agriculture news in marathi, fruitrot on grapes due to rain, pune, maharashtra | Agrowon

द्राक्ष बागांवर फळकुजीचे संकट; ५० टक्के थेट नुकसान, २००० कोटींवर फटका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

आगाप द्राक्षाचे अतिशय उत्तम प्रकारे आलेले पीक पावसामुळे खराब झाल्याने कवडीमोल दराने त्याची विक्री प्रक्रिया उद्योगांना करण्याची वेळ आली आहे. या पैशातून उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शासनाने मदत करणे आवश्यक आहे. 
- विठ्ठल सस्ते, शेतकरी, निरगुडी, जि. सातारा.

पुणे : सततचा पाऊस, धुके, ढगाळ वातावरणाने राज्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बागायतदारांना २००० कोटींवर थेट फटका बसल्याचा अंदाज आहे. प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने खर्चाला सुमार राहिला नसून, फवारण्याकरूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. अशातच साधारणत: १५ ऑक्टोबरपासून लागू होणारा हवामान आधारित फळपीक विमा अद्यापही जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या झालेल्या व होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल विचारत तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. 

नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांत मिळून राज्यात सुमारे ३ लाख एकर पेक्षा अधिक द्राक्ष बागा आहेत. नाशिक जिल्ह्याचे दीड ते पावणेदोन लाख एकरांपर्यंत आणि आसपास तेवढेच द्राक्षबागा क्षेत्र सांगली जिल्ह्यात आहे. ज्या बागा फुलोराअवस्थेत आहेत त्यांचे क्षेत्र १५ ते २० टक्के आहेत. या बागांमध्ये घडकुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर ५० टक्के नुकसान तत्काळ स्वरुपात झाले आहे, तर आठ दिवसांनंतर यात आणखी स्पष्टता येणार आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान वाढण्याची भीती आहे. साधारणत: अशा बागांमधील निर्यातक्षम द्राक्षांना किलोला ६५ ते ७५ रुपये दर मिळत असतो. एकरी उत्पादन १० ते १२ टन धरले व त्यातील निर्यातक्षम उत्पादन ८ ते ९ टन धरले तरी बागायतदारांना प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

द्राक्ष बागांत फळकुज... पहा video...

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फुलोरा, फेलफुट, डिपिंग या अवस्थेत आहेत. काही बागांच्या छाटण्या सुरू आहेत. काही बागा पोंगावस्थेत आहेत. काही बागा फेलफुट ते कळीच्या डीप अवस्थेत आहेत. या हवामानामध्ये सगळ्यात जास्त धोका दोडा अवस्थेपासून मणीधारणा अवस्थेपर्यंतच्या बागांना आहे. 

घड जिरण्याची समस्या
सतत पाऊस पडत राहिल्याने ज्या बागा पोंगा अवस्थेत आहेत त्यांच्यातही घड जिरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचे प्रमाण अजून वाढू शकते. हे देखील मोठे नुकसान म्हणायला हवे. सध्या रोगांपासून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा ३० ते ४० टक्के खर्च केवळ बुरशीनाशकांवर होतो आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेला भरमसाठ खर्च यातून बागायतदाराच्या हाती नेमके काय लागणार हाच गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील प्रयोगशील व प्रगतिशील द्राक्ष बागायतदार गणेश मोरे म्हणाले की ज्या बागा पाच- सहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत छाटल्या आहेत (अर्ली) त्या फुलोरा अवस्थेत आहेत. त्यांच्यात घडकूज ही समस्या तयार झाली आहे. हे नुकसान सुमारे २० टक्क्यांपासून ते ४० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. पुढेही पाऊस सांगितला असल्याने नुकसानीची तीव्रता अजून वाढणार आहे. या बागांचा माल जानेवारी ते फेब्रुवारीत सुरू होणार असल्याने त्यांना मोठ्या उत्पादन घटीला सामोरे जावे लागणार आहे.

ज्या बागांची वेळेवर छाटणी झाली आहे किंवा ज्या बागा पोंगा किंवा फुटण्याच्या अवस्थेत आहेत. त्यांच्यात डाऊनी रोगाचा मोठा धोका तयार झाला आहे. सद्यस्थितीत य बागा वाचवणे देखील आव्हानाचे होऊन बसले आहे. मोरे पुढे म्हणाले की शरद सीडलेस, जंबो, आदी कलर वाणांचेही नुकसान होणार आहे. एकतर या वाणांना मागील वर्षीच माल कमी होता. याचे कारण म्हणजे एप्रिलमध्ये त्यांना पाण्याचा ताण सहन करावा लागला होता. पाऊस पडून गेल्यानंतरही घडकुजीचे लक्षण दिसण्यास काही अवधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

असे झाले नुकसान...

  • आगाप द्राक्षांचे ३० ते ८० टक्के नुकसान
  • फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
  • घडांतील मणी पावसाने फुटले 
  • मणी, घडांवर डाऊनीचा मोठा प्रादुर्भाव
  • फवारण्या करूनही उपयोग होण्याची चिन्हे नाहीत

 
पीकविमा अद्याप जाहीर का नाही? : भोसले
दरवर्षीप्रमाणे द्राक्षासाठी यंदा शासनाने पीकविम्याचा जीआर काढलेला नाही. त्याचा सर्वात मोठा फटका बागायतदारांना बसणार आहे. वास्तविक परतीच्या मान्सूननंतर द्राक्षबागांतील जोखीम वाढत असते. जीआर प्रसिद्ध झाला असता तर सध्याच्या संकटाच्या काळात बागायतदारांना त्याचा मोठा लाभ झाला असता. शासनाने ही बाब गंभीरपणे लक्षात घ्यायला हवी होती, असे मत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले यांनी व्यक्त केले. 

प्रतिक्रिया

द्राक्ष पट्ट्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, उत्पादनात ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे.
- चंद्रकांत लांडगे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील द्राक्ष बागा संकटात आल्या आहेत. फुलोऱ्यातील बागांचे थेट ५० टक्के नुकसान आजच झाले आहे. नुकसान वाढणार असून, अशातच दर वर्षी सप्टेंबरमध्ये निघणारा फळपिक विम्याचा जीआर अजूनही जाहीर झालेला नाही. शासनाच्या दिरंगाईचा मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसणार आहे. सरकारने पीक विम्याचा जीआर काढताना यापूर्वीचे नुकसानही गृहित धरावे.
- रविंद्र बाराडे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा द्राक्ष बागायतदार संघ

सततच्या प्रतिकूल हवामानामुळे द्राक्ष बागा खूप अडचणीत आला आहे. प्रत्येकजण द्राक्ष बाग वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. पाऊस पडला, की पावडर असेच काम सुरू आहे. आत्तापर्यंत प्रति किलोला ३५ रुपयांप्रमाणे खर्च झाला आहे. यावरून या संकटाची कल्पना आपणास येईल.
- उमेश भालेराव, द्राक्ष बागायतदार, तिसगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक.


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...