शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमाफी द्या, 'या' झेडपीने केला ठराव

Give full relief in electricity bill to farmers, resolutions in Solapur Zilla Parishad General Assembly
Give full relief in electricity bill to farmers, resolutions in Solapur Zilla Parishad General Assembly

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. त्यात आता पुन्हा शेती करताना वीजबिलाने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमाफी द्यावी, असा ठराव गुरुवारी (ता. २१) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, समाजकल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश आवताडे उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला शेतीपंपाच्या वीज आणि विजेच्या प्रश्‍नावरुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. काही गावांत डीपीसाठी लागणारे ऑइल दिले जात नसल्याचा मुद्दा वसंत देशमुख, त्रिभुवन धाईंजे यांनी उपस्थित केला. त्यासंबंधी सुभाष माने, शैला गोडसे, अरुण तोडकर, उमेश पाटील, ज्योती पाटील, सचिन देशमुख यांनी प्रश्‍न उपस्थित केले. त्यानंतर दुष्काळाच्या सततच्या आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे वीजबिलमाफीचा ठराव घेण्यात आला. त्याचबरोबर कोणत्याही शेतकऱ्याचे वीजकनेक्‍शन न तोडण्याचेही शासनाला ठराव करून पाठविण्याचा निर्णय या वेळी झाला.

ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात येणाऱ्या हायमास्ट दिव्यांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत विभागाला द्यायला हवी होती. पण, तसे न झाल्याने सर्वच सदस्यांनी त्याला प्रखर विरोध केला. सदस्य सचिन देशमुख यांच्यासह विरोधी पक्षनेते बळीराम साठे, आनंद तानवडे, भारत शिंदे, शिवाजी सोनवणे यांनी यासंबंधीची आक्षेपाची मते मांडली. शेवटी प्रदीर्घ चर्चेनंतर अध्यक्ष पाटील यांनी ही प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार भोंगळ पद्धतीने सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत अनेक वर्षे काम केल्याने कर्मचाऱ्यांची गुंडगिरी सुरू झाली असल्याचा मुद्दा वसंत देशमुख यांनी उपस्थित केला. 

सदस्य झाले निरुत्तर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक व निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी एकट्या संजयकुमार राठोड यांच्याकडे आहे. प्राथमिकचे त्यांचे काम चांगले असल्याचे मत काही सदस्यांचे आहे. मात्र माध्यमिकच्या फाइलवर ते सहीच करीत नसल्याचे काहींनी सांगितले. त्या वेळी श्री. राठोड यांनी वैयक्तिक मान्यता वगळता अन्य कोणताच प्रश्‍न उरला नसल्याचे सांगितल्याने सदस्य निरुत्तर झाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com