पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी ‘पंतप्रधान आवास’मधून मदत ः पंकजा मुंडे

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे

मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करून देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून मदत करण्यात येईल. पूररेषेच्या आतील नुकसान झालेल्या घरांनाही ग्रामविकास विभागाच्या निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून देण्याच्या योजनेअंतर्गत इतरत्र घर बांधून देण्यासाठी मदत केली जाईल. ग्रामीण भागात नुकसान झालेल्या घरांचा आराखडा आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

पूरग्रस्त भागातील गावांमध्ये ज्यांचे घर पडले आहे ते ग्रामस्थ घर बांधत असतील तर त्यांना दीड लाख रुपये तातडीने देता येतील, असा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

मंत्री पंकजा मुंडे यांनी पूरग्रस्त भागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, गडचिरोली आदी जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी सोमवारी (ता. १९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 

या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की पुरामुळे ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालये, पंचायत समिती कार्यालये यांचेही नुकसान झाले आहे. काही भागांत शाळा, वर्गखोल्या, अंगणवाडी इमारती पडल्या आहेत. याची माहिती घेऊन त्याच्या दुरुस्तीसाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक आठ दिवसांत पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. या दुरुस्तीकामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान झाले असल्यास त्याचीही माहिती देण्यास जिल्हा परिषदांना सांगण्यात आले आहे. ही माहिती संकलित करून ती आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येईल.

पुरामुळे खचलेल्या किंवा वाहून गेलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत दळणवळण खोळंबता कामा नये. यासाठी अशा रस्त्यांच्या दुरुस्तीचा एक आराखडा पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्राथमिक आराखडा सादर केला असून अतिरिक्त इत्थंभूत आराखडा आणि अंदाजपत्रक आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com