कार्व्हर यांची कृषी कर्मभूमी पाहून भारावले चाहते

'अॅग्रोवन'च्या माध्यमातून बुधवारी (ता.१८) अमेरिकेतील टस्केगी विद्यापीठातील डॉ.कार्व्हर यांच्या कर्मभूमीचे दर्शन आणि तेथे कार्यरत असलेल्या भारतीय कृषी शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याचा योग जुळून आला.
कार्व्हर यांची कृषी कर्मभूमी पाहून भारावले चाहते
कार्व्हर यांची कृषी कर्मभूमी पाहून भारावले चाहते

पुणे : “भौतिक नव्हे; तर नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि उपयोगातून सुख समृद्धी साधा. लहान शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सातत्याने नवनवीन संशोधन करा आणि प्रत्यक्ष शेतीमध्ये रूजवा” असा मंत्र जगाला देणारे ऋषितुल्य थोर कृषी शास्त्रज्ञ डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे मराठी माणूस आणि वाचनप्रिय शेतकऱ्यांवर गारूड कायम आहे. 'अॅग्रोवन'च्या माध्यमातून बुधवारी (ता.१८) अमेरिकेतील टस्केगी विद्यापीठातील डॉ.कार्व्हर यांच्या कर्मभूमीचे दर्शन आणि तेथे कार्यरत असलेल्या भारतीय कृषी शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याचा योग जुळून आला. दै.ॲग्रोवन आणि सगुणा रूरल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रोवनच्या फेसबुकवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लेखिका वीणा गवाणकर यांच्या ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक गेल्या चाळीस वर्षांपासून वाचकांवर अधिराज्य गाजवत आहे. नुकतीच या पुस्तकाची ४५ वी मराठी आवृत्ती प्रसिद्ध झाली. डॉ.कार्व्हर यांची कर्मभूमी असलेल्या टस्केगी विद्यापीठाचे प्रत्यक्ष दर्शन आणि लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी संवाद अशी दुहेरी भेट वेब संवाद रूपाने ‘अॅग्रोवन’ने वाचकांसाठी घडवून आणली. हा संवाद ‘फेसबुक’वर चांगलाच रंगला. या कार्यक्रमामध्ये डॉ.कार्व्हर यांच्या कार्याविषयीचा मूकपटही दाखविण्यात आला.

डॉ.जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (१८६४-१९४३) हे अमेरिकेतील कृष्णवर्णीय कृषी शास्त्रज्ञ. डॉ.कार्व्हर यांनी आपले सारे आयुष्य कृषी संशोधन आणि कृष्णवर्णीयांच्या शिक्षणाला वाहून घेतले. त्यांनी भुईमूग, बटाटा, कापूस आदी पिकांच्या लागवडीबरोबरीने प्रक्रियेतही मौलिक संशोधन केले.ते सामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंतही पोहोचविले. जमीन सुपीकता, नैसर्गिक शेती, आंतरपिके तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी तंत्रज्ञान विस्ताराचा पाया डॉ.कार्व्हर यांनी रचला. या कार्यक्रमात टस्केगी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.सी.एस. प्रकाश यांनी डॉ.कार्व्हर यांच्या कर्मभूमीचे थेट दर्शन घडवीत त्यांच्या कृषी संशोधनाबाबत मौलिक माहिती दिली. “डॉ.कार्व्हर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू होता. कृषी विस्ताराची संकल्पना कार्व्हर यांनी मांडली. भारतात या संकल्पनेचा विस्तार हरितक्रांतीच्या काळात तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री सी.सुब्रम्हण्यम आणि ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांच्यामुळे झाला. त्यामागे कार्व्हर यांची प्रेरणा होती,” असे ते म्हणाले. अमेरिकी कृषी संशोधन संस्थेचे (युएसडीए, निफा) प्रमुख आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. पराग चिटणीस यावेळी म्हणाले की,आम्ही कार्व्हर वाचत मोठे झालो. अमेरिकेत कृषी संशोधन करताना मला टस्केगी विद्यापीठातही काही काळ काम करण्याची संधी मिळाली. सध्या अमेरिकी कृषी संशोधन संस्थेच्या माध्यमातून डॉ.कार्व्हर यांचे संशोधन, विचार आणि कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे काम करताना आनंद होतो आहे. भारतात देखील कार्व्हर यांचे विचार चंद्रशेखर भडसावळे यांच्या परंपरेतील अनेक प्रयोगशील शेतकरी आणि शास्त्रज्ञ पुढे नेत आहेत. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि यंदाच्या कार्व्हर पुरस्काराचे मानकरी डॉ.प्रमोद चौधरी संवाद साधताना म्हणाले की,आम्ही जैव व हरित ऊर्जा उत्पादनासंबंधी संशोधन करीत आहोत. इथेनॉल आणि बायोगॅसवर आधारित औद्योगिक उत्पादने आम्ही विकसित केली आहेत. पंजाब, हरियाणामध्ये भाताचे पिंजार जाळण्याच्या समस्येवर योग्य उपाय असलेला प्रकल्प आम्ही उभारत आहोत. त्याचा निश्चितपणे शेतकरी आणि उद्योगक्षेत्राला फायदा होणार आहे. ग्रामीण आणि कृषी जीवनाच्या विकासाची तत्त्वे सांगणारे डॉ. कार्व्हर हे आमचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या नावाने भारतीय प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी ‘कार्व्हर क्लब' स्थापन करण्याची गरज आहे. ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण म्हणाले की, जागतिक स्तरावर कार्य असलेल्या डॉ. कार्व्हर यांचा परिचय वीणा गवाणकर यांनी पुस्तक रूपाने महाराष्ट्राला करून दिला. आता ‘कार्व्हर क्लब’ ही सुंदर संकल्पना पुढे नेण्यासाठी ‘अॅग्रोवन’ पुढाकार घेईल. कारण, शेती हे शास्त्र आणि व्यवसाय असल्याची संकल्पना ‘अॅग्रोवन’ रुजवत आहे. कार्व्हर यांचे चाहते आणि शेतकरी यांना सोबत घेत आपण ‘कार्व्हर क्लब’ला एक खुले व्यासपीठ म्हणून पुढे आणत आहोत.

सगुणा रूरल फाउंडेशनचे प्रमुख आणि संशोधक शेतकरी चंद्रशेखर भडसावळे म्हणाले की, शेती आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा देण्याचे कार्य दै.अॅग्रोवन करीत आहे. हेच कार्व्हर यांचे स्वप्न होते. त्यामुळे ‘कार्व्हर क्लब' ही संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अनोखी भेट असणार आहे. कार्व्हर वृत्तीचा प्रसार व्हावा ः वीणा गवाणकर वीणा गवाणकर यावेळी म्हणाल्या की, मी कार्व्हर याचा जीवन प्रवास मांडणारे पुस्तक लिहिले. पण त्यांची कर्मभूमी आणि तेथे कार्यरत असणाऱ्या भारतीय कृषी शास्त्रज्ञांसोबत एकाच वेळी संवाद आणि दर्शन हा दुर्लभ योग मला अत्यानंद देणारा आहे. देशात ९० च्या दशकात पुस्तकातून प्रेरणा घेत राज्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी कार्व्हर सोसायटी सुरू करून कृषी तंत्रज्ञानाची देवाण घेवाण सुरू केली होती. या कार्व्हर वृत्तीला रचनात्मकपणे पुढे नेण्यासाठी आता संघटीतपणे सर्वांना काम करावे लागेल. डॉ.कार्व्हर यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला होता. तो सध्याच्या परिस्थितीत मार्गदर्शक ठरतो आहे. जमिनीची सुपीकता जपत आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाला आता सर्वांनी मिळून नवी दिशा देण्याची गरज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com