‘एफआरपी’प्रश्‍नी बेमुदत धरणे आंदोलन सुरू

‘एफआरपी’प्रश्‍नी बेमुदत धरणे आंदोलन सुरू
‘एफआरपी’प्रश्‍नी बेमुदत धरणे आंदोलन सुरू

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी मिळण्यासाठी आता ‘स्वाभिमानी’ पाठोपाठ शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले आहे. श्री. पाटील यांनी त्यांचे सहकारी कालिदास आपेट यांच्यासह साखर आयुक्तालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या वेळी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

“सरकारने १९ जून २०१७ रोजी काढलेल्या आदेशानुसार दूध संघांनी प्रतिलिटर २७ रुपये भाव दिलाच नाही. राज्यात आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने बाजार समित्यांमध्ये खरेदी होत आहे. साखर कारखानदारांनी १४ दिवसांत विनाकपात एफआरपी देण्याचा कायदा मोडीत काढला आहे. त्यामुळे बेकायदेशीर वागणाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाचा झेंडा फडकाविण्याचा अधिकार राहिलेला नाही’’, असे श्री. पाटील यांचे म्हणणे आहे. 

‘‘आंदोलकांशी दुपारपर्यंत तरी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी मिळाल्याशिवाय तसेच दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,’’ अशी माहिती श्री. आपेट यांनी दिली. 

श्री. आपेट म्हणाले की, साखर कारखानदारांच्या चुकांना आयुक्तालय नेहमीच पाठीशी घालते. हजारो कोटी रुपयांची एफआरपी थकीत राहण्यामागे सरकार आणि आयुक्तालयाचा आश्रय कारखानदारांना आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राज्यातील दूध उत्पादक तसेच इतर शेतमाल उत्पादकांच्या मागण्यादेखील सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत.

दरम्यान, २८ जानेवारीला स्वाभिमानीचा देखील राज्यव्यापी मोर्चा धडकणार असल्यामुळे साखर आयुक्तालयात धावपळ सुरू आहे. एफआरपीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनांकडून आयुक्तालयासमोर होणाऱ्या आंदोलनांमध्ये यंदा वाढ झाली आहे. स्वाभिमानीचा मोर्चा तसेच धरणे आंदोलनामुळे आयुक्तालयाच्या परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com