नाशिकमध्ये भरला साहित्यप्रेमींचा मेळा 

येथील कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची शुक्रवारी (ता. ३) सुरुवात भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. यासाठी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी दाखल झाले आहेत.
A gathering of literature lovers in Nashik
A gathering of literature lovers in Nashik

नाशिक : येथील कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची शुक्रवारी (ता. ३) सुरुवात भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. यासाठी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी दाखल झाले आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषिमंत्री दादा भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. 

साहित्य संमेलनाचा प्रारंभ करणाऱ्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी लितीन मुडांवरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक-प्रमुख कार्यवाहक जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समितींचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, सर डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.

ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भागवत गीता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी प्रकृतीच्या कारणास्तव संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे आयोजकांना कळविले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ऑनलाइन उपस्थिती दर्शविली. तसेच माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो देखील प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे समारोप कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

मराठी भाषेत विज्ञान साहित्य अल्प प्रमाणात ः डॉ. नारळीकर विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. जगभरातील विज्ञान साहित्याचा आवाका पाहता आपल्याकडे मात्र अशा प्रकारचे लेखन मराठी साहित्यात अत्यल्प प्रमाणात निर्माण झाले,  अशी खंत ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जावेद अख्तर, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी संमलेनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले, सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, उत्तर कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख, बडोदा संस्थांनच्या शुभांगिनीराजे गायकवाड, भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सारस्वतांच्या स्वागतासाठी कुसुमाग्रजनगरी सजली आहे. पावसाचे वातावरण असले, तरी संपूर्ण काळजी घेत संमेलनाच्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन आखले आहे. हे संमेलन नाशिककरांचे असून, शहराचे नाव जागतिक पातळीवर पोचण्यासाठी नियोजनात कुठलीही उणीव भासणार नाही, याची परिपूर्ण काळजी घेण्यात येत आहे.  - छगन भुजबळ, स्वागताध्यक्ष   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com