‘गिरणा’चा साठा ८१, तर ‘वाघूर’चा ५४ टक्‍क्‍यांवर

‘गिरणा’चा साठा ८१, तर ‘वाघूर’चा ५४ टक्‍क्‍यांवर
‘गिरणा’चा साठा ८१, तर ‘वाघूर’चा ५४ टक्‍क्‍यांवर

जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या चाळीसगाव नजीकच्या गिरणा धरणाचा साठा ८१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. तर जामनेरातील वाघूरचा साठा ५४ टक्‍क्‍यांवर गेला आहे. 

वाघूर धरणातील आवक कमी प्रमाणात सुरू आहे. तर गिरणा धरणातील आवकही जवळपास थांबली आहे. मागील चार-पाच दिवसांपासून धरणाच्या लाभक्षेत्रात व लगत पाऊस जोरदार नाही. यामुळे गिरणा धरणातील आवक कमी झाली आहे. हे धरण १०० टक्के भरेल, अशी अपेक्षा यंदाच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. धरणाचा साठा ८१ टक्‍क्‍यांवर गेल्याने त्यातून रब्बीसाठी पाणी मिळेल. 

भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव आदी भागांत त्याचा लाभ होणार आहे. रब्बीसाठी किती आवर्तने मिळतील, हे अजून प्रशासन किंवा कालवा समितीने स्पष्ट केलेले नाही. कालवा समितीच्या अंतिम बैठकीनंतर जलसंपदा विभाग याबाबत माहिती जाहीर करणार आहे. 

गिरणा नदीवरील नाशिक जिल्ह्यातील केळझर व चणकापूर हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे गिरणा नदीच्या उगमक्षेत्रात पुढे जोरदार पाऊस झाला तर गिरणा धरणात मोठी पाणी आवक सुरू होईल, असे सांगितले जात आहे. गिरणाच्या पाण्यावर अनेक ग्रामपंचायतींसह नाशिकमधील मनमाड, जळगावमधील भडगाव, चाळीसगाव, पाचोरा आदी शहरांचा पाणीपुरवठादेखील अवलंबून आहे.

जामनेर तालुक्‍यातील वाघूर धरणातील साठा फारसा वाढलेला नसला तरी, तो मार्गील वर्षाच्या तुलनेत सुमारे आठ टक्‍क्‍यांनी अधिक आहे. त्यात सध्या पाण्याची कमी आवक सुरू आहे. औरंगाबादमधील सोयगाव, अजिंठा डोंगर रांगांमध्ये जोरदार पाऊस झाला तर वाघूरमधील साठा झपाट्याने वाढू शकतो, असे सांगण्यात आले. 

हे प्रकल्प १०० टक्के भरले जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर, सातपुडा पर्वतरांगेतील मंगरूळ, सुकी व अभोरा हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तापी नदीवरील हतनूर धरणाचे १२ दरवाजे गुरुवारी (ता. ५) सकाळी उघडे होते. त्यात पाण्याची आवक सुरू आहे. तर मोर व गूळ प्रकल्पदेखील १०० टक्के भरतील. कारण त्यांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिवरा, बहुळा, अंजनी, बोरी या प्रकल्पांचा साठाही वाढत आहे. तर अग्नावती, मन्याडमधील साठा वाढलेला नाही. धुळ्यातील मालनगाव, करवंद, जामखेडी, पांझरा, बुराई हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर अमरावती व कनोलीमधील साठाही वाढला आहे. शिरपूर तालुक्‍यातील अनेर प्रकल्पाचे दरवाजे उघडे असून, हा प्रकल्पदेखील १०० टक्के भरेल, हे निश्‍चित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com