‘ग्लायफोसेट’ धोकादायक की सुरक्षित?

ग्लायफोसेट
ग्लायफोसेट

पुणे: अमेरिकेतील एका न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निवाड्यामुळे जगभर ‘ग्लायफोसेट’ तणनाशक धोकादायक की सुरक्षित, यावरून वादविवाद सुरू झाले आहेत. एकीकडे ग्लायफोसेटला प्रतिकारक जीएम कापूस वाणाखालील क्षेत्र जगभर वाढत आहे, तर दुसरीकडे या तणनाशकामुळे कर्करोग होत असल्यामुळे त्यावर बंदी घालावी, ही मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मात्र ग्लायफोसेटच्या वापराविषयी संभ्रम तयार झाला आहे. ‘ग्लायफोसेट‘च्या मुद्यावरून सध्या जगभर वादंग सुरू आहे. कर्करोगाला निमंत्रण देणारे व पर्यावरणाची हानी करणारे तणनाशक म्हणून त्यावर बंदी घालण्याची मागणी एकीकडे जगभरातील पर्यावरणवादी करीत आहेत, तर दुसरीकडे ग्लायफोसेटला प्रतिकारक जीएम कापूस वाणानेही लागवड क्षेत्र वाढवून जागतिक बाजारपेठेत आपले पक्के स्थान निर्माण केले आहे. कर्ककरोगाने पीडित एका अमेरिकी शेतकऱ्याला तब्बल सुमारे दोन हजार कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश कॅलिफोर्निया (अमेरिका) न्यायालयाने मोन्सॅन्टो या बहुराष्ट्रीय कंपनीला अलीकडेच दिला. यात ग्लायफोसेटच्या वापरामुळे कर्करोग झाल्याचा दावा न्यायालयाने ग्राह्य मानला. त्यामुळेच या तणनाशकाचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने जगासमोर आला आहे.  ‘एचटी’ तंत्रात ग्लायफोसेटचा वापर  जीएम पिकांतर्गत बीटी कापूस म्हणजे कीटक प्रतिकारक तंत्रज्ञानापाठोपाठ एचटी (हर्बीसाईड लॉटरंट) हे तणनाशक प्रतिकारक तंत्रज्ञान जगभरात प्रचलित झाले आहे. त्यातही ग्लायफोसेट प्रतिकारक जीएम वाणाचा प्रामुख्याने समावेश आहे. 

जीएम पिके- आकडेवारी

  • २०१७ मध्ये जीएम पिकांखालील जागतिक क्षेत्र- तब्बल १८९.८ दशलक्ष हेक्टरपर्यंत
  • जगातील २४ देशांकडून जीएम पिकांची लागवड
  • अमेरिका (९४.५ टक्के), ब्राझील (९४ टक्के), अर्जेंटिना (१०० टक्के), कॅनडा (९५ टक्के) व भारत (९३ टक्के- केवळ बीटी कापूस) हे देश आघाडीवर 
  • (स्राेत- आयएसएएए- आंतरराष्ट्रीय संस्था) 

    तणनाशक प्रतिकारक वाणाचे वर्चस्व  अलीकडील काळात ‘बीटी’ अधिक ‘एचटी’ या संयुक्त वाणांच्या लागवड क्षेत्रात वाढ होत अाहे. जगातील ‘जीएम’ वाणांपैकी ४१ टक्के क्षेत्र याच वाणांनी व्यापले असल्याचा दावा ‘आयएसएएए’ संस्थेने केला आहे. तणनाशक प्रतिकारक प्रमुख पिकांत कापूस, मोहरी, मका, सोयाबीन, अल्फाअल्फा यांचा समावेश आहे. एरवी ग्लायफोसेट फवारल्यास पीक त्यास बळी पडणार. पण ग्लायफोसेट प्रतिकारक वाण लावल्यास ते या फवारणीला बळी पडणार नाही असे हे तंत्रज्ञान आहे.

    बहुराष्ट्रीय कंपन्यांची शक्कल 

  • जगात सद्यस्थितीत ग्लायफोसेट व ग्लुफोसिनेट अशीच दोनच तणनाशके ‘नॉन सिलेक्टिव्ह’ रूपात उपलब्ध
  • पहिले मोन्सॅन्टो तर दुसरे बायर या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीचे. 
  • दोन्ही कंपन्या ‘जीएम’ बियाणे उद्योगात जगात आघाडीवर.  
  • दोन्ही कंपन्यांकडे ‘बीटी’ व ‘एचटी’चे आपापले वाण. त्यामुळे आपापल्या तणनाशकांचा वापर वाढण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘एचटी’ वाणांकडे अधिक लक्ष दिले आहे हे साहजिक.  
  • ग्लायफोसेटबाबत अमेरिकेची भूमिका  ग्लायफोसेटचा वापर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात होतो. अमेरिकी सरकारच्या पर्यावरण सुरक्षा एजन्सीने (इपीए) मागील वर्षी डिसेंबरमध्ये अहवाल प्रसिद्ध केला. ग्लायफोसेटच्या वापरामुळे मानवात कर्करोग होण्याची शक्यता फारच कमी किंवा शक्यतो नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. लेबल क्लेमनुसार वापर केल्यास हे उत्पादन मानवी आरोग्यासाठी तसे धोकादायक नाही, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अन्य देशांतील तसेच राष्ट्रीय कृषी आरोग्य सर्वेक्षण संस्थेचे निष्कर्षही पडताळून पाहण्यात आले. अहवालावर सार्वजनिक मते व्यक्त झाल्यानंतर त्यांचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षी या तणनाशकाच्या पुनर्नोंदणीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. 

    युरोपीय महासंघाकडून पुनःसंमती ग्लायफोसेटचा मुद्दा युरोप खंडातही गाजतो आहे. मागील वर्षीच्या २७ नोव्हेंबर रोजी युरोपीय महासंघाने या तणनाशकाच्या वापराला (परवाना) पुढील पाच वर्षांसाठी पुनःसंमती दिली आहे. ग्लायफोसेटच्या संदर्भाने उपलब्ध असलेले सर्व शास्त्रीय मूल्यमापन तसेच अहवाल तपासल्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे महासंघाने जाहीर केले. ग्लायफोसेटमुळे मानवात कर्करोग होतो, असा कोणताही संदर्भ कुठेही आढळला नसल्याचेही महासंघाने म्हटले आहे.

    युरोपीय जनतेने उभारली चळवळ  महासंघाचा निर्णय युरोपच्या जनतेला मान्य नाही. ‘ग्लायफोसेट‘वर बंदी आणा, मानवी व पर्यावरणाचे विषारी रसायनांपासून संरक्षण करा’ ही घोषणा पुढे घेऊन युरोपीय जनतेने त्यासाठी चळवळ उभारली आहे. विशेष म्हणजे फ्रान्सनेही नागरिकांच्या बाजूने कौल दिला आहे. सर्व प्रकारची पारदर्शकता व सत्यता यांची शास्त्रीय कसोट्यांवर पडताळणी करून योग्य निर्णय घेतले जातील, असेही महासंघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

    ‘डब्ल्यूएचअो’ काय म्हणते? अमेरिका व युरोपीय महासंघाची भूमिका जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचअो) यापूर्वीच्या अहवालाद्वारे मान्य केलेली नव्हती. या तणनाशकामुळे मानवात कर्करोग निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत या संघटनेने २०१५ मध्ये दिलेल्या अहवालात व्यक्त केले होते. मात्र या संघटनेने याविषयी आपला ताजा अहवाल दिला आहे. त्यामध्ये ग्लायफोसेट अनपेक्षितरित्याच कर्करोगाला कारणीभूत ठरू शकते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याचाच अर्थ कर्करोग होण्याचा धोका जवळपास नसल्याचेच त्यातून सूचित होते. जागतिक आरोग्य संघटनेची स्वायत्त संस्था असलेल्या इंटरनॅशनल फॉर रिसर्च आॅन कॅन्सर या संस्थेने यासंबंधी दिलेल्या अहवालाचा आधार या निष्कर्षासाठी घेण्यात आला आहे.    डॉ. कॅरॅस्को यांचे संशोधन                  दक्षिण अमेरिकेत असलेल्या अर्जेंटिना देशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अँड्रेस कॅरॅस्को आज हयात नाहीत. मानवी गर्भाच्या वाढीसाठी हे तणनाशक धोकादायक असल्याचे निष्कर्ष त्यांनी आपल्या संशोधनपर अहवालातून जगासमोर आणले होते. अर्जेंटिनात तणनाशक प्रतिकारक ‘जीएम’ पिकांची लागवड केली जाते. कोंबड्या व बेडकांच्या गर्भाच्या वाढीवर किंवा आकारावर ग्लायफोसेटची थोडीशी मात्रादेखील गंभीर परिणाम घडवू शकते, असे त्यांच्या संशोधनात निष्पन्न झाले. अर्जेंटिना सरकारनेदेखील या संशोधनाची दखल घेत तणनाशकाच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘ग्लायफोसेट’विषयी थोडेसे...

  • मोन्सॅन्टो या अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनीने या तणनाशकाचा शोध लावला 
  • अनेक वर्षांपासून जगभरात या तणनाशकाचा वापर
  • बिनानिवडक (नॉन सिलेक्टिव्ह) म्हणजेच पीक व तण असा भेद न करता हे तणनाशक सर्व हिरव्या वनस्पतींचे मुळासकट नियंत्रण करते.
  • बहुतांश सर्व तणे (विशेषतः हराळी, लव्हाळा) त्याच्या वापरामुळे नियंत्रित होत असल्यानेच शेतकऱ्यांकडून त्यास विशेष पसंती
  • भारतातही ऊस तसेच अन्य निवडक पिकांत त्याचा वापर 
  • ‘ग्लायफोसेट’वरील बंदी

  • ब्राझीलकडून ‘ग्लायफोसेट’च्या नव्या नोंदणीकरणाला बंदी. 
  • युरोपातील ग्रीस, डेन्मार्क, इटली, फ्रान्स आदी देशांकडूनही कायमस्वरूपी किंवा मर्यादित बंदी
  • कोलंबियात हवाई फवारणीला तसेच श्रीलंकेत बंदी 
  • पोर्तुगाल, इटली, व्हॅंक्यूव्हर (कॅनडा) येथे सार्वजनिक उद्याने व बागांमधून वापरण्यास बंदी  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com