agriculture news in marathi, government forming issues continue, mumbai, maharashtra | Agrowon

शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

स्थिर सरकार देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सरकार स्थापनेसाठी दावा केला होता. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा सुरू होती. चर्चा सुरू असल्याने आणखी दोन दिवसांची मुदत आम्ही मागितली होती. मात्र ती राज्यपालांनी नाकारली. 
- आदित्य ठाकरे, शिवसेना नेते.

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे शिवसेनेने ठरलेल्या वेळेत दावा दाखल केला. मात्र, कॉंग्रेस पक्षाकडून रात्री उशिरा पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने सत्तापेच कायम राहिला. 'आम्ही राज्यपालांनी दिलेल्या वेळेत सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र इतर दोन्ही पक्षांना  प्रक्रियेसाठी अजून दोन दिवसांचा कालावधी हवा आहे,' अशी माहिती युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना दिली. 

दरम्यान, रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देऊन आज (ता. १२) रात्री साडेआठपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेच्या शिष्टमंडळाने सहाच्या सुमाराला राजभवनाकडे धाव घेतली. राज्यपालांनी दिलेल्या निर्धारीत वेळेत शिवसेनेने सरकार स्थापनेचा दावा केला. शिवसेना आमदारांच्या सह्यांचे पत्रही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोमवारी (ता.११) सादर केले. गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पेचप्रसंगाच्या या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला, असे वाटलेले असताना, कॉंग्रेस पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत पत्र शिवसेनेला देण्यात आले नाही. रात्री उशिरापर्यंत नवी दिल्ली येथे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू होती. इकडे राज्यपालांनी दिलेली वेळही संपत आल्यानंतरही पत्र न आल्याने, अखेर राजभवनातून रात्री ७.३० वाजता शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते एकनाथ शिंदे आणि युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ बाहेर आले.

यानंतर श्री. ठाकरे यांनी घटनाक्रमांची माहिती माध्यमांना दिली. कॉंग्रेसचे पत्र न आल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम राहिल्याचे स्पष्ट या वेळी झाले. त्यानंतर रात्री राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काॅग्रेसला आमंत्रण दिले.

विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने रविवारी संध्याकाळी राज्याच्या सत्तास्थापनेतून माघार घेतली. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या. तर शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसला ४४ जागांवर यश मिळाले आहे. त्याव्यतिरिक्त २८ आमदार हे अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आहेत. भाजप आणि शिवसेना युती करून ही निवडणूक लढले होते. साहजिकच युतीने एकत्रितपणे सत्तेचा दावा केला असता तर राज्यात त्यांची सहजपणे सत्ता स्थापन झाली असती. पण निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह समसमान सत्ता वाटप अशी आक्रमक भूमिका घेतली. 

भाजपने मात्र मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दर्शविल्याने या दोन्ही पक्षात मोठा तिढा निर्माण झाला. शिवसेनेला वगळून सत्तास्थापन करणे भाजपसाठी अशक्य असल्याने भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेतली. सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यानंतरही भाजपला सत्ता स्थापनेचा जादुई आकडा जमवणे शक्य नसल्यानेच भाजपने हा निर्णय घेतला. त्याआधी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून काहीजणांना गळाला लावण्याची चाचपणीही भाजपने करून पाहिल्याचे बोलले जाते. मात्र, सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर भाजपने सत्तास्थापनेच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. तसेच त्यासाठी सोमवारची (ता.११) संध्याकाळी साडेसात पर्यंतची वेळ दिली. त्यामुळे रविवारी रात्रीपासून राज्यातील राजकारणाने वेग घेतला. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ चालले. या तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या दिवसभर बैठकांवर बैठका सुरू होत्या. 

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुंबईत तर काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीत बैठका सुरू होत्या. दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. त्यानंतर राष्ट्रवादीने सेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास सहमती दर्शवली. मात्र, काँग्रेसचा निर्णय येईपर्यंत राष्ट्रवादीने वेट अँड वॉचचे धोरण अवलंबले. सेनेला पाठिंबा देणारे पत्रही राष्ट्रवादीने तयार केले होते. दुसरीकडे संध्याकाळी उशिरापर्यंत काँग्रेसचा निर्णय होत नव्हता. त्यामुळे राज्यात कमालीची उत्कंठता लागून राहिली होती. तोपर्यंत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. 

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार नसल्याची चर्चाही सुरू होती. राज्यपालांनी शिवसेनेला संध्याकाळी साडेसात पर्यंतची वेळ दिली होती. त्याआधी शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा करणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसच्या गोटात विलंब होत असल्याने हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती-आघाडी होऊ नये, यासाठी पडद्याआडूनही मोठे प्रयत्न झाल्याचे बोलले जात होते.

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे, शिंदेंच्या नावाची दिवसभर चर्चा 
सध्या शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू होती. तसेच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर होतो का, याबाबतही राज्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता लागली होती. 

संजय राऊत रुग्णालयात...
शिवसेनेच्या एकंदर रणनीतीचे चाणक्य ठरलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने दुपारच्या सुमाराला त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  

शिवसेना एनडीएतून बाहेर; अरविंद सावंत यांचा राजीनामा 
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलत असताना शिवसेनेने केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी सोमवारी (ता. ११) सकाळी पत्रकार परिषदेत आपण राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. 

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद सावंत यांनी म्हणाले, ‘‘देशाचा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. पंतप्रधानांनी मला केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम खात्याची जबाबदारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासार्हतेला तडा गेला. सत्तेच्या समान वाटपाचा निर्णय सहमतीने झाला. पण, आता ते नाकारण्यात आला. शिवसेनेला खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विश्वासार्हता नाही. अशा वातावरणात मी केंद्रात काम करणं योग्य नाही. ते नैतिकदृष्ट्याही योग्य नाही. त्यामुळे मी, माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला आहे.’’  

 


इतर ताज्या घडामोडी
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...