"त्यांच्या' वेदनांवर फुंकर घालण्यासाठी अख्खा गाव सरसावला

पुरग्रस्त मदत
पुरग्रस्त मदत

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : भामरागडचा महापूर... हजारोंना बेघर करणारा. शेतकऱ्यांनी कष्टाने पेरलेली हजारो हेक्टर शेती बुडाली. त्या क्षणाच्या अनंत वेदना आठवणीत साठल्या. आता पूर ओसरलाय पण वेदनांचा पूर अद्यापही कायम आहे. अशात एका लहानशा अख्ख्या गावाने त्यांना आगळीवेगळी मदत देत माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात यंदा पावसाने कहर केला. एक दोन नव्हे तर सतत सातवेळा आलेल्या महापुराने सारंच उद्ध्वस्त झालं. हजारो कुटुंबे बेघर झाली. यंदा चांगला पाऊस आहे त्यामुळे प्रंचड कष्टाने शेतकऱ्यांनी पेरलेली हजारो हेक्टर शेती पुरती डुबली. शेती गेली, घरही गेलं. जीवनाश्यक वस्तू वाहून गेल्याने पोट भरण्याचेही वांदेच. वारंवार येत असलेल्या पावसाने प्रशासनालाही मदतीसाठी मोठी अडचण झाली. अशात पूर ओसरला. पण भामरागडच्या पूरग्रस्तांच्या वेदंनाचा पूर कायम आहे. त्यांना मदतीसाठी अनेक हात समोर येत आहेत. पण, गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील ग्रामवासियांनी त्यांना केलेली मदत आगळीवेगळी अन्‌ तितकीच प्रेमाचीही ठरली आहे. घडोली हे साधारणत शंभर कुटुंबीयाचं गावं. गावातील ग्रामवासिय शेती करून आपली उपजीविका करतात. यंदा सातत्याने आलेल्या पावसानं त्यांचंही बरंच नुकसान झालं. भामरागड येथील महापुराने हजारो नागरिकांच्या आपबितीची माहिती त्यांना मिळाली. अशात आपणालाही काही मदत करता येईल का याबाबत गावकऱ्यांनी बैठक घेतली. अनं मग वेळ आली प्रत्यक्ष मदत घेण्याची. गावातील प्रत्येकांनीच आपआपल्या परीने मदतीचा हात दिला. कुणी तांदूळ दिले. कुणी दाळ दिली. काहींनी भाजीपाला व किराणाचे साहित्य तर काहींनी नगदी स्वरूपाची रक्कम. बघता बघता बरीच मदत जमा झाली. गावकऱ्यांनी मदत देण्यासाठी पध्दतशीर नियोजन केले. सात किलो तांदूळ, एक किलो तुळीची दाळ, एक पाव मिरची पावडर व इतर अनेक जीवनाश्यक वस्तूंचा समावेश असलेली एक किट तयार केली. अशा एकूण एकशे एक किट्स झाल्या. याचसोबत लहान मुलांना कपडे, पुरुषांना पॅन्ट, शर्ट, धोतर व स्त्रियांना साडी व लुगड असं संपूर्ण साहित्यांनी भरलेली वाहन घेऊन गावातील एकावन्न महिला पुरूष तरुण व लहान मंडळी भामरागडला पोचली. तेथील तहसीलदाराची भेट घेत त्यांना मदतीबाबतची माहिती दिली व प्रत्यक्ष गावकऱ्यांना मदत देण्याबाबत माहिती दिली. त्यांनीही होकार दिला. मग काय ही सगळी मंडळी भामरागडहून कुडापुडी व लगतच्या दोन गावांत पोचली. उपस्थितांचे स्थिती बघता त्यांनी संपूर्ण मदत या गावांना बहाल केली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या भेटीने त्या गावातील नागरिक अक्षरशः भारावले. त्यांना मदतीचा हात देत ही गावकरी मंडळी समाधानाने परतली. ना जाहिरातबाजी ना प्रचार अलीकडे कुणीही लहानशी मदत दिली की त्याचा गाजावाजा करतात. मदत लहानशी अन्‌ त्याची जाहिरात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर केली जाते. पण, घडोली येथील नागरिकांनी कसलीही जाहिरातबाजी न करता अतिशय समर्पक भावाने केलेली मदत बरेच काही सांगून जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com