संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भर

माती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे यावरून त्याचे सहा स्तरीय वर्गीकरण करण्यात येते. त्यामध्ये अत्यंत कमी, कमी, मध्यम, थोडेसे जास्त, जास्त, अत्यंत जास्त असे वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी.
Green manure helps in increasing the organic curb in the soil
Green manure helps in increasing the organic curb in the soil

माती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे यावरून त्याचे सहा स्तरीय वर्गीकरण करण्यात येते. त्यामध्ये अत्यंत कमी, कमी, मध्यम, थोडेसे जास्त, जास्त, अत्यंत जास्त असे वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. जमिनीमधून पिकांद्वारे सतत होत असलेला अन्नद्रव्यांचा उपसा आणि त्याच्या तुलनेत होत असलेला अन्नद्रव्यांचा कमी पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. जमिनीचा वाढलेला सामू किंवा चोपण जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चुनखडीयुक्त जमिनी अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते. यासाठी माती परिक्षण महत्त्वाचे आहे. माती परीक्षण म्हणजे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांचे विश्लेषण. माती परीक्षण आधारे आपल्या जमिनीची सुपीकता कळते. कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खतांची मात्रा ठरवता येते. त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते. माती परीक्षणामध्ये जमिनीचा सामू, विद्युतवाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी हे मूलभूत रासायनिक गुणधर्म तपासले जातात. उपलब्ध अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक, तांबे लोह, मंगल, जस्त, बोरॉन व मॉलिब्डेनम हे अन्नद्रव्य तपासले जाते. जमिनीचा सामू कमी करण्यासाठी उपाय

  • जमिनीचा सामू ८.५ टक्के पेक्षा जास्त वाढलेला असेल तर अशा जमिनींना चोपण जमिनी म्हणतात.
  • अशा जमिनीच्या व्यवस्थापनासाठी एक टक्का उतार द्यावा. उतारास चर काढून पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी.
  • जिप्सम, गंधक, आयर्न पायराईट यासारख्या भू सुधारकांचा वापर करावा. हिरवळीची पिके ताग, धैंचा, शेवरी, बोरु, चवळी लागवड करून फुलोऱ्यात येताच जमिनीत गाडावीत.
  • साखर कारखान्यातील उसाची मळीचे खत पाच टन प्रति हेक्टर या प्रमाणात वापर करावा.
  • जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढलेले असल्यास उपाययोजना

  • जमिनीच्या पृष्ठभागावर आलेले क्षार खरडून शेताबाहेर काढावेत. जमिनीचे लहान वाफे करून त्यात पाणी साठवून एकदम चरावाटे बाहेर काढावे. या पाण्यासोबत क्षार वाहून जातात.
  • चर खणून पाण्याच्या निचऱ्याची सोय करावी. शेणखत, हिरवळीचे खते, कंपोस्ट खते यासारखी सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात वापरावीत.
  • क्षार सहनशील पिकांची लागवड करावी.कापूस, गहू, सूर्यफूल, बाजरी, पालक, बीट, चिकू, सुपारी, सीताफळ, पेरू, निलगिरी ही क्षार सहनशील पिके आहेत.
  • सेंद्रिय कर्बाचे महत्त्व सेंद्रिय कर्ब हे जमिनीला जिवंत ठेवण्याचे काम करते. जमिनीतील असणारे उपयुक्त जिवाणू, बुरशी, अॅक्टीनोमाइसिट्स हे पूर्णपणे सेंद्रिय कर्बावर जगतात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यास सूक्ष्मजिवांची संख्या कमी होईल. पिकास अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम सूक्ष्मजीव करतात. त्यांच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्ब आवश्यक आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची जडणघडण चांगली राहते. जमिनीची जलधारण क्षमता वाढते. जमिनीत हवा खेळती राहते. सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपाय

  • सेंद्रिय कर्ब वृद्धीसाठी दरवर्षी शेतात शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताचा वापर करावा.
  • हिरवळीची पिके जसे की बोरू, धैंचा, ताग, सुबाभूळ, शेवरी, चवळी यासारखी पिके जमिनीत गाडावीत. ऊस कारखान्यातील मळी खताचा वापरावा.
  • रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू, पालाश विरघळवणारे जिवाणू, गंधक विरघळणारे जिवाणू, जस्त विरघळणारे जिवाणू संवर्धकांचा वापर करावा.
  • शेतातील काडीकचरा गव्हाचे काड, उसाचे पाचट शेतातच गाडावे.
  • पिकांची फेरपालट करावी. फेरपालट करताना त्यामध्ये डाळवर्गीय पिकांचा समावेश करावा.
  • माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन

  • माती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे यावरून त्याचे सहा स्तरीय वर्गीकरण करण्यात येते. त्यामध्ये अत्यंत कमी, कमी, मध्यम, थोडेसे जास्त, जास्त, अत्यंत जास्त असे वर्गीकरण करण्यात येते.
  • जर जमिनीमध्ये अन्नद्रव्य अत्यंत कमी प्रमाणात असतील तर त्या पिकासाठी शिफारस केलेल्या खत मात्रेपेक्षा पन्नास टक्क्यांनी जास्त खतमात्रा द्यावी लागेल.
  • जर कमी वर्गवारी मध्ये अन्नद्रव्य असतील, तर शिफारशीत खत मात्रेच्या २५ टक्के खत मात्रा जास्त द्यावी लागेल.
  • जर मध्यम व थोडेसे जास्त या वर्गवारी मध्ये अन्नद्रव्य असतील तर त्या पिकासाठी जी शिफारस केलेली खत मात्रा आहे त्या शिफारशीनुसारच खते द्यावीत. जर जास्त प्रमाण असेल शिफारशीत खत मात्रेत २५ टक्क्यांनी कमी द्यावे.
  • अत्यंत जास्त जर उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण असेल शिफारशीत खत मात्रेच्या ५० टक्क्यांनी कमी खते द्यावीत.
  • माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीमध्ये कमतरता असल्यास संबंधित अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. महाराष्ट्रमध्ये प्रामुख्याने लोह, जस्त, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता आढळून येते. चुनखडीचे दुष्परिणाम

  • जमिनीतील चुनखडीचे प्रमाण जर पाच टक्यांपेक्षा जास्त असेल तर अशा जमिनींना चुनखडीयुक्त जमीन म्हणतात.
  • चुनखडीमुळे पिकावर दुष्परिणाम होतात. पिकास अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. मुळांची वाढ होत नाही. सूक्ष्मजिवांची संख्या कमी होते. पाण्याचा निचरा होत नाही. संत्रावर्गीय तसेच इतर फळबाग लागवड करता येत नाही. झाड पूर्णपणे वाळून जाते.
  • चुनखडीयुक्त जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी खोलवर नांगरट करावी. सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर करावा. उसाच्या मळीचा खत म्हणून वापर करावा. जिवाणू खतांचा वापर करावा.
  • मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या अधिक वापर माती परीक्षणानुसार करावा.
  • पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्ये

  • पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्यांमध्ये मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असे वर्गीकरण करण्यात येते. मुख्य अन्नद्रव्य म्हणजे जी पिकांच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात लागतात. यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्यांचा समावेश होतो.
  • दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे जी पिकांना मध्यम प्रमाणात लागतात. यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक यांचा समावेश होतो.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे जी पिकांना कमी प्रमाणामध्ये लागतात. यामध्ये तांबे, लोह, मंगल, जस्त, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन व निकेल यांचा समावेश होतो. पिकांच्या वाढीसाठी एकूण १७ मूलद्रव्ये आवश्यक आहेत.
  • गंधकाचे महत्त्व

  • तेलवर्गीय पिकांसाठी तेलाच्या निर्मितीमध्ये गंधकाचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यामुळे तेलाच्या निर्मितीसाठी गंधक आवश्यक असते. गंधक वापरल्यामुळे तेलाचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते.
  • जमिनीमध्ये जर गंधकाची कमतरता असेल तर हेक्टरी २० ते ४० किलो गंधक जमिनीतून द्यावे.
  • संपर्क- डॉ.पपीता गौरखेडे, ८००७७४५६६६ ( मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com