नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस

नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस
नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस

नगर ः नगर शहरासह जिल्हाभरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यामधील श्रीरामपूर, शेंडी व राहाता या तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे सीना धरणाच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

नगर जिल्ह्यामधील अनेक भागांत दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. २५) दुसऱ्यादिवशी संगमनेर तालुक्‍यातील साकूर परिसर वगळता अन्यत्र दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरासह पूर्वेकडील आश्वी गट, तळेगाव परिसर, तसेच पश्‍चिमेकडील सावरगाव तळ परिसरात जोरदार पाऊस झाला. अवघ्या अर्ध्या-पाऊण तासात सर्वत्र पाणीच पाणी झाले. सावरगाव तळ परिसरात पावसाने कांदा, वांगी आदी पिकांसह डाळिंबाला फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. 

सुकेवाडी, खांजापूर परिसरातील विठ्ठलकडा धबधबा वाहत आहे. साकूर पठाराला मात्र भुरभुरीवरच समाधान मानावे लागले. अवर्षणप्रवण तळेगाव दिघे परिसरात बुधवारी सायंकाळी संथ पाऊस सुरू झाला. त्यामुळे सोंगणीस आलेल्या बाजरीच्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे. राहाता तालुक्‍यात पाऊण तास जोराचा पाऊस झाला; मात्र, कोरड्या विहिरी असलेल्या शेतकऱ्यांची अपेक्षा त्याने काही पूर्ण केली नाही. उभ्या पिकांना मात्र जीवदान दिले. शहरातील बाजारपेठेतील इमारतींच्या तळघरांत पाणी शिरले. पालिकेच्या व्यापारी संकुलाच्या खालच्या मजल्यात नेहमीप्रमाणे तळे साचले. तेथील दुकानांत दोन ते तीन फूट उंचीपर्यंत पाणी साठले. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवघ्या पाऊण तासात तब्बल पासष्ट मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिवाजी चौकातील पालिकेच्या तळातील व्यापारी गाळ्यांतील व्यापाऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. 

राहाता येथे अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. श्रीरामपूर शहरात सुमारास एक तास पाऊस झाला. सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावून एक तास धोधो बरसला. शिवाजी रस्ता, नेवासे रस्ता, गोंधवणी परिसरातील रस्ते, गिरमे चौक, रेल्वे उड्डाणपूल, संगमनेर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शिवाजी चौकानजीकच्या रेल्वे उड्डाण पुलाखाली व नेवासे रस्त्यावरील अतिथी कॉलनीसमोरील रेल्वे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तेथून ये-जा करणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. तालुक्‍यातील बेलापूर, वडाळा महादेव, मुठेवाडगाव, महांकाळ वाडगाव, टाकळीभान, कमालपूर, माळवाडगाव, खानापूर, भामाठाण परिसरातही आज पावसाने हजेरी लावली. 

निघोज (ता. पारनेर) परिसरात अळकुटी, वडनेर बुद्रुक, पठारवाडी, गाडीलगाव-गुणोरे, जवळे, पिंप्री जलसेन, सांगवी सूर्या, कोहकडी, कुरुंद परिसरात संध्याकाळपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. या पावसाने कांदा, तूर, मका व अन्य काही पिकांना दिलासा, तर काही ठिकाणी काढलेल्या सोयाबीन, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.

कातनाला पुलावर पुराचे पाच फूट पाणी पुणतांबे, जि. नगर ः नाशिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. या पुराचे पाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून वाहत आहे. यामुळे कातनाला परिसरात पाणीच पाणी झाले असून, पूल पाण्याखाली गेला आहे. पुणतांबे-कोपरगाव, पुणतांबे-शिर्डी, वाहतूक बंद पडली आहे. बनकर वस्ती भागात काही शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने सामान बाहेर काढावे लागले.गोदावरी नदीच्या पात्रात गुरुवारी (ता. २६) सकाळी अचानक पाणी वाढत गेले. पाण्याचा जोर मोठा होता. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. कित्येक कृषी पंप, विद्युत उपकरणे पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी ते काढण्यासाठी पाण्यात उतरले. वीज कंपनीने तातडीने नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद केला. दोन तासातच कातनाला पुलावर पाच फूट उंची इतके पाणी येऊन पूल पाण्याखाली गेला. पुणतांबे-कोपरगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रागा लागल्या होत्या. बाहेरगावी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना काट्या अटकल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा थोप बनकर वस्ती, बजरंगवाडी भागात जास्त प्रमाणात जाणवत होता. तलाठी दिलीप कुसाळकर, ग्रामविकास अधिकारी सोंमनाथ पटाईत, कातनाला भागातील ग्रामस्थांना माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com