कापूस प्रक्रियेसाठी मे ऐवजी मार्चचे निकष लावा : जिनर्स असोसिएशन

शेतकऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये वेचणी केलेला कापूस असल्याने त्यावर प्रक्रियेसाठी मे ऐवजी मार्च महिन्याचे निकष लावण्यात यावे, असे पत्र जिनर्स असोसिएशनकडून देण्यात आले आहे.
कापूस प्रक्रियेसाठी मे ऐवजी मार्चचे निकष लावा : जिनर्स असोसिएशन
कापूस प्रक्रियेसाठी मे ऐवजी मार्चचे निकष लावा : जिनर्स असोसिएशन

नागपूर : सीसीआय आणि जिनर्समध्ये अटी आणि नियमांबाबत एकमत होत नसल्याने राज्यात कापूस खरेदी वेग घेत नसल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये वेचणी केलेला कापूस असल्याने त्यावर प्रक्रियेसाठी मे ऐवजी मार्च महिन्याचे निकष लावण्यात यावे, असे पत्र जिनर्स असोसिएशनकडून देण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय न झाल्याने सीसीआयची खरेदीबाबत साशंकता व्यक्‍त होत आहे.

लॉकडाऊनमुळे कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांची स्थिती अडकित्त्यात अडकल्यागत झाली. हमीभाव खरेदीच बंद असल्याने व्यापाऱ्यांकडून खेडा खरेदीत अवघ्या तीन ते साडेतीन हजार रुपये क्‍विंटल दराने कापसाला मागणी होत आहे. सीसीआय व पणन महासंघाची खरेदी सुरू व्हावी याकरिता शासनावर दबाव वाढल्यानंतर सोमवार (ता.२०) पासून राज्यात कापूस खरेदीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर गेल्या तीन दिवसात केवळ १२ ठिकाणी कापूस खरेदी सुरू होऊ शकली. असे आहेत निकष एप्रिल महिन्यात कापसाची खरेदी होत त्यावर मे महिन्यात जिनिंग प्रक्रिया होणे अपेक्षीत राहते. त्यानुसार मे महिन्याकरिता एक क्‍विंटल कापसापासून ३५.१० किलो रुई तसेच १.७५ टक्‍के शॉर्टेज असा निकष सीसीआयचा आहे. जिनर्स मात्र ही अट मानायला तयार नाहीत. त्यांच्या मतानुसार शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात कापूस वेचला. त्यानंतर पहिल्या पंधरवड्यात होळीसारख्या सणामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणता आला नाही. २१ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले. फेब्रुवारीमधील कापसावर मार्च महिन्यात जिनिंग होईल. मार्च महिन्याकरिता एक क्‍विंटल कापसापासून ३३.५० रुई तर सव्वा दोन टक्‍के घट गृहीत धरण्याचा नियम आहे. त्याच निकषाने खरेदी करावी, असे पत्र जिनर्स असोसिएशनने सीसीआयला दिले आहे. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून सीसीआयकडून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कापूस खरेदी सुरू होण्याबाबतच अनिश्चितता आहे.

अशी आहे जिल्हानिहाय्य खरेदी केंद्रांची स्थिती नांदेड ः दोन (सीसीआय) चंद्रपूर ः तीन यवतमाळ ः तीन अमरावती ः तीन पणन व एक सीसीआय बुलडाणा ः १ (खामगाव झोन) प्रतिक्रिया... "पणन महासंघाचे खरेदीदार असलेल्या जिनर्संनी देखील निकषात बदलाच्या मागणीचे पत्र पणन महासंघाला दिले आहे. त्यामध्ये एप्रिल महिन्यात खरेदी होणाऱ्या कापसाकरिता मे महिन्यात प्रक्रियेचे निकष लावू नये, असे आमचे म्हणणे आहे. फेब्रुवारीमध्ये वेचणी झालेली असल्याने मार्च मधील प्रक्रियेचे निकष लावण्यात यावे. मात्र आमचा सहकारी जिनिंग असल्याने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत नुकसान सोसत आम्ही कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.' - नितीन डेहणकर, अध्यक्ष, शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसींग, काटोल, नागपूर "ट्रॉलीत सरासरी २८ क्‍विंटल कापूस राहतो. दिवसाला दहा गाड्यातील कापसाची खरेदी होईल. त्यानुसार २८० क्‍विंटल कापूस एका केंद्रावर घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस पाहता आणि खरेदीचा निकष पाहता दिवाळी दसऱ्यापर्यंत खरेदी होणे शक्‍यच नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडील कापूस घेण्याची मर्यादा ५० क्‍विंटलपर्यंत वाढविण्यात यावी.' - सिकंदर शहा राज्य अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना, यवतमाळ ‘‘दरवाढीच्या अपेक्षेने ठेवलेला कापसाला आता खरेदीदारच उरले नाही, अशी अवस्था शासकीय यंत्रणांनी करून ठेवली आहे. शासनाने निकष, नियम फारसे न लावता सरसकट कापसाची खरेदी करण्याची आता गरज आहे.’’ - मनीष जाधव, कापूस उत्पादक शेतकरी, वाकद, महागाव, यवतमाळ "सद्याची परिस्थिती पाहता कापूस खरेदीबाबत जिनर्स आणि सीसीआय या दोन्ही यंत्रणांनी लवचीक धोरण अंगीकारत शेतकरी हिताला प्राधान्य दिले पाहिजे. सीसीआय आणि जिनर्स या दोघांनी सामंजस्याने हा प्रश्‍न सोडवावा. त्यासोबतच एफएक्‍यु कापूस घेणार याबाबत शासनाने देखील इतर ग्रेडमधील कापूस आणि त्यानुसार दराचा विचार करावा.' - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com