godawon
godawon

`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे 

समृद्धी महामार्गालगत भव्य आणि अत्याधुनिक धान्य साठवणुकीची गोदामे आणि शीतगृहे उभारण्यात येणार आहेत.

पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक आणि ई-लिलावाद्वारे आपला शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात विक्री करता यावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गालगत भव्य आणि अत्याधुनिक धान्य साठवणुकीची गोदामे आणि शीतगृहे उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्य वखार महामंडळाने रस्ते विकास महामंडळाकडे विविध ठिकाणी सुमारे १०० एकर जागेची मागणी केली होती. या मागणीला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश रस्ते विकास महामंडळाला दिले असून. याबाबतचे पत्र वखार महामंडळाला प्राप्त झाले आहे. 

वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी याबाबतची माहिती ‘ॲग्रोवन’ला दिली. श्री. तावरे म्हणाले, की मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग कोकण, पश्‍चिम महाराष्‍ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांमधील २२ तालुक्यांमधून जाणार आहे. तर २२ तालुक्यांची मुख्यालये जोडण्यासाठी प्रत्येक २५ ते ४० किलोमीटर अंतरावर छेदरस्त्यांद्वारे जोड रस्ते आणि सेवा रस्ते करण्यात येणार आहेत. अशा २४ ठिकाणांवर कृषी समृद्धी केंद्रे उभी केली जाणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीतून अधिकचा लाभ देण्यासाठी वखार महामंडळाने रस्ते विकास महामंडळाकडे विविध ठिकाणी जमिनीची मागणी केली होती. या मागणीला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत जागा देण्याचे मान्य केले. त्यानुसारचे पत्र वखार महामंडळाला देण्यात आले. 

या जागा ताब्यात मिळेपर्यंत वखार महामंडळ सल्लागारांची नियुक्ती करणार आहोत. सल्लागार नियुक्तीनंतर त्यांच्याकडून आलेल्या एकात्मिक आणि आधुनिक गोदामे उभारणीची प्रक्रिया सुरु केली जाईल. गोदामे आणि शीतगृहांद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक, तारण कर्ज योजना आणि ऑनलाइन लिलावांची देखील सुविधा निर्माण करुन देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुगीच्या दिवसांमध्ये अन्नधान्याची एकदम होणारी आवक आणि त्यातून बाजारभावांची होणारी घसरण रोखता येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर या प्रकल्पांद्वारे होणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.  अशी असेल एकात्मिक आणि आधुनिक गोदामे 

  • १ हजार ८०० टनांची सहा गोदामे 
  • सौरऊर्जेच्या वापरावरील ऊर्जा स्वयंपूर्ण गोदामे 
  • ताशी १० टन क्षमतेची चाळणी आणि प्रतवारी केंद्रे 
  • धान्य तपासणी प्रयोगशाळा 
  • ५ हजार टनांचे २ सायलोज 
  • २ हजार टनांची शीतगृहे 
  • सर्व गोदामे आणि शीतगृहे ई-नामशी जोडणार 
  • ब्लॉक चेन प्लॅटफॉर्मवर शेतमाल तारण योजना 
  • हमी भाव खरेदी केंद्र 
  • जिनींग प्रेसिंग युनिट 
  • हाताळणी आणि वाहतूक सुविधा 
  • पहिल्या टप्प्यात याठिकाणी होणार गोदामे  जाबरगांव (वैजापुर, जि. औरंगाबाद)  सावरगांव माळ (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा)  रेणकापूर (आर्वी, जि. वर्धा)  दृष्टिक्षेपात वखार महामंडळ  राज्य वखार महामंडळाची ९ महसुली विभागांमध्ये २०१ ठिकाणी १ हजार ३७९ धान्य साठवणूक गोदामे असून, त्यांची क्षमता २३ लाख २२ हजार टन एवढी आहे. 

    प्रतिक्रिया सुगीच्या दिवसांमध्ये शेतमाल काढणीनंतर बाजारपेठेतील आवक मोठ्या प्रमाणावर होते. बाजारपेठेच्या सिद्धांतानुसार आवक वाढली कि, बाजारभाव कोसळतात. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी समृद्धी महामार्गावर भव्य गोदामे उभारण्याचे प्रयत्न वखार महामंडळाचे आहेत. यासाठी आम्ही रस्ते विकास महामंडळाकडे मागणी केली होती. आमच्या मागणीला मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मान्यता देत जागा देण्यास मान्यता दिली आहे. जागा ताब्यात घेऊन, गोदामे उभारण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.  - दिपक तावरे, व्यवस्थापकीय संचालक, वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com