भाऊसाहेबांना आज अखेरचा निरोप...
भाऊसाहेबांना आज अखेरचा निरोप...

भाऊसाहेबांना आज अखेरचा निरोप...

बुलडाणा : राज्याचे कृषिमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर (वय ६७) यांना आज (ता.१) अखेरचा निरोप दिला जाणार आहे. भाऊसाहेबांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी (ता. ३१) पहाटे पुन्हा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना मुंबईतील सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फुंडकर यांच्या अकाली निधनाने सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. फुंडकर यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवारी) खामगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमाणी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेन रोड, टिळक पुतळा, चांदमारी, शेगाव नाका, शेगाव रोड असे मार्गक्रमण करीत सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.  फुंडकर यांचा जन्म १ ऑगस्ट १९५० रोजी झाला. ते मूळचे नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील रहिवासी होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी तीन महिने तुरुंगातही काढले. यानंतर मिसाबंदी म्हणूनही नऊ महिने ते तुरुंगात होते. १९७७ मध्ये फुंडकर हे राजकारणात सक्रिय झाले. जनसंघाच्या वतीने विदर्भात निवडून येणाऱ्या पहिल्या चार आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. १९७८ आणि १९८० मध्ये ते खामगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.  १९८३ मध्ये कापूस प्रश्‍नावर फुंडकर यांची ३५० किलोमीटरची पदयात्रा त्या वेळी चर्चेचा विषय ठरली होती. अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. त्या बालेकिल्ल्याला फुंडकर यांनी सुरुंग लावला. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आमदार, खासदार झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून फुंडकर यांनी काम केले आहे. त्या काळी राज्यात काँग्रेसचे वर्चस्व असताना पांडुरंग फुंडकर यांनी राज्यात विशेषत: ग्रामीण भागात भाजपचे स्थान मजबूत केले. फुंडकर हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक मानले जात होते.  भाजपमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले असले, तरी फुंडकर यांना २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारमध्ये सुरवातीला मंत्रिपद मिळाले नव्हते. एकनाथ खडसे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्याने खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ८ जुलै २०१६ मध्ये फुंडकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. कृषिमंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, आमदार आकाश फुंडकर आणि सागर फुंडकर ही दोन मुले आहेत. त्यांचे पार्थिव खास विमानाने गुरुवारी दुपारी मुंबईहून अकोला विमानतळ आणि तेथून खामगावकडे नेण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com