agriculture news in Marathi funeral of ganpathrav deshmukh Maharashtra | Page 2 ||| Agrowon

गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 ऑगस्ट 2021

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (ता.३०) रात्री ९:१५ च्या सुमारास सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (ता.३०) रात्री ९:१५ च्या सुमारास सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. शनिवारी (ता. २१) सांगोला सूत गिरणीच्या आवारात त्यांच्या पार्थिवावार शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या आवडत्या नेत्याला अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

गेल्या पंधरा दिवसांपासून देशमुख यांच्यावर सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया ही झाली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली होती. परंतु शुक्रवारी (ता.३०) रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि सव्वानऊच्या सुमारास अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगोल्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली. अनेकांनी सोलापूरसह सांगोल्याकडे धाव घेतली. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव सांगोल्याकडे नेण्यात आले.

आधी पेनूर या त्यांच्या जन्मगावी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सांगोला शहरातून मुख्य मार्गावरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले. शिवाय रस्त्याच्या दुतर्फाही मोठी गर्दी झाली होती. अमर रहे अमर रहे आबासाहेब अमर रहे, आबासाहेब परत या आशा घोषणा देत कार्यकर्ते आपल्या अश्रुला वाट मोकळी करुन देत होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार शहाजी पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी यावेळी उपस्थित होते. 

एक पक्ष, एक मतदार संघ, एक उमेदवार
आणि अकरावेळा विजय 

देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विक्रमी विजय मिळविला. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता. एक पक्ष, एक मतदार संघ आणि एकच उमेदवार तब्बल अकरावेळा आमदार म्हणून विजय ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. 

शेती-पाणी प्रश्नावर पोटतिडक 
शरद पवार यांनी १९७८ मध्ये पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. रोजगार हमी योजना तसेच कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. रोजगार हमी योजनेतून फलोत्पादन योजनेला त्यांच्याच कार्यकाळात अधिक गती मिळाली. त्यामुळेच सोलापूर- सांगोल्यासारख्या दुष्काळी पट्ट्यात फळबाग लागवड वाढीस लागली. गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, पण या प्रत्येक वेळी शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या प्रश्नावर ते कायम पोटतिडकीने बोलत. दुष्काळी तालुक्याच्या पाणी परिषदा तर त्यांनी गाजवल्या. 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...