महापूरानंतर गोदावरीकाठचे कृषिवैभव मातीमोल

गोदावरीकाठचे कृषिवैभव मातीमोल
गोदावरीकाठचे कृषिवैभव मातीमोल

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील गोदाकाठचा परिसर भाजीपाला, द्राक्ष व ऊस शेतीत आघाडीवर आहे. याच भागामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला महापूर आला. तिचे रौद्ररूप इतके भयंकर होते की, ‘गोदामाई भरून आली, अन् सारं काही घेऊन गेली’ अशी परिस्थिती या महापुराच्या प्रलयात झाली आहे. आता फक्त काळी आई शेतकऱ्यांच्या जोडीला उरली आहे. गोदेमुळे समृद्ध झालेल्या या गावांना तिचाच शाप लागला की काय असे वास्तव नदीकाठी दिसून येते. निफाड तालुक्यात गोदावरी नदीकाठची उभी लाखमोलाची पिके जमीनदोस्त झाली आहेत, तर काही वाहून गेली आहेत. या नुकसानीमुळे गोदावरी काठाचे हे कृषिवैभव मातीमोल झाल्याने मोठे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. अजूनही दाहकता तीव्रच.... महापूर ओसरून आता एक महिना होत आला, मात्र अजूनही गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचा तडाखा कमी झालेला दिसत नाही. नदीलगतच्या एक किलोमीटर परिसरात साचलेले पाणी, त्यात सडून गेलेली पिके फक्त उभी आहेत. आधीच विविध अडचणींशी संघर्ष करत असलेले या भागातील शेतकरी या संकटामुळे खचून गेले आहेत. कवी कुसुमाग्रजांच्या ''कणा'' कवितेतील गोदामाई पाहुणी म्हणून येते आणि खरोखरंच सगळे काही आपल्या कवेत घेऊन जाते. याची भीषणता शेतकऱ्यांनी पुरेपूर अनुभवली आहे. या महापुरात प्रामुख्याने निफाड तालुक्यातील सांगवी, शिंपी टाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे आणि करंजगाव या गावांना मोठा फटका बसला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीची तीव्रता या परिसरात गेल्यानंतर लगेच दिसून येते. गेल्या ५० वर्षानंतर हा मोठा महापूर असल्याचे येथील वृद्ध व जाणकार नागरिक सांगतात. आता पिकांचे उरले फक्त सापळे जिल्ह्यातील दारणा सांगवी या गावापासून ते करंजगावापर्यंत हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसला आहे. महापुरात उभी पिके वाहून गेली आहेत, काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने सडली आहेत, तर काही ठिकाणी पिकांचे फक्त सांगाडे उभे दिसत आहेत. निफाड तालुक्यातील ६ हजार २१७ हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक २ हजार ४५८ हेक्टरवरील सोयाबीन, २२८३ हेक्टरवरील ऊस, ६३९ हेक्टरवरील भाजीपाल्याची हानी झाली आहे. तालुक्यातील सर्वाधिक १३ हजार ५०० शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. यांसह द्राक्ष बागा पाण्याखाली गेल्याने आगामी द्राक्ष हंगामावरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजीपाल्याचा पट्टा उद्ध्वस्त सांगवी, शिंपी टाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे आणि करंजगावसह आसपासच्या परिसरात भाजीपाला लागवड होते. या महापुरात अनेक शेतकऱ्यांची कोबी, फ्लॉवर, वांगी, कोथिंबीर, ढोबळी मिरची, टोमाटो अशी पिके पाण्याखाली गेली आहेत. महापुराच्या प्रलयात भाजीपाल्याचा पट्टा उद्ध्वस्त झाला. हे नुकसान किती मोठे आहे याची प्रचीती गोदावरीच्या काठावर शेतात नजर मारल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते. येथील शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालन व्यवसाय केला होता. मात्र, शेततळी महापुरात वाहून गेल्याने काही कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रतिकूल नानाविध प्रयत्नांनी उभी केलेली कष्टाची श्रीमंती संपुष्टात आली आहे. वीटभट्टी व्यावसायिकांचेही नुकसान गोदाकाठच्या चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे  या परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनेक स्थानिक लोकांना रोजगार मिळत असतो. मात्र महापुराने या वीटभट्ट्यांना मोठा फटका बसला. परिसरातील तीस-चाळीस वीटभट्ट्यांपैकी नदीकाठच्या सर्वच वीटभट्ट्या पूर्णपणे पाण्यात होत्या. त्यामुळे शेतीव्यतिरिक्त असलेली रोजगाराची संधी संपुष्टात आली आहे.  पंचनामे झाले उशिरा अन् ठोस सरकारी मदत पण नाही महापूर ओसरून एक महिना झाला. मात्र प्रशासनाकडून पंचनाम्याची कामे संथ गतीने झाल्याची संतापजनक प्रतिक्रिया येथील शेतकरी व्यक्त करत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचा कुठलाही ठोस पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही.   आता पुन्हा उभे राहूया  ''जसं तुमच झालं तसं माझंही होत्याच नव्हतं झालं... अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकरी एकमेकांना आधार देत पुन्हा उभ राहत आहेत. स्वतःच्या कष्टाशिवाय आपल्याला कुणीही उभं करणार नाही, ही भावना सोबत घेऊन पुन्हा खंबीरपणे उभे राहून लढण्याची तयारी येथील बळिराजा करताना दिसत आहे. मोठ्या ताकदीने पुन्हा त्याने स्वतःला सावरले असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत. 

जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय सुरू केला. लाखो रुपये खर्च करून उभा केलेला व्यवसाय संपुष्टात आला. मासे विक्रीसाठी आली होती; त्यांचे वजन एक ते दीड किलोपर्यंत झाले होते. त्यामुळे ४० ते ५० टन मासे पुरात वाहून गेले. यासह एक एकर ढोबळी मिरची काढणीस आलेली असताना पाण्याखाली गेल्याने सडून गेली. त्यामुळे ४० ते ५० लाखाचे नुकसान झाले. हे दुःख अन् वेदना शब्दात न सांगता येण्यासारखे आहे. आता आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. - चंद्रकांत डेर्ले, शेतकरी, शिंगवे, ता. निफाड

लाखो रुपये खर्च करून वांग्याचे पीक घेतले. पीक एकदम जोमात होते अन् फळधारणा चांगली होती. भाव चांगला मिळत असताना महापुराखाली उभे पीक गेले. आता फक्त सांगाडे उरले आहे. सरकारी यंत्रणा आली अन् पाहून गेली. मात्र, आमच्या पाठीशी कुणीच नाही हे मोठं दुःख आहे. - कैलास मोगल, भाजीपाला उत्पादक शेतकरी,  शिंगवे, ता. निफाड

आठवडाभर पाणी साचून राहिल्याने सोयाबीन पीक सडून गेले आहे. जमिनी क्षारपड झाल्याने पुढील चार महिने अजून पिके घेता येणार नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. तो कधीच भरून निघू शकत नाही.  - राजेंद्र राजोळे, सोयाबीन उत्पादक,  करंजगाव, ता, निफाड

महापुरात उभे उसाचे पीक वाहून गेले. याबरोबर शेतामध्ये जाण्याचे जे रस्ते होते. तेही वाहून गेले आहेत. शेताचा काही भाग पाण्यात खचला आहे. त्यामुळे शेतात जाण्यास अडचणी आहेत. आता पाणी कमी झाले आहेत परंतु शेतामध्ये ओहळ पडल्याने जमीन तयार करायला मोठा खर्च येणार आहे. - रावसाहेब कोरडे,  ऊस उत्पादक शेतकरी, चांदोरी, ता. निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com