सोलापूर जिल्ह्यात ‘भारत बंद’ला भरभरून प्रतिसाद

सोलापूर : नव्या कृषी कायद्यांना विरोधासाठी देशभर पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात बंदचे वातावरण अधिक राहिले.
 Full response to 'Bharat Bandh' in Solapur district
Full response to 'Bharat Bandh' in Solapur district

सोलापूर : नव्या कृषी कायद्यांना विरोधासाठी देशभर पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात बंदचे वातावरण अधिक राहिले. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कुर्डुवाडी, मंगळवेढा, दुधनी, बार्शी येथील प्रमुख बाजारपेठा पूर्णपणे बंद राहिल्या. 

पंढरपुरात काँग्रेसने, सोलापुरात वंचित आघाडीने निदर्शने करत लक्ष वेधले. तर, सोलापुरात महाविकास आघाडीने शहरात फिरून विक्रेत्यांना बंदचे आवाहन करत फेरी काढली. दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी रोखला. त्यामुळे ‘रास्ता रोको’चा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड करत ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पण, नंतर वातावरण निवळले.

सोलापुरात सकाळपासूनच प्रमुख बाजारपेठ असलेल्या नवीपेठ, मधला मारुती, टिळक चौक, विजापूरवेस, बाळीवेस, एस. टी. स्टॅण्ड परिसरात अनेक दुकाने बंद होती. सोलापूर बाजार समितीचे सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांनी आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. पण, व्यापाऱ्यांनी त्यास विरोध करत बंदमध्ये स्वंयपूर्तीने सहभाग घेत बंद पाळला. त्यामुळे बाजारात पूर्णपणे शुकशुकाट राहिला. कांद्यासह सर्वच व्यवहार बंद राहिले. 

वंचित बहुजन आघाडीने नगरसेवक आनंद चंदनशिवेंच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केली. तसेच अधिकाऱ्यांना भाजीपाला भेट देऊन गांधीगिरी केली. बहुजन समाज पक्षाने देवा उघडे यांच्या नेतृत्खाली चार हुतात्मा पुतळा चौकात निदर्शने करत लक्ष वेधले.  

महाविकास आघाडीचे नेते प्रकाश वाले, पुरुषोत्तम बरडे यांनी शहरात फेरी काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.  पंढरपुरात काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्याशिवाय कुर्डुवाडी, मंगळवेढ्यात पूर्णपणे बंद पाळण्यात आला. करमाळ्यात बाजार समिती, भाजी मार्केट व धान्य बाजारासह सर्व व्यवहार बंद राहिले. बार्शीतही अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्र व्यवहार बंद होते. सांगोल्यातही महूद आणि परिसरात बंद पाळण्यात आला.

‘माकप’च्या कार्यकर्त्यांची धरपकड

माकपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या दत्तनगर येथील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. परंतु, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. पण, तरीही हा मोर्चा सुरुच राहिला. तेव्हा कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडत, रास्ता- रोको करण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले. त्यात एक कार्यकर्ता जखमी झाला. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचा जोरदार निषेध सुरु झाला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण राहिले. पण, नंतर ते निवळले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com