परभणीत इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना भुर्दंड

इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना भुर्दंड
इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना भुर्दंड

परभणी ः इंधनदरात विशेषतः डिझेलच्या दरात लिटरमागे मोठी वाढ झाल्यामुळे शेतीतील यांत्रिक कामे, शेतीमालाची वाहतूक आदींचा खर्च वाढला आहे. तुलनेत शेतीमालाचे बाजारातील दर कमीच आहेत. प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या इंधन दरवाढीचा भुर्दंड शेतकऱ्यांनाच सोसावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. येत्या काळात खताचे तसेच अन्य कृषी निविष्ठांच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतित झाले आहेत.

परभणी येथील पेट्रोल पंपावर रविवारी (ता. १६) सकाळी साडेनऊ वाजता डिझेलचे दर प्रतिलिटर ७८.७८ रुपये, तर पेट्रोलचे दर ९१.०७ रुपये होते राधेधामणगाव (ता. सेलू, जि. परभणी) येथील शेतकरी विनायक गोरे म्हणाले, स्वतःची तसेच गावातील इतर शेतकऱ्यांचे लिंबू पिकअप व्हॅनमध्ये भरून औरंगाबाद किंवा परभणी येथील बाजारापेठेत विक्रीसाठी नेत असतो. आमचे गाव ते औरंगाबाद परतीच्या प्रवासाचे अंतर ३५० किलोमीटर आहे. तसेच परभणीचे १४० किलोमीटर आहे. 

औरंगाबाद आणि परभणी येथील वाहतूक खर्च २ रुपये प्रतिकिलोमीटरने वाढला आहे. त्यामुळे अनुक्रमे ७०० आणि २८० रुपये जास्तीचा खर्च येत आहे. डिझेल दरवाढीच्या तुलनेत शेतीमालाचे दर कमीच आहेत. येत्या काळात खते, कीटकनाशके तसेच अन्य कृषी निविष्ठांच्या किमती वाढू शकतात. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे.

गतवर्षी डिझेल चलित मळणी यंत्राद्वारे काढणीसाठी मूग, उडदाच्या पोत्यासाठी १०० ते १५० रुपये घेतले जात असत. यंदा हे दर १५० ते २०० रुपयेपर्यंत पोचले आहेत. हार्वेस्टरचे दर गतवर्षी १५०० ते २००० रुपये प्रतिएकर होते. यंदा यामध्ये ३०० ते ४०० रुपयांनी वाढ होऊ शकते.

पार्डी (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील शेतकरी शिवाजीराव देशमुख म्हणाले, डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरमालकांनी मशागतीसह अन्य कामांच्या प्रतिएकरी दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ केली आहे. मजुरीचे दर वाढलेले आहेत. इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com