या आहेत. यामध्ये ११० वासरांचाही त्यात समावेश आहे.  प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या लष्करी विभाग व राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात गायी खरेदी करण्यासंबंधी करार करण्यात आला आहे. झालेल्या करारात एक गाय प्रति एक हजार रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. गाईंची उत्पादन क्षमता वाढविणे, नवीन जाती विकसित करणे यासाठी जातिवंत गाईंची गरज असते. अशा गाईंसाठी एक ते दोन लाख रुपये मोजावे लागतात. मात्र लष्कराकडून दर्जेदार फ्रिजवाल गायी खरेदी केल्यामुळे तो खर्च वाचणार आहे. – डॉ. धनंजय परकाळे (सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com