नीरेपासून साखरनिर्मितीचा रत्नागिरीत प्रयोग

The gemstone experiment of making sugar from Nira
The gemstone experiment of making sugar from Nira

रत्नागिरी ः नारळाच्या झाडातून काढल्या जाणाऱ्या नीरेचा साखरनिर्मितीसाठी उपयोग केला जातो. याचा पहिला प्रयोग केरळमध्ये झाला. आता रत्नागिरीतील भाट्ये नारळ संशोधन केंद्रात हा प्रयोग यशस्वीपणे केला आहे. मधुमेही रुग्णांकरिता ही साखर उपयुक्त असून, भविष्यात त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.

नीरा हे पेय म्हणून कोकणात ओळखले जाते. त्यापासून माडी बनविली जाते. नीरेमध्ये केवळ १४ ते १८ टक्के साखर असते. उसापासून तयार केलेल्या साखरेत ग्लाईसेमिक निर्देशांक ६५ असतो; मात्र नीरेपासून बनविलेल्या साखरेत ग्लाईसेमिक निर्देशांक ३५ एवढा कमी असल्यामुळे ती मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी आरोग्यदायी मानली जाते. नारळाच्या पुष्पसंभारातून सूर्योदयापूर्वी जो रस येतो त्याला नीरा म्हणतात. त्यापासून साखर, मध तयार केलेले जातात. नारळाची लागवड कोकणात होते. त्यामुळे नीरेपासून साखरेचे उत्पादन फायदेशीर ठरू शकते. भारतात मधुमेहींचे प्रमाण अधिक आहे. गोड खायचे असेल तर नीरेपासून तयार केलेली मिठाई, गोड पदार्थ हे मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त आहेत.

अशी बनते साखर नीरेपासून साखर बनविण्याची प्रक्रिया सोपी आहे. २० ते २५ वर्षे असलेल्या नारळाच्या झाडापासून दीड ते दोन लिटर नीरा मिळते. सूर्योदयापूर्वी काढलेली ही नीरा आरोग्यदायी आहे. नीरा स्टीलच्या भांड्यात घेऊन गॅसवर घट्ट होईपर्यंत तापवायची. थंड केल्यावर त्याचा एक खडा तयार होतो. तो मिक्सरमध्ये बारीक केला की त्याची साखर बनते. उसाच्या साखरेचा रंग पांढरा असतो तर या साखरेचा रंग तांबूस असतो. रत्नागिरीतील भाट्ये नारळ संशोधन केंद्रात ही साखर बनवण्यात यश आले आहे.

अशी काढली जाते नीरा नारळाच्या पुष्पसंभाराला म्हणजे पोईला दोरीने घट्ट बांधायचे. त्या पोयीचा समोरचा भाग कोयतीने कापायचा आणि त्यानंतर नीरासंकलन करण्यासाठी तयार केलेले भांडे पुढे लावायचे. ती नीरा दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी काढायची असते. सूर्योदयानंतर नीरा काढल्यास त्याचे गुणधर्म बदलतात व त्याला ताडी किंवा माडी म्हणतात.

गोड खायचे असेल तर नारळच्या नीरेपासून बनविण्यात येणारी साखर मधुमेहींसाठी उपयुक्त ठरू शकते. याला भविष्यात मागणी वाढेल. - डॉ. वैभव शिंदे, विद्यावेत्ता, कोकण कृषी विद्यापीठ

रत्नागिरीतल्या भाट्ये नारळ संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर हा प्रयोग स्वत: केला आणि साखर तयार झाली. ती अनेक लोकांना दाखवली, त्यांना ती आवडली. डायबेटिस रुग्णांकडून मागणीही आली. महिन्याला शंभर किलो साखरेची विक्री होते. एक लाख रुपयांच्या व्यवसायात ३० ते ४० हजार रुपये नफा होतो. हा प्रयोग केरळमध्ये झाला.- तुषार आग्रे, व्यावसायिक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com