पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भर

Updated packaging mechanism
Updated packaging mechanism

उत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व भागांमध्ये तृणधान्ये आणि शुगर बीटची लागवड आहे. इतरत्र डोंगराळ प्रदेश अधिक असल्याने शेतकरी भाजीपाला, दुग्ध व्यवसाय आणि मांसासाठी पशुपालन, वराह पालन करतात. या देशाने बँकिंग, सहकार, शेती आणि पशूपालन व्यवसायामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. जर्मनी देशाची राजधानी बर्लिन आणि आर्थिक राजधानी फ्रँकफर्ट आहे. या देशाची राष्ट्रीय भाषा जर्मन आहे. बर्लीन, हॅमबर्ग, म्युनीच, कोलोन, स्टुटगर्ट ही जर्मनीतील प्रमुख शहरे आहेत. जर्मनीची लोकसंख्या सुमारे ८.३० कोटी आहे. या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे. जर्मनी हा जगातील तिसरा क्रमांकाचा आयात- निर्यात करणारा देश आहे. देशाने मोफत शिक्षणाचा स्वीकार केला आहे. अतिप्रगत देशांमध्ये जर्मनीचा समावेश होतो. या देशाने बँकिंग, सहकार, शेती आणि पशूपालन व्यवसायामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. देशाच्या एकूण क्षेत्राच्या १/३ जमीन जंगल व्याप्त आहे. कृषी क्षेत्राचा विकास

  • जर्मनीमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या औद्योगिकीकरणाच्या काळापासून आणि विसाव्या शतकादरम्यान शेती करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शेती क्षेत्राचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील वाटा अत्यंत कमी आहे. देशाचे निम्म्याहून जास्त क्षेत्रफळ जंगल आणि शेती व्यवसायाने व्यापलेले आहे. त्यामुळे पर्यावरण व आरोग्य विषयक बाबी या क्षेत्राचा सबंध असल्याने जर्मनीच्यादृष्टीने कृषी क्षेत्र महत्त्वाचे आहे.  
  • येथील प्रदेशानुसार शेती उत्पादने बदलतात. उत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व भागांमध्ये तृणधान्ये आणि शुगर बीटची लागवड आहे. इतरत्र डोंगराळ प्रदेश अधिक असल्याने शेतकरी भाजीपाला, दुग्ध व्यवसाय आणि मांसासाठी पशुपालन, वराह पालन करतात. बहुतेक सर्व मोठ्या शहरांच्या बाहेर फळबाग आणि भाजीपाला लागवडीचे क्षेत्र दिसते. दक्षिण आणि पश्चिम जर्मनीतील बहुतेक नदी खोऱ्यांमध्ये द्राक्ष बागा आहेत. जगामध्ये जर्मन बियर प्रसिद्ध आहे. या बियरचे उत्पादन प्रामुख्याने बावेरियामध्ये होते. वाइन प्रामुख्याने राईनलँड, पॅलेटिनेटमध्ये तयार केली जाते.  
  • जर्मनीमध्ये पशूपालन, कुक्कुटपालन, अन्नधान्य तसेच मांस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या देशामध्ये विविध प्रकारची शेती उत्पादने होत असली तरी फक्त दीड टक्के लोक शेती करतात. आपल्या देशामध्ये ६५ टक्के लोक शेती करतात. प्रगत देश व आपल्या देशातील शेतीमध्ये सर्व बाबतीत मोठी तफावत आहे. जर्मनी, इस्त्राईल, ब्राझील आणि अमेरिका या प्रगत देशामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे प्रमाण जास्त आहे. चीनमध्ये ६० टक्के लोक शेती करतात. इस्त्राईल, ब्राझील, अमेरिका आणि इतर प्रगत देशांनी शेती आणि पूरक व्यवसायामध्ये चांगली क्रांती केली असली तरी तेथील शेतकऱ्यांच्यापुढे अडचणी आहेत.
  • सहकाराचे प्रशिक्षण केंद्र मोन्टॅबर

  • वेस्टरवोल्ड्रेस राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मोन्टॅबर शहर वसले आहे. या ठिकाणी सहकारासंबंधी प्रशिक्षण देणाऱ्या मोठ्या संस्था आहेत. या संस्थांमधील प्रशिक्षण केंद्रामध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.  
  • १९७३ मध्ये सुरू झालेली सहकारी प्रशिक्षण संस्था ४५ वर्षे राष्ट्रीय आणि १० वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करते. ही संस्था अर्थ, सहकार, पणन, शीतगृह व्यवस्थापन आणि नेतृत्व विकासाबाबत मार्गदर्शन करते. जगभरातील तज्ज्ञ या ठिकाणी मार्गदर्शनासाठी येत असतात.
  • ॲकॅडमी ऑफ जर्मन को-ऑपरेटिव्ह

  • सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जर्मनीमधील कृषी उद्योग आणि ग्रामीण सहकाराचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी मोन्टॅबर या ठिकाणी ॲकॅडमी ऑफ जर्मन को-ऑपरेटिव्ह या प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याचबरोबरीने या शहरात अकॅडमी ऑफ जर्मन टेक्नोलॉजी ही संस्था कार्यरत आहे. या ठिकाणी चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, शैक्षणिक उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाते. या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  
  • संस्था सहकारी बँका तसेच सहकारी संस्थांसाठी उच्च दर्जाचे व्यवस्थापन व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करते. जर्मनीतील एक अग्रगण्य व्यवस्थापन अकॅडमी अशी या संस्थेची ओळख आहे. जर्मनीमध्ये सहकार व कृषी विकासाची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. जगभरातून दरवर्षी पंचवीस हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.
  • शेतकऱ्यांना मदतीचे धोरण

  • जर्मनीमधील शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय स्वीकारलेला आहे. या देशात उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, लागवडीपासून ते काढणीपर्यंत कृषी यांत्रिकीकरण, साठवणूक सुविधा, शीतगृहांची सोय मोठ्या प्रमाणात आहे. विविध सुविधा उपलब्ध केल्यामुळे काही प्रमाणात शेती व्यवसाय किफायतशीर आहे.  
  • जर्मनीमधील शेतकऱ्यांची नवीन पिढी शेती करण्यास उत्सुक नाही, परंतु वडिलोपार्जित शेती केली पाहिजे आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या देशातून फळे, भाजीपाला, मांस इत्यादीचे उत्पादन मिळालेले पाहिजे म्हणून येथील लोक शेती करतात. शासनातर्फे शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्व प्रकारची मदत केली जाते.  
  • प्रामुख्याने युरोपीय संघाच्या शेतीसंदर्भातील धोरण बदल तसेच अडचणीच्या काळात शेतकरी आणि सहकारी संस्थांना सर्वतोपरी मदत केली जाते. उत्पादित शेतमालाला खात्रीशीर बाजारपेठ आहे. उत्पादित शेतमालावर खात्रीशीर प्रक्रिया केली जाते. उत्पादित मालावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण ७० टक्के आहे. या देशातून फळे, भाजीपाला निर्यात केला जातो.
  • संपर्कः डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२० (लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com