मराठा उद्योजकांसाठी आता सहकारी बँकांनाही पत हमी

मराठा उद्योजकांसाठी आता सहकारी बँकांनाही पत हमी
मराठा उद्योजकांसाठी आता सहकारी बँकांनाही पत हमी

मुंबई : मराठा समाजातील तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नवीन योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे मराठा समाजाची प्रगती होऊ शकते, असा विश्वास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. या महामंडळाअंतर्गत योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आता राष्ट्रीयीकृत बँकेबरोबर सहकारी बँकांसाठी पत हमी योजना (क्रेडिट गॅरेंटी स्कीम) लागू करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना सहकारी बँकांमधूनही कर्ज घेता येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांतील बदलाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील बोलत होते. या परिषदेला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील उपस्थित होते. या वेळी पाटील यांनी सांगितले की, राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटातील युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थ साह्य व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाअंतर्गत योजना राबविण्यात येतात. महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांसाठी कर्ज घेण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्णयानुसार आता सहकारी बँकांनाही महामंडळामार्फत पत हमी योजना लागू करण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या योजनांच्या नियमांत झालेल्या बदलांबाबत ते म्हणाले, गट कर्ज व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक कर्ज खात्याअंतर्गत पुरुषांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षांवरून ५० तर महिलांची कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे करण्यात आली आहे. यामुळे अधिक लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच, किमान पाच व्यक्तींच्या समूहास १० ते ५० लाखांपर्यंत कर्जावरील व्याज परतावा करण्यात येणार होता. मात्र, यामध्ये बदल करून, दोन व्यक्तींसाठी कमाल २५ लाख, तीन व्यक्तींसाठी ३५ लाख तर चार व्यक्तींसाठी ४५ लाखांच्या मर्यादेवर कर्ज व्याज परतावा देण्यात येणार आहे. पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास ५० लाखांच्या मर्यादेवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करणार असल्याची माहितीही पाटील यांनी या वेळी दिली. तसेच या योजनेसाठी महिला बचत गटांसाठी असलेली कमाल वयाची अट वगळण्यात आली आहे. मराठा समाजातील सर्व लाभार्थ्यांना आता जातीचा दाखला अपलोड करणे अनिवार्य असणार आहे. तसेच, या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोचावी व जनजागृती व्हावी, यासाठी समुपदेशक नेमण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी या वेळी दिली. शेतकऱ्यांसाठी विशेष सवलत शेतकरी उत्पादक संस्थेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या गटातील सदस्यांच्या उत्पन्नाचे हमीपत्र संचालकाने द्यावे, असा निर्णय महामंडळाने घेतला असून, यामुळे वेळेत बचत होणार आहे. भविष्यात शेतकरी उत्पादक संस्थेने भरलेले नोंदणी शुल्क रकमेचा परतावा महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. तसेच, मराठा समाजातील संचालक व सदस्यांची संख्या ही किमान ६० टक्के असावी असा निर्णयही महामंडळाने घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com