दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा वापर

रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी रोपवाटिकेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. अलीकडच्या काळात रोपनिर्मितीसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी पेपर पॉट आणि रोपवाढीसाठी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.
Differences between seedlings in paperpots and plastic bags
Differences between seedlings in paperpots and plastic bags

रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी रोपवाटिकेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. अलीकडच्या काळात रोपनिर्मितीसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी  पेपर पॉट आणि रोपवाढीसाठी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. तळसंदे (ता. हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील `सीमा बायोटेक'चे विश्‍वास चव्हाण हे  रोपे तयार करण्याकरिता पेपर पॉट तंत्रज्ञानाचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे रोपांच्या जोमदार वाढीबरोबरच वाहतूक खर्चातही बचत होत आहे. पूर्वी चव्हाण यांच्या रोपवाटिकेत टिश्‍यूकल्चर तंत्राने तयार केलेली केळी, साग आणि बांबूची रोपे प्लॅस्टिक पिशवीत माती भरून लावली जात होती. ठराविक काळानंतर मातीच्या पिशवीत वाढलेली रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जायची. परंतु यामध्ये असे लक्षात आले की, मातीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर रोपवाढीवर व पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. याला पर्याय म्हणून चव्हाण यांनी मातीऐवजी कोको पीटचा वापर सुरू केला.  कोको पीट माध्यमांमध्ये केळी रोपांची वाढ चांगली होऊ लागली. ओलावा दीर्घकाळ टिकून राहू लागला, परंतु कालांतराने असे लक्षात आले की, कोकोपीट एकाच गुणवत्तेचे मिळत नाही. काही वेळा जास्त विद्युत वाहकता असलेल्या कोकोपीटमुळे रोप वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. विशेषतः पावसाळ्यात कोकोपीटमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रोपांची वाढ खुंटते. मर होण्याचे प्रमाण वाढते. या अनुभवानंतर चव्हाण यांनी टिश्‍यू कल्चर केळी रोपांसाठी कोकोपीट माध्यमाला पर्यायी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर सुरू केला. त्यांचे चांगले फायदे दिसून आले आहेत.   पर्यावरण पूरक तंत्रज्ञान रोपनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बॅगा लागतात. शेतात रोप लागवडीनंतर बरेच जण प्लॅस्टिक पिशव्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता बांधावर फेकून देतात. त्यामुळे शेतीच्या परिसरात प्रदूषण वाढते. हे प्लॅस्टिक अनेक वर्ष जमिनीत तसेच राहते. त्यामुळे निसर्गाला हानी पोहोचते. हे लक्षात घेता पेपर पॉट तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. रोपांच्या वाहतुकीचा खर्च शेतकरी करत असतो. एक गाडीमधून पूर्वी दहा हजार रोपांची वाहतूक व्हायची, त्याच गाडीतून आता वीस हजार पेपर पॉट रोपांची वाहतूक होते.त्यामुळे वाहतुकीचा खर्चदेखील वाचला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब  रोपांच्या वाढीसाठी माध्यम म्हणून कोकोपीटला पर्याय शोधताना चव्हाण यांना पीटमॉसबाबत माहिती कळाली. अनेक देशांतील हायटेक नर्सरीमध्ये कोकोपीट ऐवजी पीट मॉस हे उच्च दर्जाचे माध्यम वापरले जाते. तसेच रोपांसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी पेपर पॉटचा वापर केला जातो. हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष प्रयोगानंतर पेपर पॉट तंत्रज्ञानाचा टिशू कल्चर केळी रोपांच्या वाढीसाठी अतिशय चांगला दिसून आला. अभ्यास आणि प्रत्यक्ष वापर करून केळी रोप निर्मितीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला.पेपर पॉटसाठी लागणारा पेपर हा नेदरलॅंड आणि पीट मॉस हे लिथुवानिया देशातून आयात केले जाते. पेपर पॉट मध्ये पीट मॉस भरणारे यंत्र चीनमधून आयात केलेले आहे. तंत्रज्ञानाचे फायदे 

  • पेपर पॉटमध्ये रोपवाढीसाठी वापरण्यात आलेले पीट मॉस हे माध्यम दर्जेदार आहे.
  • या माध्यमामध्ये रोपांची वाढ अतिशय जोमदार, वेगवान होते. हे माध्यम योग्य प्रमाणात ओलावा धरून ठेवते. पेपर पॉटमध्ये जादा पाण्याचा निचरा होईल अशी रचना असते. 
  • या तंत्रज्ञानामुळे विशेषतः पावसाळ्यात अति पाण्यामुळे रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत नाही. जादा पाण्यामुळे रोपांच्या मुळांच्या कक्षेत होणारी हानिकारक बुरशीची वाढ टाळली जाते.
  • योग्य वाढीचे रोप शेतामध्ये लावताना प्लॅस्टिक पिशवी ब्लेडने फोडावी लागते. पिशवी फाडताना मुळाभोवतीची मातीची हुंडी फुटल्यामुळे रोपांच्या मुळ्यांना इजा पोहाचते. परंतु पेपर पॉटचा पेपर हा जमिनीत कुजतो. त्यामुळे पेपर पॉट न फोडता रोप लागवड करता येते. 
  • पेपर पॉटमधील रोपांची वाढ एकसारखी होते. मुळ्यांची वाढ चांगली होते. ही रोपे जमिनीत लावली असता तत्काळ रूजतात.
  • कोणत्याही रोपाची नर्सरी अवस्थेतील वाढ निरोगी आणि सशक्त झाली, तर त्या रोपांपासून चांगले उत्पादन मिळते. पेपर पॉट मधील रोपे लावली असता तुलनात्मकदृष्ट्या शेतामध्ये वाढ जोमदार होते.त्यामुळे पीक उत्पादन देखील वाढते. असे प्रत्यक्ष शेतामध्ये दिसून आले आहे. 
  • पेपर पॉटमधील रोपांची लागवड केल्यानंतर तुलनात्मकदृष्ट्या शेतातील रोपांची मर अत्यंत कमी दिसून आली. पेपर पॉटमधील रोपांवर नर्सरी अवस्था आणि शेतामध्ये लागवड केल्यानंतर कीड, रोगांचे प्रमाण कमी दिसून आले.
  •  संपर्क- विश्‍वास चव्हाण, ९८२२५४७६२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com