देशातील ७५ जिल्हे लॉक; जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद

रेल्वे, मेट्रो बस सेवेला३१ मार्चपर्यंत ब्रेक,मुंबईची ‘लोकल’ही थांबली,केवळ मालगाड्या सुरू राहणार,जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होणार
देशातील ७५ जिल्हे लॉक; जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद
देशातील ७५ जिल्हे लॉक; जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी दिल्ली : अवघ्या जगावर कोरोना विषाणूच्या संसर्गाची काळी मृत्यू छाया पसरली असताना रविवारी भारताने मात्र या संसर्गाविरोधात थेट युद्ध पुकारले आहे. या विषारी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अवघा देश घरामध्ये थांबल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यावश्‍यक सेवांमध्ये सहभागी असलेल्यांचा सन्मान करण्यासाठी सायंकाळी प्रत्येक नागरिकाने घराची गॅलरी, दारामध्ये उभे राहत घंटानाद केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्य सरकारांनी केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना देशभरातील जनतेने रविवारी (ता. २२) ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी केला. संसर्गाचे हे संकट दीर्घकाळ कायम राहणार असल्याने देशातील विविध राज्यांतील ७५ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे टाळेबंदी करण्यात आली असून, येथे बाहेरच्या नागरिकांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आंतरराज्य बससेवाही ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली असून, पंतप्रधानांचे मुख्य आणि केंद्रीय सचिवांनी विविध राज्य सचिवांची एक उच्चस्तरीय बैठक आज घेतली. या बैठकीमध्येच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हा संसर्ग रोखण्यासाठी अनावश्‍यक प्रवास टाळावा असेही गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आलेले जिल्हे हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील आहेत. संसर्गाविरोधातील ही लढाई दीर्घकाळ चालणारी असल्याने देशभरातील ही टाळेबंदी आणखी काही काळ सुरूच राहण्याची शक्यता असून, जनतेनेही सहकार्य करत घरामध्येच राहावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.  अत्यावश्‍यक सेवा वगळता देशभरातील दळणवळण बंद होते. सर्वच शहरांमधील मुख्य रस्ते चौक, रेल्वे, बस स्थानके, विमानतळे अक्षरशः ओस पडली होती. दिल्ली, नोएडा, लखनौ, कोलकाता, कोची, बंगळूर, मुंबई आदी शहरांमधील मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सर्वच राज्यांनी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. सध्या आपण एका आठवड्यामध्ये केवळ साठ ते सत्तर हजार लोकांचीच चाचणी घेऊ शकतो. आता यामध्ये खासगी प्रयोगशाळांना देखील सामावून घेतले जाणार आहे. राज्यांनीही रुग्णांच्या उपचारासाठी आम्ही रुग्णालये निश्‍चित केली असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील एम्स, हरियानातील जझ्झर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या संस्थांमध्ये वेगळे कक्ष ठेवण्यात आले असून येथेही आठशे बेड राखीव ठेवण्यात आले आहे. या कक्षांमध्ये केवळ कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत. 

एकाच दिवसात तिघांचा मृत्यू आज देशात प्रथमच एकाच दिवसामध्ये तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मुंबई, पाटणा आणि सुरत या तीन शहरांमध्ये रुग्ण दगावल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या ही सातवर गेली असून, देशभरातील बाधितांची संख्या ३४१ वर गेली आहे. मुंबईत मरण पावलेल्या ६३ वर्षीय रुग्णाला मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयरोगाचा आजार होता. बिहारमध्ये मरण पावलेल्या रुग्णाचे वय ३८ वर्षे होते. हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच कतारहून भारतामध्ये आला होता. गुजरातमधील सुरत शहरामध्ये विषाणू बाधा झाल्याने ६७ वर्षांच्या वृद्धाला प्राण गमवावे लागले. या वृद्धालाही दम्याचा आजार होता तसेच त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती.

हैदराबादमध्ये संपूर्ण शटडाऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार हैदराबादसह तेलंगणमधील इतर भागांत जनता कर्फ्यूला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. हैदराबादमध्ये अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता. करीमनगर, आदिलाबाद, मेहबूबनगर, निझामाबाद जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाचे नागरिकांनी पालन केले. 

केरळमध्ये एकाच दिवशी १५ नवे रुग्ण  केरळमध्ये रविवारी (ता.२२) पंधरा नवीन रुग्ण आढळले असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७ वर पोचला असल्याची माहिती केरळचे मुख्य सचिव टॉम जोस यांनी दिली.  केरळमधील बाधितांची आकडा ६७ झाला आहे, तर ५९ हजार २९५ जण वैद्यकीय निरीक्षणाखाली असून यातील ५८ हजार ९८१ जणांना त्यांच्या घरी एकांतवासात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत

महाराष्ट्रातील दहा लॉक शहरे नगर, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, मुंबई उपनगर, पुणे, रत्नागिरी, रायगड, ठाणे, यवतमाळ 

राष्ट्रवादीचे खासदार राज्यातच थांबणार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना आहे तिथेच थांबा, दिल्लीत जाऊ नका असे निर्देश दिले आहेत. या विषाणूच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी स्थानिक पातळीवर सरकारी यंत्रणेला मदत करण्याचे निर्देशही पक्षाकडून देण्यात आले आहे. पश्‍चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसने त्यांच्या खासदारांना दिल्लीला न जाण्याचे निर्देश दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com