शेतीला दिवसा वीज द्या

शेतीला दिवसा वीज द्या
शेतीला दिवसा वीज द्या

मुंबई : सध्याच्या कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. थंडीमुळे शहरी-ग्रामीण घरगुती, तसेच इतर वीज ग्राहकांकडून विजेचा वापर कमी होतो, अशा काळात शिल्लक विजेचा पुरवठा शेतीला करणे शक्य असल्याचे मत वीजतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  राज्याची विजेची मागणी १८ हजार मेगावॉटवरून २५ हजार मेगावॉटपर्यंत पोचली आहे. गेल्या चार वर्षांत वीजनिर्मिती क्षमतेमध्ये एकूण ३ हजार २८० मेगावॉट वाढ झाली आहे. राज्याला २४ तास वीजपुरवठा करण्यात ऊर्जा विभाग यशस्वी ठरल्याचा दावा केला जात आहे. महापारेषण, महावितरण व महानिर्मितीकडून विद्युत जाळे सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. तसेच शेतीला दिवसा वीज मिळावी यासाठी उपकेंद्र सौरऊर्जानिर्मिती व स्वतंत्र वाहिनीची कामे करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.  शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात एका रोहित्रावर एक किंवा दोन शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळणार आहे. राज्यातील जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सौर कृषिपंप वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येते.  मात्र, कृषिपंपांची वाढती थकबाकी, तसेच ग्रामीण भागातील मागणी अधिक आणि पुरवठा कमी या धोरणामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचे भारनियमन केले जाते. ग्रामीण भागात रोटेशन प्रमाणे बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी सिंचनासाठी वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतीला पाणी द्यावे लागते. सध्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना चक्राकार पद्धतीने दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा करण्यात येतो. त्यातच गेल्या काही दिवसांत राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहणार आहे. या कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी शेतीला सिंचन देताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. थंडी, वारा अशा नैसर्गिक संकटांचा सामना करीत शेतकरी कोणतीही तक्रार न करता रात्रीच्या वेळीसुद्धा शेतावर जात आहेत. पावसाअभावी दुष्काळी भागातील खरीप वाया गेला आहे. रब्बीत गहू, हरभरा, उन्हाळा कांदा अशी पिके घेतली जातात. त्याशिवाय जनावरांच्या चाऱ्याची लागवड होते. रब्बीतील ही पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना अनेकदा गंभीर शारीरिक व्याधी, आजारपणांना सामोरे जावे लागण्याची भीती असते. सध्या थंडीमुळे घरगुती वीज ग्राहकांकडून एरवीपेक्षा कमी विजेचा वापर होतो. त्यामुळे या अतिरिक्त ठरत असलेल्या विजेचा पुरवठा शेतीकडे वळवून सिंचनासाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.  यंदा दुष्काळामुळे खरीप गेला. आता रब्बीत गहू, हरभरा, उन्हाळ कांदा ही पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. येत्या काळात दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्याने रब्बीतच दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचीसुद्धा व्यवस्था करावी लागणार आहे. थंडीमुळे न्यायालये, शाळा, महाविद्यालये उशिरा सुरू होतात. मग निम्म्या रात्री सिंचनाला पाणी देऊन शेतकऱ्याला कशाची शिक्षा देता. त्यामुळे सिंचनाला रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करून शेतकऱ्याचे जगणे सुसह्य करावे, असे राज्य सरकारला साकडे आहे. - धनंजय धोरडे-पाटील, शेतकरी नेते, औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com