मुलींनी सांभाळली वडिलांची शेती 

हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गणेश पऊळ यांच्याकडे नऊ एकर शेती आहे. मजुरांच्या भरवशावर असलेल्या शेतीत काही उरत नसल्याने त्यांनी वाहनचालकांची खासगी नोकरी पत्करली.
Nanded
Nanded

नांदेड : हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गणेश पऊळ यांच्याकडे नऊ एकर शेती आहे. मजुरांच्या भरवशावर असलेल्या शेतीत काही उरत नसल्याने त्यांनी वाहनचालकांची खासगी नोकरी पत्करली. परंतु यातून घरचालवताना त्यांची आर्थिक ओढाताण होऊ लागल्याने त्यांच्या पूजा आणि धनश्री या दोन मुलींनी शेतीची कामे हातात घेऊन घराला हातभार लावला आहे. 

गणेश पऊळ यांना चार मुली व एक मुलगा आहे. मुलगा लहान असल्याने घरची कामे मुलींनाच करावी लागतात. परिस्थिती बेताचीच असल्याने लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता पूजा व धनश्री यांनी २०१० पासून शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली. यानंतर उत्पादन खर्चात घट झाल्याने चार पैसे वाचले. यातून त्यांनी २०१४ मध्ये पाण्याची सोय करून हंगामी फळपिकांसह उसाची लागवड सुरू केली. या दोघी भगिनी पेरणीपासून काढणीपर्यंतचे सर्वच मेहनतींची कामे स्वत: करतात. 

गणेश पऊळ यांच्या शेतीपासून एक किलोमीटर अंतरावर पैनगंगा नदी आहे. यामुळे त्यांनी शेतात घेतलेल्या कूपनलिकेला चांगले पाणी लागले. पाण्याची सोय झाल्यामुळे पूजा व धनश्री यांनी त्यांच्या शेतामध्ये ऊस या बागायती पिकासह कापूस, सोयाबीन, हरभरा या पिकांची लागवड सुरू केली. तसेच हंगामी फळपीक असलेल्या टरबुजास भाजीपाल्यात मिरची या पिकाची लागवड केली. उपलब्ध पाणी सर्व पिकांना नोव्हेंबर ते जुलैपर्यंत पुरावे यासाठी ठिबक सिंचनाचा पर्याय त्यांनी निवडला. या तंत्रज्ञानामूळे पिकांना आवश्यक तेव्हा ताण देणे हेही शक्य झाले. 

पाण्याचा या आधुनिक व्यवस्थापनासमवेत त्यांनी पारंपरिक पेरणीला छेद देत सरीवरंबा पद्धतीचा वापर करून मल्चिंग पद्धतीचा वापर केला. यावर त्यांनी टरबूज, मिरची यांसारखी पिके घेतली. धनश्री व पूजाने पिकावर कीड, रोग पसरू नये म्हणून फवारणी करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून दशपर्णी, अर्क, जिवामृत स्वत: तयार करून सेंद्रिय जिवाणू, गांडूळ खते शेतीत वापरण्याला त्यांनी प्राधान्य दिले. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणानुसार पारंपरिक पिकाला छेद देत त्यांनी वर्षातून दोन वेळेस टरबुजाचे पीक घेतले. कमी दिवसाचे पीक असल्यामुळे बाजारात ज्याला मागणी असते तो काळ निवडून त्यांनी टरबूज पिकाची निवड केली. मल्चिंगसाठी शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे. 

यासोबत बाजारपेठ लक्षात घेऊन त्यांनी हा शेतमाल विक्री करण्यासाठी नांदेड, हैदराबाद, मुंबई, दिल्ली हरियाना, पंजाब येथील बाजारपेठा निवडून माल पाठविला. बहीण धनश्रीची मला शेती करताना साथ मिळाली. तिचे २०२० मध्ये लग्न झाल्यामुळे आता लहान बहीण प्रीतीची साथ मिळत असल्याचे पूजाने सांगितले.  कृषी विभागाकडून गौरव  नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २६ जानेवारीला शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेत स्टॉल लावून टरबुजाची विक्री केली. या दोघी बहिणींना शेतीच्या उत्कृष्ट नियोजनासाठी कृषी विभागाने गौरविले. आधुनिक शेतीसाठी या दोघींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, हदगाव तालुका कृषी अधिकारी यांनी रणवीर यांनी या भगिनींचा गौरव केला.  प्रतिक्रिया बाजारात काय विकते तेच पिकवले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पूरक व्यवसाय करायला पाहिजे. त्यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. यासाठी शासनाच्या योजनांचा फायदा घेतल्यास जास्त नफा मिळतो.  - पूजा पऊळ, बनचिंचोली, ता. हदगाव, जि. नांदेड   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com