असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'

असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'

कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी पोटनियम दुरुस्तीचा ठराव केला जात आहे. या ठरावामध्ये ‘गोकुळ’ दूध  उत्पादकांच्या हिताचा उद्देश आहे.

व्यवसाय वाढ,  दूध संकलन, तसेच वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही सामान्य डेअरी सहकारी संस्था किंवा विविध उद्देशांची संस्था  ज्याचा उद्देश बहुराज्य संस्थेचे किंवा डेअरी उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या संस्थेला आणि व्यक्ती समूहाला सभासद होता येणार आहे. त्यामुळे मल्टिस्टेटमुळे फायदा होणार आहे. परंतु, दुसरीकडे नियम आणि अटींच्या अधीन राहून जादा सभासदही करता येणार आहेत, असेच या पोटनियम दुरुस्तीतून समोर येत आहे. हा ठराव रविवारी (ता. ३०) गोकुळ मल्टिस्टेटच्या सभेत मांडला जाणार आहे.  

माहितीचा अधिकार संघाची पुस्तके, माहिती व हिशेब जे नियमित व्यवहार संघ सभासदाबरोबर करत असते किंवा ठेवते, असे रेकॉर्ड पाहण्याचा अधिकार सभासदांना दिला जाणार आहे. 

मल्टिस्टेट म्हणजे काय?  जिल्हा दूध संघ (गोकुळ) सध्या कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. संघात सध्या कोल्हापूर जिल्ह्यातीलच सभासद आहेत. मल्टिस्टेट म्हणजे बहुराज्यीय संघ झाल्यानंतर महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांत संघाचा व्याप वाढणार आहे. 

मल्टिस्टेटचा हेतू  जिल्हा दूध संघाने प्राथमिक दूध संस्थेकडून संकलित केलेल्या दुधाला चांगली बाजारपेठ मिळवून दिली जाईल. दूध उत्पादकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी याचा फायदा होईल. दूध व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून पूरक योजना राबविली जाते. दुधापासून आधुनिक पद्धतीने उपपदार्थ तयार होतील. तसेच, दुधासह इतर दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक सुरक्षित केली जाईल. आलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करावी लागेल. पक्का माल तयार झाल्यानंतर त्याला विक्री आणि वाहतुकीची व्यवस्था करणे. संघाने संकलन केलेल्या दुधास वर्षभरात किफायतशीर आणि खात्रीलायक बाजारपेठ मिळवून देण्याची व्यवस्था करणे. संस्थांच्या सभासदांना याबाबतीत मार्गदर्शन करणे, हे संघाचे उद्देश राहतील. 

सभासदांचे हित   सभासदांच्या हितास बाधा येणार नाही, अशा रितीने सभासद व इतरांकडून जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून दूध खरेदी केले जाणार आहे. चांगल्या पैदास व व्यावसायिक हेतूने जनावरे बाळगली जातील. जनावरांच्या-खरेदी विक्रीचा व्यवहारही करता येणार आहे. दुभत्या जनावरांसाठी कर्ज दिले जाणार आहे. ‘गोकुळ’च्या संस्था सभासदांना चांगल्या जातीची जनावरे उपलब्ध करून दिली जातील. 

सभासदत्व कोणास मिळणार? ‘गोकुळ’मध्ये कोणत्याही सामान्य डेअरी संस्थेला सभासद होता येईल. बहुराज्य म्हणजेच मल्टिस्टेट संस्थेचे किंवा डेअरी उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांना सभासद होता येईल. दरम्यान, कोणतीही संस्था या संघाचे सभासदत्व स्वीकारण्याआधी, जी संस्था संघाकडे रोज कमीत कमी ५० लिटर दूध पुरवठा करते. तसेच, वर्षातील किमान २४० दिवस सरासरी दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेला सभासद करता येते. 

कार्यक्षेत्र  संघाचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यामधील वारणा प्लॅन्टच्या नोंदणीवेळी ज्या ज्या गावांचा समावेश केला होता, त्या गावांना वगळून; तसेच अथणी, चिकोडी, हुक्केरी, बेळगाव जिल्हा राहील. म्हणजे याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्ये असतील.

 व्यक्ती सभासद  कोणत्याही मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी किंवा कोणतीही सहकारी संस्था व्यक्ती सभासद होऊ शकते. कोणतेही कार्पोरेशन, जे सरकारच्या मालकी व नियंत्रणात असलेले. कोणतीही सरकारी कंपनी, जी कंपनी ॲक्‍ट १९५६ चे कलम ६१७ मध्ये संज्ञा दिल्याप्रमाणे सभासद. एखादा व्यक्तींचा समूह किंवा व्यक्तींची संस्था, जी सहकारी संस्थेच्या स्वरूपास व कार्यास संलग्न असेल व केंद्रीय उपनिबंधकांनी परवानगी दिलेली असेल, अशा संस्थांना, व्यक्तींना सभासद होता येणार आहे. 

सामान्य सभासदही होता येणार सामान्य सभासद होण्यासाठी संघाकडे अशा संस्थेने लेखी स्वरूपात अर्ज द्यावा लागणार आहे. ५०१ रुपये संस्थेचे प्रवेश शुल्क. सभासदत्व मिळण्यासाठी आलेल्या अर्जावर चार महिन्यांत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पोटनियमातील या मुद्यावर सभासद होता येणार आहे. नाममात्र सभासदांसाठी एक हजार रुपये भरून संघाच्या अधिकारावरून कोणाही एका व्यक्तिस नाममात्र सभासद होता येते. अशा सभासदांना संघाचे शेअर्स (भाग) घेता येणार नाही. त्यांना मत देण्याचा, बॉडी मिटिंग हजर राहण्याचा अधिकार नसेल.

विघ्न आणणाऱ्या सभासदांचे सभासदत्व रद्द संघाच्या चांगल्या कामात अडथळा आणणाऱ्या किंवा संबंधित सभासदाच्या कृत्यामुळे संघावर परिणाम होणार असेल तर त्या सभासदाचे सभासदत्व काढून टाकण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला दिला आहे. दरम्यान, संस्था सभासदास काढून टाकताना त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com