केंद्राच्या वार्षिक सहा हजार मदतीसाठीची प्रक्रिया सुरू

वार्षिक सहा हजार मदतीसाठीची प्रक्रिया सुरू
वार्षिक सहा हजार मदतीसाठीची प्रक्रिया सुरू

सोलापूर : केंद्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने परिपत्रक काढले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची माहिती २६ फेब्रुवारीपर्यंत अंतिम करून ती केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

या योजनेमध्ये दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी जाहीर केला आहे. यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर समित्या स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संवैधानिक पद धारण केलेल्या आजी-माजी व्यक्ती या योजनेसाठी अपात्र राहतील. त्याचबरोबर आजी-माजी खासदार, आमदार, मंत्री, महापालिकेचे महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, निमशासकीय संस्थेचे अधिकारी-कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून इतर सर्व कर्मचारी, मागील वर्षात आयकर भरलेली व्यक्ती, १० हजारांपेक्षा जास्त निवृत्तिवेतन असलेली व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्‍टर, अभियंता, वकील, सीए, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ या क्षेत्रातील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असतील. काम वेळेत होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

  • ६ फेब्रुवारी : प्रांताधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, नायब तहसीलदार, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे.
  • ७ ते १० फेब्रुवारी : गावनिहाय पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करणे व तपासून खात्री करणे.
  • १० ते १२ फेब्रुवारी : कुटुंबनिहाय वर्गीकरण करून खात्री करणे.
  • ७ ते १५ फेब्रुवारी : शासनाने दिलेल्या परिशिष्टाप्रमाणे संगणकीकृत माहितीचे संकलित करणे
  • १५ ते २० फेब्रुवारी : शेतकऱ्यांची यादी गावात प्रसिद्ध करणे व हरकती मागविणे.
  • २० ते २१ फेब्रुवारी : यादीमध्ये दुरुस्ती असल्यास ती करून पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबाची यादी संगणकीकृत करून अंतिम करणे.
  • २२ ते २६ फेब्रुवारी : तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या याद्यांचे तालुकास्तरीय समितीने तपासणी करून संगणकीकृत माहिती महाऑनलाइनने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर, तसेच केंद्राच्या संकेतस्थळावर पडताळणी करून अपलोड करणे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com