यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २ रुपये प्रतियुनिट वीज दर सवलत

यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २ रुपये प्रतियुनिट वीज दर सवलत
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २ रुपये प्रतियुनिट वीज दर सवलत

मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८ ते २३ अंतर्गत आमदार सुरेश हाळवणकर यांच्या एकसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशींना अनुसरून वस्त्रोद्योगातील साधे यंत्रमागधारक, सहकारी सूतगिरण्या तसेच सायझिग, प्रोसेसिंग, गारमेंट व इतर घटकांना वीज दरात सवलत देण्याचा निर्णय सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. या निर्णयाने यंत्रमाग वीजग्राहकांना १ रुपये, सायझिग, प्रोसेसिंग, गारमेंट, आधुनिक यंत्रमाग ग्राहक व इतर घटकांना २ रुपये प्रतियुनिट अधिकची सवलत मिळेल. तसेच सूतगिरण्यांना ३ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार असून, या संदर्भात लवकरच शासन निर्णय जारी केला जाणार असल्याचे आमदार हाळवणकर यांनी सांगितले.  राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या वीज दरात शासन पूर्वीपासून २.७७ रुपये सबसिडी देते. या रकमेत वाढ करून ३.७७ रुपये करण्यात आली आहे. म्हणजे यंत्रमागधारकांच्या वीजबिलात १ रुपये प्रतियुनिट अधिकची सवलत मिळेल. त्याचबरोबर २०० अश्‍वशक्तीच्या पुढे वीजभार असणाऱ्या आधुनिक यंत्रमाग ग्राहकांनासुद्धा सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सूतगिरण्यांना प्रचलित वीज दरात ३ रुपये प्रतियुनिट सवलत देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात सूतगिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग, निटिंग, तसेच गारमेंट व इतर प्रकल्पांना प्रथमच वीज दरात सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे या उद्योग घटकांना नागपूर वस्त्रोद्योग संचालक यांच्या वेबसाइटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. त्यामध्ये चालू उद्योग घटक, तसेच या धोरणांतर्गत नव्याने नोंदणी होणाऱ्या उद्योग घटकांनासुद्धा वीजदरातील सवलत लागू राहणार आहे. या नोंदणीची वेबसाइट येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होणार आहे. यंत्रमाग वीजग्राहकांना पूर्वीपासूनच सबसिडी देण्यात येत असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे नोंदणी करण्याची गरज नाही.  या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह वित्त, ऊर्जा व वस्त्रोद्योग विभागाच्या अनेक बैठका पार पडल्या. अखेर मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्देशानंतर हा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल. राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना, तसेच सायझिंग प्रोसेसिंग गारमेंट युनिटला साधारण सध्या प्रतियुनिट साडेनऊ रुपयांच्या आसपास वीज दर आकारला जातो. या निर्णयामुळे विविध कारणांने अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com