गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वळता

गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वळता
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वळता

अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन गावांतील जवळपास ८१० शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यात कर्जमाफी झाली असून या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वळते करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. अवघ्या तीनच दिवसांत ही प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेण्यास यंत्रणांना यश आले आहे. शुक्रवारी (ता. २८) दुसऱ्या टप्प्यांत उर्वरित सर्वच गावांच्या याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता असून त्या ठिकाणीही प्रायोगिक स्तरावर पहिल्या टप्प्यात राबविलेल्या प्रक्रियेप्रमाणेच जलदगतीने काम केले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली असून, प्रत्येक जिल्ह्यात दोन गावांमध्ये प्रायोगिक स्तरावर २४ फेब्रुवारीला काही शेतकऱ्यांच्या नावाची यादी झळकली होती. अकोला जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन गावांतील सुमारे ८१० शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्या गेली. तीनच दिवसांत या प्रक्रियेचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कार्य २४ तासात संपविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. शासनाकडून प्रयोग म्हणून केवळ दोन गावांत ही प्रक्रिया राबविल्या गेली. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्या सर्व गावांमध्ये कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख ११ हजार ३७७ शेतकऱ्यांची खाती पोर्टलवर अपलोड झालेली आहेत. त्यांपैकी ८१० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. यासाठी बॅंकांकडे सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक निधी वळतीसुद्दा झालेला आहे. दुसरा टप्पा आव्हानात्मक प्रशासनाने पहिल्या टप्प्यात खाती कर्जमुक्त करण्याची प्रक्रीया अवघ्या तीन दिवसात अंतिम टप्प्यात पोचविण्यात यश मिळवले. आता खरा कस दुसऱ्या टप्प्यात लागणार आहे. यात मुख्य अडचण ही नेट कनेक्टीव्हीटीची येऊ शकते, असे अधिकारी सांगत आहेत. राज्यातील एकाच वेळी २५ हजारांवर गावे सर्व्हरचा वापर करणार असल्याने लोड वाढू शकतो. परिणामी, प्रायोगिक टप्पा जितका वेगाने झाला त्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात विलंबाची शक्यता आहे. तरी सुद्धा याद्या प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत हे काम पूर्ण होऊ शकेल, असा दावासुद्धा केला जात आहे. शुक्रवारी दुसरी यादी झळकण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com