गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन

पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. मिरामार येथे त्यांच्यावर सोमवारी (ता. १८) सायंकाळी ६ वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा मुलगा उत्पल यांनी पार्थिवास मुखाग्नी दिला, त्यावेळेस आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना शेवटचा निरोप देताना उपस्थितांना हुंदका आवरता आला नाही. ‘मनोहरभाई अमर रहे’ या घोषणांनी परिसर भावनाविवश झाला. गेल्या एक वर्षाहून अधिक काळ ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले होते. रविवारी (ता. १७) संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखी खालावली. गोमेकॉ इस्पितळाच्या डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचारांची शर्थ केली. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या संदर्भातील माहिती जवळच्या नातेवाइकांना देण्यात आली. मात्र, सायंकाळी ६.४० वाजता त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर मात्र संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.   दरम्यान, येथील भाजपच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, सुरेश प्रभू , स्मृती इराणी यांच्यासह देशभरातून आलेल्या पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.  मिरामार येथे गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीच्या बाजूलाच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या पार्थिवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा ठरविण्यात आली होती. अंत्यसंस्कार प्रसंगी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गोव्यातील भाजपचे प्रभारी बी. एल. संतोष, भाजपचे आमदार व माजी आमदार, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, गोव्याचे ॲडव्होकेट जरनल दत्तप्रसाद लवंदे, हवाई, नौदल व लष्कराचे अधिकारी, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सिनेअभिनेते नाना पाटेकर, खासदार किरीट सोमय्या, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रवक्ते अतुल भातकळकर, गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, माजी सचिव धर्मेंद्र शर्मा व केवल शर्मा, शासकीय व पोलिस अधिकारी उपस्थित होते.      संघाचे प्रचारक ते संरक्षणमंत्री अशी मोठी झेप मनोहर पर्रीकर यांनी आपल्या कर्तृत्वाने घेतली. राजकीय दृष्ट्या अस्थिर अशा गोवा राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांनी समर्थपणे सांभाळले. चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या पर्रीकरांनी तीन वर्षे देशाचे संरक्षणमंत्रिपदही सांभाळले. त्यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आयआयटी-मुंबईमधून त्यांनी धातूशास्त्र विषयात अभियांत्रिकीची पदवी संपादित केली. त्यानंतर राजकारणात प्रवेश केल्यानंतरही त्यांनी संघाशी असलेले आपले नाते कधीही लपवून ठेवले नाही. त्यांनी १९९४ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. तेव्हा ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पणजी मतदारसंघातून निवडून आले. जून ते नोव्हेंबर १९९९ मध्ये ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्या वेळी काँग्रेसविरोधातील त्यांची भाषणे गाजली. ते २४ ऑक्‍टोबर २००० मध्ये पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. २७ फेब्रुवारी २००२ पर्यंत मुख्यमंत्री होते. पाच जून २००२ रोजी पुन्हा मुख्यमंत्री झाले. भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्याने २९ जानेवारी २००५ रोजी त्यांचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ४० पैकी २१ जागा जिंकून बहुमत सिद्ध केले. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतही भाजपने चांगली कामगिरी केली. नोव्हेंबर २०१४ मध्ये ते केंद्रात मंत्री झाले. २०१७ पर्यंत केंद्रीय मंत्री होते. गोवा विधानसभेत २०१७ मध्ये भाजपला बहुमत मिळविता न आल्याने ते पुन्हा गोव्यात आले व सहकारी पक्षांना बरोबर घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती.  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आजार फेब्रुवारी २०१८ मध्ये अधिक बळावल्याने त्यांना सुरवातीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात व त्यानंतर उपचारासाठी अमेरिकेतही नेण्यात आले होते. तेथून उपचार घेऊन ते गोव्यात परतले होते. २०१८ मध्ये पावसाळी अधिवेशनात त्यांनी कामकाज हाताळले होते व त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या १४ ऑक्‍टोबर २०१८ रोजी एम्स रुग्णालयातून त्यांना स्ट्रेचरवरूनच गोव्यात आणले होते. ताळगाव येथील निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. वारंवार प्रकृती बिघडल्यास त्यांना गोमेकॉ इस्पितळात दाखल केले जात होते व त्यांच्या चाचण्याही केल्या जात होत्या. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्याने दिल्लीतील ‘एम्स’च्या डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार केले होते. धडाकेबाज संरक्षणमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहामुळे संरक्षणमंत्रिपद स्वीकारलेल्या पर्रीकरांनी तेथेही धडाकेबाज कामगिरी केली. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेपार सर्जिकल स्ट्राइक करण्याचा धाडसी निर्णय त्यांनीच घेतला होता. ‘वन रॅंक वन पेन्शन’, शस्त्रखरेदी आणि राफेलचा निर्णय त्यांच्याच काळातील. ऑगस्टा वेस्टलॅंडसारख्या गैरव्यवहाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनीच दिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com