गोंदिया जिल्ह्याच्या घशाला कोरड

गोंदिया जिल्ह्याच्या घशाला कोरड
गोंदिया जिल्ह्याच्या घशाला कोरड

गोंदिया : सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस आणि परतीच्या पावसाने फिरविलेली पाठ, यामुळे तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. 

मागील तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्याचा परिणामी शेती आणि सिंचन प्रकल्पावर होत आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील पाणीसमस्या गंभीर आहे. सिंचन योग्य एकूण ६९ प्रकल्प आहेत, तर चार प्रकल्प मोठे आहेत. यापैकी तीन प्रकल्पांचे पाणी सिंचनाकामी उपलब्ध करून दिले जाते. मात्र यंदा या चारही मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी केवळ इटियाडोह जलाशयाचे पाणी अवघ्या २१०० हेक्‍टरला देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान लागवड न करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

मध्यम, लघू व मालगुजारी तलाव ज्यांचा उपयोग सिंचनासाठी होतो. अशा तलावांची संख्या ६५ आहे. मात्र सद्यस्थितीत यापैकी केवळ १४ तलावांत दहा टक्‍के इतकाच पाणीसाठा उरला आहे. चिरचाळबांध व तेढा येथील तलावांनी आताच तळ गाठला आहे. मध्यम प्रकल्पाच्या चोरखमारा जलाशयात केवळ ७.३४ टक्‍के पाणीसाठा आहे. लघुप्रकल्पांमध्ये भदभद्या तलावात ४.४३ टक्‍के, गुमडोह ३.९६ टक्‍के, रेहाडी ७.४५, रिसामा ३.१२, सोनेगाव ६.८५, सडेपार ०.३२, सेरपार जलाशयात केवळ ३.४२ टक्‍के पाणीसाठा आहे. १० ते १२ टक्‍के पाणीसाठा असलेले १५ जलाशय उरले आहेत. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या डांगोर्ली येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील वर्षी वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणीसमस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गोंदियापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याने शहरवासीयांची तहान भागविली. या वर्षी तशीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह असल्याने प्रशासनाकडून त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com