एफआरपीचे दोन टप्पे करण्यासाठी हालचाली

साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार पेमेंट करणे कायद्याने बंधनकारक आहे. ऊस उत्पादकांना कष्टाचा मोबदला मिळालाच पाहिजे. मात्र, किमान दोन टप्प्यांत एफआरपी देण्याची सवलत मिळाल्यास कारखान्यांची आर्थिक दमछाक थांबेल. - बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचे बंधन शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. थकीत एफआरपीमुळे थेट मालमत्ता विकण्याची वेळ कारखान्यांवर येत असल्यामुळे किमान दोन टप्प्यात एफआरपी देण्याची सवलत मिळावी, असा हा प्रस्ताव आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली.

राज्यात यंदा एफआरपीपोटी ५१ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ४३७ कोटी रुपये थकवले होते. एकरकमी एफआरपी देता न आल्याने २२ साखर कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा काढण्यात आल्या. जप्तीच्या भीतीने आर्थिक ताणतणावाखाली जात ३९१ कोटी रुपये कारखान्यांनी भरले आहेत. अजूनही चार कारखान्यांना एफआरपी देता आलेली नाही.

`कारखान्याकडे पैसा असो की नसो, साखरेला भाव मिळो अथना ना मिळो; पण एफआरपी मात्र एकाच टप्प्यात देण्याची सध्याची अट आहे. ही अट मोडल्यावर थेट कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीला सामोरे जावे लागते. ही जाचक अट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात कारखाने आर्थिक संकटात सापडतात. कारण कारखान्यांना कर्जबाजारी झाल्याशिवाय एकरकमी एफआरपी देता येत नाही. मुळात एफआरपी बुडवून आम्हाला कारखाने चालवायचे नाहीत. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षाही जादा पेमेंट दिले आहे,` असे मत सहकारी साखर कारखान्यांच्या सूत्रांनी व्यक्त केले.

खासगी कारखान्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील हंगामात एफआरपीतील वाढ तसेच विक्रमी साखर उत्पादनाचा अंदाज यामुळे साखर कारखान्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. वेळेत निर्यात करून साखरेचा पैसा कारखान्यांना मिळाला नाही तर एफआरपीसाठी पैसा कसा आणायचा असा प्रश्न कारखान्यांसमोर आतापासूनच उभा आहे, असे त्यांनी सांगितले.   एफआरपीच्या वाटपासाठी गुजरात फॉर्म्युला अतिशय उपयुक्त आहे. गुजरातच्या शेतकऱ्यांना देशातील सर्वात जास्त दर मिळतो. तेथे शेतकऱ्यांना तीन टप्प्यात एफआरपी दिली जाते. पहिल्या टप्पा अॅडव्हान्सचा, दुसरा टप्पा हंगाम सुरू झाल्यावर तीन महिन्यांनी आणि शेवटचा तिसरा टप्पा हंगाम संपल्यानंतर मिळतो. या फॉर्म्युल्यामुळे एकाही कारखान्याला एफआरपीसाठी आर्थिक संकट ओढवून घेण्याची वेळ येत नाही, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक  प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.  

असे होणार येत्या हंगामातील एफआरपी पेमेंट

  • १० टक्के मूळ उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल २७५ रुपये.
  • १० टक्क्यांच्या पुढे ०.१ टक्के उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल २.७४ रुपये.
  • १० टक्क्यांपेक्षा कमी आणि ९.५ टक्के उतारा असल्यास ०.१ टक्क्याकरिता प्रतिक्विंटल २.७५ रुपये.
  •  ९.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास प्रतिक्विंटल २६१.२५ रुपये.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com