गिरणा धरणातील पाणीसाठा २४ तासांत २१ टक्‍क्‍यांनी वाढला

धरण
धरण

जळगाव ः जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जळगाव, धरणगाव आदी तालुक्‍यांसाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणाचा साठा २४ तासात २१ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. हे धरण मंगळवारी (ता. ६) सकाळी ९.३० वाजेपर्यंत ४१.६२ टक्के भरले.  सुमारे २१ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील रब्बीसह मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी पालिकांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी ६ ऑगस्टपर्यंत हे धरण ३० टक्केही भरले नव्हते. या वर्षी ते ४१.६२ टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गिरणा धरण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्‍यात आहे. पण त्याचा उपयोग जळगावला अधिक होतो. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात केळझर, हरणबारी, चणकापूर, ठेंगोडा बंधारा, पुनद हे लघू व मध्यम प्रकल्पही भरले आहेत. केळझर, ठेंगोडा बंधाऱ्यातून गिरणा धरणात पाण्याचा जलप्रवाह येत आहे. 

गिरणा धरणात सोमवारी (ता. ५) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास सुमारे २० टक्के जलसाठा होता. तर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता या धरणातील साठा ४१.६२ टक्‍क्‍यांवर पोचला. या धरणात सद्यःस्थितीतही पाण्याचा मोठा प्रवाह येत आहे. यामुळे त्यातील जलसाठा आणखी वाढणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. जामनेर तालुक्‍यातील वाघूर धरणातील साठा ३१.२२ टक्के एवढा आहे. 

गिरणा धरणातील साठा वाढलेला असला तरी जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या हिवरा, अग्नावती, बहुळा, मन्याड, बोरी, भोकरबारी, अंजनी या प्रकल्पांच्या साठ्यात मागील २४ तासांत कुठलाही वाढ झालेली नाही. या प्रकल्पातील साठा शून्यावरच थांबलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी वगळता कुठल्याही नदीला पूर आलेला नाही. धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीला पूर कायम आहे. तर नंदुरबारमधील रंगावली, खर्डा, सुसरी, गोमाई या नद्यांनाही पूरस्थिती कायम आहे. 

धुळ्यातील सातपुडा पर्वताजवळील प्रकल्पात फारसा साठा वाढलेला नाही. त्यात २०.१७ टक्के जलसाठा होता. तापी नदीवरील हतनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण उघडले आहेत. तर तापी नदीवरील धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेजचे सहा, नंदुरबारमधील सारंगखेडा बॅरेजचे २६ आणि प्रकाशा बॅरेजचे २७ दरवाजे पूर्णतः उघडे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com