शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या ः देवेंद्र फडणवीस

Give financial support to farmers: Devendra Fadnavis
Give financial support to farmers: Devendra Fadnavis

नागपूर ः राज्यातील संकटातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या. तसेच विदर्भातील आणि राज्याच्या इतर भागातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १८) विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत देऊ असा शब्द दिला होता. तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देऊ असेही म्हणाले होते. राज्यातील ९४ लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हेक्टरी २५ हजार रुपयाने हिशोब केला तरी त्यासाठी २३ हजार कोटींची आवश्यकता आहे. मात्र, पुरवणी मागण्यांमध्ये फक्त ७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सरकारची सुरुवातच विश्वासघाताने होत असेल तर तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? अशी विचारणा करीत राज्य सरकार सांगते की, केंद्राकडून मदत मिळाली नाही, मग ही मदत तुम्ही केंद्राच्या भरवशावर जाहीर केली होती का? असा प्रश्नही त्यांनी केला. काळजीवाहू सरकार असताना आम्ही दहा हजार कोटी मंजूर केले होते. हे सरकार मात्र संकटातील शेतकऱ्यांची फक्त साडेपाच हजार कोटींवर बोळवण करीत आहे, असा आरोपही त्यांनी लावला. 

या वेळी त्यांनी आघाडी सरकार आणि युती सरकारच्या काळात केंद्राकडून मिळालेल्या मदतीतील तफावतही निदर्शनाला आणून दिली. संकटातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, राज्य सरकारने शेतकऱ्यांची निराशा केली, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू करा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यासाठी तिजोरीत पैसा नसल्याची कारणे देऊ नका असेही ते म्हणाले. 

भाषणात त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. हे कपटाने, राजकीय स्वार्थाने, राजकीय हाराकिरीने आलेले सरकार आहे, अशी टीका करून ते पुढे म्हणाले, या अभिभाषणातून सरकारच्या कारभाराची दिशा स्पष्ट दिसत नाही. उलट या तिन्ही पक्षातला विसंवादच दिसून येतो. भाजप आणि शिवसेना युती करून निवडणूक लढले. आम्हाला जनादेश मिळाला. मात्र, शिवसेना आमच्यासोबत येण्याऐवजी त्यांनी दुसरा मार्ग पत्करला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सेनेचा मुख्यमंत्री करू असे वचन दिले होते. मग काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री करू हा शब्द तुम्ही बाळासाहेबांना दिला होता का, किती भूमिका बदलली अशी टीका फडणवीस यांनी केली. 

‘सामना’ दैनिकात शरद पवार यांच्याविरुद्ध प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे मथळे वाचून दाखवत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. त्याला मंत्री एकनाथ शिंदे, आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांबद्दलचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश दिले. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, विस्तार केल्यानंतर ज्यांना मंत्रीपद मिळणार नाहीत ते आमदार सरकार ठेवणार की नाही, या भीतीपोटी विस्तार होत नाही. सरकारने विकासकामांना दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणीही केली.

नागरिकत्व कायद्यावरून गोंधळ विधानसभेचे कामकाज सुरू होताच सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. हा कायदा संविधानविरोधी असल्याचे ते म्हणाले. त्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार समर्थन केले. त्याला भाजपने तीव्र आक्षेप घेतला. या मुद्द्यावरून सभागृहात बराच वेळ गोंधळ सुरू होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले, संसदेने हा कायदा केलेला आहे. तो असांविधानिक आहे की नाही हे ठरवायचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. या वेळी भाजप आमदार वेलमध्ये येऊन गोंधळ, घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com