मुंबई बाजार समितीत फळं बाजार सुरु

बई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील फळबाजार सोमवारपासून (त.२०) पूर्ववत सुरु करण्यात आल्याने मुंबई आणि उपनगरात फळांचा पुरवठा सुरु झाला आहे.
fruit market .jpg
fruit market .jpg

मुंबई: मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील फळबाजार सोमवारपासून (त.२०) पूर्ववत सुरु करण्यात आल्याने मुंबई आणि उपनगरात फळांचा पुरवठा सुरु झाला आहे. दररोज आंब्याच्या १०० गाड्यांना प्रशासनाने परवानगी दिली आहे.  बाजार सुरू करण्यासाठी बाजार समितीने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. फळबाजार सुरू करण्याची मागणी मागच्या दोन-चार दिवसांपासून बाजार समितीमधील फळ व्यापाऱ्यांनी समिती प्रशासनाकडे लावून धरली होती. याबाबतची एक बैठक व्यापारी आणि बाजार समिती घटकांमध्ये पार पडली. त्यात हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बाजारातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही नियम नव्याने निश्चित करण्यात आले आहेत.  बाजारात फळांच्या २५० गाड्या येऊ शकणार आहेत. त्यात १०० आंब्याच्या, ७० गाड्या संत्री-मोसंबी, द्राक्षाच्या १५, चिकूच्या पाच, पपईच्या १५, अननसाच्या १५, डाळिंबाच्या पाच, टरबुजाच्या १५ तर आयात फळांच्या १० गाड्या असतील. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत येणाऱ्या गाड्यांनाच प्रवेश मिळेल. खरेदीसाठी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंतची वेळ आखून देण्यात आली आहे. याच बरोबर निर्यात होणाऱ्या फळांचे पॅकेजिंग बाजार आवारात करण्यावरही बाजार समितीने बंदी घातली आहे.  व्यापाऱ्यांना गाळ्यांमध्ये आंबा पिकवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याच प्रमाणे कलिंगड आणि खरबूज यांचा व्यापार करण्यासाठी बाजार समितीजवळील मोकळ्या मैदानाचा वापर केला जाणार आहे, असे बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी स्पष्ट केले. बाजारात व्यापार करताना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. व्यापारी आणि ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. किरकोळ विक्री बंद बाजारातील गर्दी रोखण्यासाठी फळबाजारासह सर्वच बाजारांत किरकोळ विक्री बंद करण्यात आली आहे. बाजारात १५ हजार रुपये किमतीपेक्षा कमी मूल्याचा माल खरेदी करता येणार नाही. असे केल्यास हा माल बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जप्त केला जाईल. शिवाय खरेदीदाराला बाजारात प्रवेश करण्यासाठी खरेदीचा पूर्ण तपशील बाजार गेटवर द्यावा लागणार आहे.

बाजार समितीतील सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंतची आवक अशी भाजीपाला बाजार ः २४५ वाहने कांदा, बटाटा बाजार ः ७२ वाहने फळे बाजार ः १९४ वाहने मसाला बाजार ः ८३ वाहने धान्य बाजार ः लोडिंग असल्याने आवक नाही तर विविध चेकनाक्यावरुन मुंबईत भाजीपाल्याची ३३१ वाहने थेट गेली आहेत.

खारघरमध्ये शेतकरी ते ग्राहक बाजार सुरु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजार आवारात सुरक्षिततेचे नियम कटाक्षाने पाळले जात आहेत. याच अनुषंगाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारातील गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौड यांनी पुढाकार घेऊन खारघरमधील सेंट्रल पार्कच्या मैदानात बाजार सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या ठिकाणी फळे आणि भाजी बाजारसाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे. बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, प्रसाधनगृह यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. येथे सुरक्षित वावराचे आणि निर्जंतुकीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, असे बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले होते. सोमवारपासून हे बाजार खुले झाले असून या ठिकाणच्या बाजाराची संपूर्ण जबाबदारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव नामदेव जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित हे बाजार असून बाजार आवारातील सुविधेचा लाभ घेऊन शेतकरी आणि ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई बाजार समितीने केले आहे. या ठिकाणी ग्राहकांना किरकोळ खरेदी करता येणार आहे. त्यामुळे यासाठी येणाऱ्या खरेदीदारांना येथे मालाची खरेदी करणे सहज शक्य होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com