मटणदरवाढीच्या खेळात उत्पादकांचा ‘बळी’

परवडत नसतानाही शेळ्या-मेंढ्यांची जोपासना आम्ही करत आहोत. परंतु विक्रेत्यांकडून मात्र लुटीचे कारस्थान सुरू आहे. आमच्याकडून कमी दरात बकरे घेऊन ते चढ्या दराने विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मटण महाग झाल्याने ग्राहक एकत्र होत असले, तरी आम्ही मात्र असह्यच आहोत. शासनाने या व्यवसायासाठी तातडीने मदतीची पावले उचलावीत - दत्तात्रेय माने, पारगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
goat farming
goat farming

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पश्‍चिम महाराष्ट्रात मटणाचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या विक्रेते आणि ग्राहकांत यावरून कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्यात मोठा संघर्ष सुरू आहे. परंतु, या खेळात मेंढपाळासहित शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दर वाढविले असले, तरी ज्या दरात बकऱ्यांची खरेदी मेंढपाळ, अथवा गोट फार्ममधून खरेदी केली जात होती, त्याच दरात त्यांच्याकडून खरेदी केली जात आहे. यामुळे उत्पादकाला मात्र नुकसान सोसावे लागत आहे.  गेल्या एक महिन्यापासून कोल्हापूरसहित परिसरामध्ये मटणविक्रेत्यांनी मटणाच्या दरात किलोला तबब्ल दोनशे रुपयांपर्यंत वाढ केली. साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत असणारे दर सहाशे रुपये किलोपर्यंत गेले आहे. मटणाच्या खवय्येगिरीत अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांकडून या दरवाढीला विरोध झाला. अनेक ठिकाणी, उपनगरांमध्ये विक्रेत्यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी तालीम मंडळानी बकऱ्यांची एकदम खरेदी करून त्याचे मटण सवलतीच्या दरात वाटण्याचा उपक्रम सुरू करून खवय्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.  उत्पादक दुर्लक्षित  गेल्या काही महिन्यांपासून प्रतिकूल परिस्थितीमुळे बकऱ्यांची आवक बाजारपेठांमध्ये कमी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावसह सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी भागांतील बाजारपेठांमध्येही बोकडाची आवक घटली आहे. अनेक ठिकाणी शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी आल्याने त्यांना शेळ्यामेंढ्याचे पालनपोषण करणे अशक्‍य बनले आहे. यामुळेच बोकडांची टंचाई निर्माण झाली आहे. अतिवृष्टी पूर यामुळेहीं पशुधनाचे मोठे नुकसान झाले. यामुळे बोकडांची चणचण बाजारपेठात आहे. याचा फायदा विक्रेत्यांकडून घेतला जात आहे.  प्रतिक्रिया गेल्या सहा महिन्यांत शेळी-मेंढीपालन करणे आव्हानात्मक ठरत आहे. व्यवस्थापन खर्चात तीस ते पस्तीस टक्क्‍यांनी वाढ झाली आहे. मका, भरडा, सोयाबीन आदींचे दर वाढले आहेत. यामुळे खाद्य खरेदी करताना चढ्या भावानेच ते खरेदी करावे लागते. याउलट व्यापाऱ्यांकडून मात्र जुन्या दरानेच खरेदी होत आहे. दर वाढल्याचा आम्हाला कोणताच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. मटण महागले आहे. आम्हालाही दर वाढवून द्या म्हणले की किरकोळ वाढ देऊन आम्हाला गप्प बसविले जाते.  - सचिन कोळी, शेळी-मेंढीपालक, निपाणी, जि. बेळगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com