मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरण

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वांत अधिक वाढ हरभऱ्यात (९.१ टक्के) होती. सर्वांत अधिक घट सोयाबीनमध्ये (४.५ टक्के) झाली. सर्व खरीप पिकांचे नजीकचे व्यवहार सध्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांच्या डिलिव्हरीसाठी सुरू झाले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, सोयाबीन व हळदीत घट होईल. इतरांचे भाव वाढतील.   या सप्ताहात माॅन्सूनने चांगली प्रगती केली. १ जूनपासून १७ जुलैपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्क्यांनी कमी होता. १७ जुलैपर्यंत तो केवळ २ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आता फक्त उत्तर पूर्व व पूर्व भारतात आहे. इतरत्र तो सरासरीइतका किंवा अधिक झाला आहे. पुढील सप्ताहात माॅन्सूनची प्रगती चालू राहील असा अंदाज आहे. पूर्व भारतातील कसरसुद्धा भरून निघेल अशी अपेक्षा आहे. या वर्षी एकूण पाऊस सरासरी गाठेल हा अंदाज बरोबर ठरेल असे दिसते. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन त्यामुळे वाढेल. पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका रब्बी मक्याच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. १,२५४ ते रु. १,१८३). या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी वाढून रु. १,२६४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१७८ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३१६ वर आहेत. उत्पादन वाढलेले आहे. खरिपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतींत यापुढे घट संभवते. जर साठा असेल तर तो विकून टाकणे योग्य होईल. खरीप मका (सांगली)चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३१ आहे. नवीन हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). साखर साखरेच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. २,८९३ ते रु. ३,११०). या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,२२१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२०० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. डिसेंबर (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,२२१ वर आल्या आहेत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. ३,३१७ ते रु. ३,४७१), नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ४.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,३४६ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५४३ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८, डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३२९, रु. ३,३६०, रु. ३,३९१ व रु. ३,४२२ आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ७,०९२ व रु. ७,५२८ दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,१४२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३२१ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,१५६). मागणी टिकून आहे. आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाऊस चांगला होत असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. गहू गव्हाच्या (ऑगस्ट २०१८) किमती १३ जूननंतर वाढत होत्या (रु. १,७९१ ते रु. १,८४८). या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. १,९१७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,८९१ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९२४). पुढील दिवसांत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,७३८ ते रु. ३,९९८). या महिन्यातसुद्धा तोच कल कायम आहे. गेल्या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,१४६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ४,१८१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती १ टक्क्याने वाढून रु. ४,०८६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१९६). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ३,३५३ रु. ३,६३५ या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ६.६ टक्क्यांनी वाढून रु. ३,८५९ वर आल्या होत्या. याही सप्ताहात त्या ९.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,२११ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२०८ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.७ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,३२३). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे ही वाढ होत आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती १२ जून नंतर घसरत आहेत (रु. २४,११० ते रु. २२,८००). गेल्या सप्ताहात मात्र त्या ३.५ टक्क्यांनी वाढून रु. २३,४९० वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १.३ टक्क्यांनी वाढून २३,७९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,१३७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती अनुक्रमे रु. २३,१६० व रु. २३,०७० आहेत. किमतींत वाढीचा कल आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com