जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसर

जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसर
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसर

सांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला पाणी मिळू नये, यासाठी कर्नाटकातील लोकप्रतिनिधी, जनतेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. परिणामी महाराष्ट्र आणि कर्नाटक पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. 

जतच्या ४२ गावाचे क्षेत्र ७३ हजार ०१४ हेक्‍टर आहे. हिरेपसलडगी योजनेतून जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देणे शक्‍य असल्याची चर्चा आहे. २०१३ मध्ये या ४२ गावांना तांत्रिकदृष्ट्या पाणी कसे देता येईल, याचा अहवाल तयार केला. तो शासनाकडे दिला. दरम्यान, कर्नाटकातील तुबची-बबलेश्‍वर योजनेतून या गावांना पाणी देणे शक्‍य होईल, असा अहवाल पाटबंधारे विभागाने तयार केला. त्यानुसार या योजनेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १० कोटी रुपये मंजूर केले. परंतु त्यानंतर ही योजना पूर्ण करण्यासाठी दोन्ही राज्यांतील सरकारने पुढाकार घेतला नाही. 

गेल्या वर्षी सांगली येथील पाटबंधारे विभागात कर्नाटक आणि राज्यातील पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. लवकरच पाणी देण्याचा निर्णय त्यात झाला. परंतु गेल्या सहा महिन्यांपूर्वी पुन्हा या योजनेतून जतला पाणी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तुबची-बबलेश्वर योजना सुरू करून पाणी दिले. ही केवळच चाचणी होती. 

जत तालुक्‍यातील पूर्व भागाला पाणी देण्यासाठी सरकारच्या कोणत्याही हालचाली नसल्याचे चित्र आहे. जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांचे अंदाजे क्षेत्र ७३ हजार १४ हेक्‍टर आहे. ही योजना सुरू झाल्यास सुमारे ३५ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही सरकारांनी ही योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  

या योजनेतून ३२ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल. सुमारे ३९ किलोमीटर अंतरापर्यंत मुख्य वाहिनी आहे. होनवाड, तळसंग, बिजरगी, तिकोटा, कोट्टलगी, कनमडी असे एकूण सहा शाखा कालवे आहेत. त्यांच्याद्वारे नैसर्गिक उताराने पाणी दिले जाईल.  अलमट्टी धरणातून जतच्या ४२ गावांना पाणी द्या, असा प्रस्ताव राज्य शासनाने कर्नाटक सरकारकडे ठेवला. पण तो कर्नाटक सरकारने फेटाळला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com