बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर द्या ः गोयल

बुलडाणा ः आढावा बैठकीत बोलताना पालक सचिव श्यामकुमार गोयल.
बुलडाणा ः आढावा बैठकीत बोलताना पालक सचिव श्यामकुमार गोयल.

बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण उभे राहिलेले आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा आहे. उपलब्ध असलेला हा पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. टँकरची मागणी आल्यास तत्काळ टँकर उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव श्यामकुमार गोयल यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा टंचाई परिस्थितीमधील उपाययोजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पालक सचिव आढावा घेताना बोलत होते. या प्रसंगी विभागीय आयुक्त पीयूष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश पारनाईक आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या आराखड्यातील मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही श्री. गोयल म्हणाले. टंचाई परिस्थितीत मंजूर कामांमधील विंधन विहिरीची कामे पूर्ण करण्याचे सांगत श्री. गोयल म्हणाले की, विंधन विहिरीवर डिझेल किंवा सौरपंप बसविण्यात येतील. पाणीपुरवठाविषयक कामांसाठी आचारसंहितेचे कुठलेही बंधन नाही. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देत कामे थांबवू नका. मागणी आल्यास तत्काळ पाणीपुरवठ्याचे टँकर मंजूर करावेत. टँकरवरील जीपीएस यंत्रणेचा नियमित गटविकास अधिकारी स्तरावर आढावा घेण्यात यावा. कंत्राटाप्रमाणे टँकरचालक फेऱ्या करीत आहेत किंवा नाही, याबाबत चाचपणी करावी. विहिरीवर शेतकऱ्यांची मिशनरी असल्यास अधिग्रहित विहिरीसाठी शेतकऱ्याला प्रतिदिवस ६०० रुपये अदा करण्यात येतात. तर, शेतकऱ्यांची मशिनरी नसल्यास प्रतिदिवस ४५० रुपये अदागयी करण्यात येते. जास्त पाणीउपसा होत असल्यास अधिग्रहित विहीर असलेल्या शेतकऱ्याला प्रतिलिटर १२ रुपयांप्रमाणे  देण्यात येते.  चाराटंचाईबाबत आढावा घेताना श्री. गोयल म्हणाले की, मागणीनुसार चारा छावणी देण्यात यावी. चारा छावणी उभारण्यासाठी सादर झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रस्तावांचे अवलोकन करून अटींनुसार चारा छावणी देण्यात यावी. पूरक चाऱ्याचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे कामाची मागणी झाल्यास सेल्फवर असलेली कामे तत्काळ सुरू करावीत. कामांचा सेल्फ जुलैपर्यंतचे नियोजन लक्षात घेऊन करून ठेवावा. सध्या १७३७ कामांवर १० हजार ८३७ मजुरांची उपस्थिती आहे. सन २०१८ खरीप दुष्काळ अनुदान वाटप १०० टक्के करावे.

अशा आहेत टंचाईच्या उपाययोजना

  • विंधन विहिरी/कूपनलिका - ४२८ गावांमध्ये ५९१ प्रस्तावित 
  • २१५ गावांमधील २८३ कामांना मंजुरी, ११३ गावांमधील १५५ कामे पूर्ण 
  • नळ योजनांची विशेष दुरुस्ती ११० गावांत ११० कामे मंजूर, ३२ कामे पूर्ण 
  • तात्पुरत्या पूरक नळ योजना ५ गावांमध्ये पूर्ण 
  • २२६ गावांमध्ये २३८ टँकरने पाणीपुरवठा, २२७ गावांमध्ये ७२७ खासगी विहीर अधिग्रहण
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com