सोलापूर जिल्हा बँकेला चांगले दिवस आणावेत : सुभाष देशमुख

जिल्हा बँकेला चांगले दिवस आणावेत : सुभाष देशमुख
जिल्हा बँकेला चांगले दिवस आणावेत : सुभाष देशमुख

सोलापूर : सोलापूर जिल्हा बँक ही राज्यातील मोठी अर्थिक संस्था आहे. शेतकऱ्यांची ही बँक सक्षम व्हावी, ग्रामीण भागाला त्याचा हातभार लागावा, यासाठी धडपड आहे. बँकेची आर्थिक स्थिती बिकट असली, तरी ती सुधारावी, यासाठी सक्षम अधिकारी दिले आहेत. पण कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या पाठीशी राहून बँकेला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. ६) व्यक्त केली.  

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सहकार आयुक्त सतीश सोनी, सहसंचालक डॅा. संजयकुमार भोसले, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिंबधक संगीता डोंगरे, बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, शहर उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे आदी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले,''बँकेची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी गंभीर नाही. परंतु सुधारणा करण्यासाठी वेळ लागेल. त्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खरी कसोटी आहे. बँकेच्या कामात कधीही राजकारण केले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक सक्षम असावी, एवढीच भूमिका राहिली आहे. अर्थात, हे बोलून चालणार नाही. आपण सर्वांनीच त्यासाठी हातभार लावावा. बँकेवर नेमलेले अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांना साथ द्या.''

पाटील म्हणाले, ''कोतमिरे यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच बँकेला होईल. राज्यातील पाच बँका त्यांनी अडचणीतून बाहेर काढल्या आहेत.''

सोनी म्हणाले, ''शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलासा मिळाला. कर्जमाफी योजनेतून आणखी काही रकमा मिळतील. नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. त्याचा शेतकरी आणि बँकांनाच लाभ होणार आहे. त्यामुळे कामात हयगय करू नका. नियमितता, सातत्य ठेवा.''

दरम्यान, दिवसभर बँकिंगमधील विविध तांत्रिक सत्रे झाली. कोतमिरे यांनी प्रास्ताविक केले. बँकेचे सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे यांनी आभार मानले. राजू शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com