सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला दे: राजू शेट्टी

Raju shetty
Raju shetty

पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांचा सात-बारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी त्यांच्या आश्वानावर विश्वास ठेवून त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. पण सरकार सत्तेवर येऊन पन्नास दिवस उलटून गेले, तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होऊ शकली नाही, असे सांगत विठ्ठला... उद्धव ठाकरे सरकारला आता तरी शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करण्याची सुबुद्धी दे, असे साकडे शुक्रवारी (ता.२४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी विठ्ठलाला घातले. शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्या ठाकरे सरकारला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देऊन त्यांचा सात बारा उतारा कोरा करावा, एफआरपीची थकीत रक्कम त्वरित मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी श्री. शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघनटेच्या वतीने येथील संत नामदेव पायरीजवळ सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी शेट्टी यांनी ठाकरे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टिकास्त्र सोडले.  शेट्टी म्हणाले, ‘‘भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेला मतदानाचा अधिकार काढून टाकल्याने ठाकरे सरकारही शेतकरी विरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्ठात आणून बाजार समित्या हा राजकीय अड्डा बनवण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफीचा लाभ काही शेतकऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे  सरकारने थकबाकी बरोबरच चालू पीक कर्जही माफ करावेच, पण सरसकट सात-बारा कोरा करण्याचे दिलेले आपलेच आश्‍वासन पूर्ण करावे.’’  ‘‘राज्यातील सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज ठाकरे जर शॅडो कॅबिनेटसारखी संकल्पना राबवत असतील, तर त्यांच्या संकल्पनेचे स्वागत आहे’’, असेही ते म्हणाले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, सचिन पाटील, नवनाथ माने, समाधान फाटे, अतुल कारंडे, रणजित बागल, विष्णुपंत बागल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा सदाभाऊ खोत यांची सांगली जिल्ह्यातील कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी ईडीमार्फत स्वतंत्रपणे चौकशी करावी, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यातील हजारो लोकांची फसवणूक झाली आहे. यातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी सरकाने गंभीर दखल घ्यावी. सदाभाऊ खोत हे केवळ सत्तेसाठी लाचार झाले आहेत. त्यांनी केलेली टीका मी फारसी मनावर घेत नाही, असेही शेट्टी म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com