गोंदवले खुर्दमधील जलसंधारण कामांमध्ये ‘उरमोडी’चे पाणी

पावसाने ओढ दिली असली तरी उरमोडीच्या पाण्यामुळे जलसंधारणाच्या कामांत पाणीसाठा होऊन चांगला फायदा झाला आहे. हे सगळं श्रमदानातून केलेल्या कामामुळेच शक्‍य झाले आहे. - कैलास पोळ, शेतकरी, गोंदवले खुर्द
जलसंधारण कामांमध्ये साठलेले पाणी
जलसंधारण कामांमध्ये साठलेले पाणी

गोंदवले, जि. सातारा  : दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी गोंदवले खुर्दमधील लोकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली. मात्र, यंदाही पावसाने दडी मारल्याने दुष्काळ निवारणासाठी तलाव भरणार का हा प्रश्न होताच. पण, उरमोडी प्रकल्पाचे पाणी जलसंधारणाच्या कामात साठले अन्‌ गावाचा उत्तर भाग चमकू लागला. त्यामुळे यंदा तरी दुष्काळापासून या भागाची सुटका झाल्याने गोंदवलेकर समाधानी आहेत. 

गोंदवले खुर्द (ता. माण) गावातही भीषण दुष्काळी स्थिती निर्माण होऊन लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरचा आधार तर जनावरांसाठी छावण्यांचाच आधार घ्यावा लागत होता. उरमोडी पाणी योजनेचा कालवा गावाजवळून गेला असला तरी त्यातील पाणी ओढ्यातून गावात येण्याने ही परिस्थिती काहीशी बदलू लागली आहे. मात्र, शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहेच. परिसरात पुरेसा पाऊस होत नसल्याने यंदाही शेतात पीक नसल्याचीच परिस्थिती आहे. सध्याही गावालगत जनावरांसाठी तीन चारा छावण्या सुरू आहेत.

दरवर्षीची ही भीषण परिस्थिती बदलायचीच, असा निश्‍चय करून यंदा ग्रामस्थ एकवटले आणि श्रमदान व लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू केली. काही दिवसांतच छोटे-मोठे नालाबांध, समतल चरी, पाझर तलाव आदी कामे पूर्ण करण्यात आली. आता त्यामध्ये पाणीसाठा होण्यासाठी गरज होती ती पावसाची. मात्र, परिसरात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे भविष्यातील पाण्याबाबत ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत होती. याचदरम्यान उरमोडी पाणी योजनेचे पाणी गावाच्या उत्तर भागात पोचले. येथील जानाई पाझर तलाव या पाण्याने भरला. त्यानंतर हे पाणी नव्याने झालेल्या जलसंधारण कामातील नालाबांध व पाझर तलावांमध्येही साठविण्यात येत आहे. त्यामुळे या भागात पाऊस झाला नसला तरी आता जलसंधारण कामांमध्येही पाणीसाठा झाला आहे.

परिणामी भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सुटण्यास मोठा हातभार लागला आहे. आपण श्रमदान केलेल्या कामांमध्ये पाणी चमकू लागल्याने लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com