बाजार बंदचा बोकड खरेदी-विक्रीला फटका 

बकरी ईद १ ऑगस्टला असून, बाजार समित्यांचे पशुधनाचे उपबाजार व प्रमुख बाजार बंद असल्याने बोकडांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजारात होणार नसल्याचे चित्र आहे.
Goat Farming
Goat Farming

जळगाव ः बकरी ईद १ ऑगस्टला असून, बाजार समित्यांचे पशुधनाचे उपबाजार व प्रमुख बाजार बंद असल्याने बोकडांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजारात होणार नसल्याचे चित्र आहे. परंतु खरेदीदार किंवा व्यापारी बोकडांची खेडा खरेदी करीत असून, शेतकऱ्यांना जागेवरच बऱ्यापैकी दर मिळत असल्याची स्थिती आहे. 

बोकडांची खरेदी सध्या खेडा खरेदीत कमी आहे. मटणासाठी बोकड, बकऱ्यांची मागणी आहे. परंतु बकरी ईदनिमित्त बोकडांची खरेदी पुढील आठवड्यात वाढेल, अशी स्थिती आहे. खानदेशात शेळ्या, मेढ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील चोपडा, वैजापूर, वरखेडी, किनगाव, नेरी येथील बाजार प्रसिद्ध आहेत. परंतु खानदेशातील बाजार समित्यांचे प्रमुख बाजार व उपबाजार पशुधनाच्या खरेदी-विक्रीसाठी बंद आहेत. फक्त साक्री, वरखेडी येथील बाजार सुरू आहेत. यामुळे बोकडांची विक्री या बाजारांमध्ये करण्यासंबंधी अडचणी आहेत. 

अनेक बाजार बंद असल्याने खरेदीदार गावोगावी जावून बोकडांची पाहणी, सौदे सध्या करीत आहेत. हे सौदे सध्या कमी असले तरी पुढील आठवड्यात हे सौदे वाढतील, अशी शक्यता आहे. यंदा मटणाची मागणी चांगली आहे. ग्रामीण भागात मटणाची विक्री सुरू आहे. यामुळे बकरी व बोकडांची चांगली मागणी आहे. परिणामी ईदसाठीदेखील बोकडांना चांगले दर शेतकऱ्यांना मिळत आहेत. बकरी ईदसाठी दात आलेले १३ ते १५ महिन्यांचे बोकड गावोगावी किंवा खेडा खरेदीत घेतले जात आहेत. त्यांना प्रतिबोकड २५ ते ३० हजार रुपये दर मिळत आहे. 

आगाऊ सौदे चोपडा, फैजपूर (ता.यावल), जामनेर, पाचोरा भागात झाले असून, ईदच्या दोन-चार दिवसांपूर्वी बोकड घेवून जाण्याचे नियोजनही खरेदीदारांनी केले आहे. वैजापूर येथील उपबाजारात बकरी ईदला १०० ते १२५ बोकडांची विक्री होत असते. चोपडा येथील बाजार रविवारी असतो. या बाजारातही सातपुड्यातील आदिवासी बांधव , बोकड विक्रीसाठी येतात. परंतु हे बाजार बंद आहेत. सध्या शेळ्या मटणासाठी १० ते ११ महिन्यांची शेळी तर सात आठ महिन्यांच्या बोकडाला पाच ते सात हजार रुपये दर खेडा खरेदीत मिळत आहे. पशुधनाचे बाजार सर्वत्र सुरू राहीले असते तर बोकडांचे दर आणखी अधिक मिळू शकले, असते अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.  प्रतिक्रिया बकरी ईदला बोकडांची मागणी आहे. पशुधनाचे अनेक बाजार बंद असल्याने खरेदीदार थेट गावात खेडा खरेदी करून घेत आहेत. मटणासाठीदेखील बकरी, बोकडांची चांगली मागणी यंदा असून, दरही बरे आहेत.  - लीलाधर पाटील, शेळीपालक शेतकरी, मालखेडा (जि.जळगाव) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com