शेतकऱ्यांच्या खात्यात १५०० कोटींची एफआरपी जमा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यातील थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी घेतलेला आक्रमक पावित्रा आणि दुस-या बाजूला साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी सुरू ठेवलेल्या प्रशासकीय पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळेच आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यात एफआरपीचे १५०० कोटी रुपये जमा झाले आहेत.

खासदार शेट्टी यांनी हजारो शेतक-यांसह कैफियत मोर्चा काढला होता. त्यात राज्याच्या कानाकोप-यांतून हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चातील काही शेतकरी, तसेच महिलादेखील आसूड मारून थकीत एफआरपी व दूधदराबाबत संताप व्यक्त करीत होत्या. साखर कारखान्यांनी शेतक-यांचा अंत पाहू नये. थकीत एफआरपी न दिल्यास बळीराजाचा सायलेंट बॉंब आम्ही कधीही फोडू, असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला होता. या वेळी खासदार शेट्टी व साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे मोर्चाची आक्रमकता कमी करण्यात आयुक्तांना यश लाभले होते.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, थकीत एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २० जुलैपर्यंत साखर आयुक्तालयाला मुदत दिली होती. त्या वेळी १८०० कोटी रुपयांची एफआरपी शिल्लक होती. कारखान्यांनी ही थकीत एफआरपी दिली नाही, तर खासदार शेट्टी पुन्हा आयुक्तालयात येणार होते. त्याचा धसका घेत पुढील आंदोलन टाळण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला.

विशेष म्हणजे साखर आयुक्त गेल्या एक महिन्यापासून थकीत एफआरपीचा रोज आढावा घेत होते. आयुक्तालयातील काही संचालक, सहसंचालक, तसेच प्रादेशिक सहसंचालक सतत साखर कारखान्यांच्या संपर्कात होते. या पाठपुराव्यामुळे काही कारखाने हैराण झाले, तर काहींनी कारवाईचा धसका घेतला.

साखर आयुक्तांच्या पाठपुराव्यामुळे आता १८०० कोटी रुपयांपैकी फक्त ३३८ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. ३१ सहकारी व २५ खासगी साखर कारखान्यांनी गेल्या महिन्यांपर्यंत ६९८ कोटी रुपये थकविले होते. यानंतर आयुक्तांनी नोटिसा काढल्यामुळे पुन्हा ३३० कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा झाले. आता उर्वरित रकमेसाठीदेखील सतत पाठपुरावा सुरू आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

एफआरपीची स्थिती ः--

  • एफआरपी थकविणारे सहकारी साखर कारखाने ः ३१
  • एफआरपी थकविणारे खासगी साखर कारखाने ः २५
  • थकलेली एफआरपी ः ६९८ कोटी रुपये 
  • त्यातून वसूल केलेली एफआरपी ः ३३० कोटी रुपये 
  • अद्याप अदा न केलेली एफआरपी ः ३३८ कोटी रुपये
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com